राज्यातील १५० मेगावॅट वीजपुरवठा तब्बल दोन तास खंडित

पणजी : गोव्यातील वीज ‘ट्रिपिंग’ची मोठी समस्या टाळण्यासाठी ‘एनएक्सटीएल नरेंद्र डबल-सर्किट लाईन’ अत्यंत महत्त्वाची ठरली असती. म्हापसा येथून शेल्डेमकडे जाणाऱ्या वीजवाहिनीत अचानक जादा दाबाची (व्होल्टेज) समस्या निर्माण झाल्यामुळे ‘जीटीटीपीएल’ उपकेंद्रावरील सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली आणि ४०० केव्ही शेल्डे-म्हापसा सर्किट-२ सह इतर वाहिन्या ट्रिप झाल्या. या तांत्रिक बिघाडामुळे गोव्यातील सुमारे १५० मेगावॅट वीजपुरवठा तब्बल दोन तास खंडित झाला आणि ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
सध्या म्हापसाकडून शेल्डेकडे जाणारा वीजप्रवाह जीटीटीपीएल पूलिंग पॉईंटमार्गे वळवण्यात आला आहे. या व्यवस्थेत, जीटीटीपीएल येथील ४०० केव्ही बस ही व्होल्टेज सपोर्टसाठी पूर्णपणे म्हापसा (पीजीसीआयएल) स्रोतावर अवलंबून असते. या अवलंबित्वामुळे ती ‘कमकुवत टोकाची बस’ ठरते आणि तिची अतिरिक्त दाब शोषून घेण्याची क्षमता मर्यादित राहते. या रचनेमुळे म्हापसा टोकावर विजेचा दाब अचानक वाढल्यास त्याचा थेट परिणाम जीटीटीपीएलच्या ४०० केव्ही बसवर होतो. या घटनेतही हेच घडले आणि बसमधील विजेच्या दाबाने ‘ओव्हर-व्होल्टेज प्रोटेक्शन’ योजनेची सुरक्षित मर्यादा ओलांडली. परिणामी, सुरक्षिततेचा उपाय म्हणून ४०० केव्ही शेल्डे-म्हापसा सर्किट-२ आणि त्यापुढील २२० केव्ही शेल्डे-शेल्डे सर्किट-१ व २ स्वयंचलितपणे ट्रिप झाले.
जर ‘एनएक्सटीएल नरेंद्र डबल-सर्किट लाईन’ सेवेत असती, तर जीटीटीपीएल येथील ४०० केव्ही बसला एका अतिरिक्त आणि मजबूत ग्रिड स्रोताचा आधार मिळाला असता. यामुळे व्होल्टेजचे नियमन सुधारले असते, शॉर्ट-सर्किट स्ट्रेंथ वाढली असती आणि दाब शोषून घेण्याची क्षमता अधिक चांगली झाली असती. या समांतर आणि पर्यायी मार्गामुळे म्हापसा लाईनवरील व्होल्टेजची संवेदनशीलता कमी झाली असती आणि ओव्हीपी ट्रिप होण्याची शक्यता खूप कमी झाली असती. पर्यायाने गोवा ग्रिडची एकूण स्थिरता आणि लवचिकता सुधारून अशा प्रकारच्या मोठ्या वीज कपातीची वेळ राज्यावर आली नसती.