स्मशानभूमीतील अघोरी घटकांशी नाते सांगणारा, अंगावर काटा आणणारा हा उत्सव म्हणजे 'गडे उत्सव'. फाल्गुन मासातील सर्जकतेला गुढत्वाचे वलय देणाऱ्या या विधीत अनाकलनीय अतिमानवी शक्तीचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

‘मसणातल्या गड्यानो
तुमका मांडार हाडिले
आपापली जागा घेया तुमी
बा आपापली जागा घेया गा तुमी'
शांत लयीत चाललेले पारंपरिक ढोलवादन एका बाजूला सुरू असते, तर दुसरीकडे कमरेला धोतर, अंग मातीने माखलेले, काहींच्या खांद्यावर स्मशानातून आणलेले मानवी अवयव, तर काहींकडे हुसगीच्या फुलांनी सजवलेली काठी असते. ढोलाच्या ठेक्यावर गड्यांची पावले मागे-पुढे पडतात. प्रत्येक गड्याच्या मांडावरील हालचालींना गूढ वलय वेढून राहिलेले असते. मातीचा मांड, त्यावर अवसराच्या भरात गड्यांचे धीरगंभीर नृत्य, सभोवताली रसिकांची जमलेली गर्दी आणि स्मशानभूमीतून आणलेले विविध घटक; एक विचित्र, भयावह व रहस्यमय असे काहीतरी समोर घडत आहे याची जाणीव करून देणारेच हे दृश्य असते.
पंचवीस-तीसच्या आसपास गडे असतात. डिचोलीतील पिळगाव येथील हा उत्सव होळी पौर्णिमेला सकाळीच ग्रामदेवता शांतादुर्गा मंदिराच्या शेजारील मांडावर पार पडतो. गडे बराच वेळ मांडावर एका भारावलेल्या अवस्थेत फिरत राहतात. ढोलवादन चालूच असते. एका अनोख्या जगात सर्व गडे पोहोचलेले असतात. चारही बाजूंनी हा उत्सव डोळे भरून पाहण्यासाठी गावोगावातून आलेले लोक भय, आश्चर्य आणि रहस्य इत्यादी भावना उरीपोटी एकवटून यात सहभागी झाले असतात. गड्यांचा अवसर आलेल्या व्यक्ती एका वेगळ्या विश्वात, कोणतीतरी अनामिक अतिमानवी शक्ती संचारल्यागत मांडभर संथ पावले टाकत फिरतात.
वादन, नमन आणि गायनाच्या पार्श्वभूमीवर चाललेल्या या उत्सवात एकेक गडा नादावलेल्या अवस्थेत स्मशानातून आणलेले विविध घटक खांद्यावर वा हातात धरून विशिष्ट पदन्यास करीत फिरत राहतो. ठराविक वेळ झाला की, ज्या जागेवरून या सर्व गोष्टी आणलेल्या असतात, त्या पुन्हा त्याच जागी ठेवण्यासाठी ते धावत सुटतात आणि परत वेगाने मांडावर येतात. फेरी मारून तिथेच निचेष्ट पडतात. सर्व गडे स्मशानभूमीच्या दिशेने धावतात, ते तिथून परत मांडावर येईपर्यंत वादन-गायनाची लय कोठेही बदलत नाही. त्याचीच तर एक वेगळी नशा जमलेल्या प्रत्येकावर चढते.
'मसणातल्या गड्यानो
मसणान खेळा रे
मसणान खेळा गडे
मानून घेया रे'
ढोलवादन चालूच असते. वादन-गायनात कोठेही खंड पडत नाही की चाल बिघडत नाही. मानवी मृत्यू आणि स्मशानभूमी या जागा मानवी वस्तीपासून दूर असायच्या. एकदा मृतदेहाला पुरले वा जाळले की, मग तिथे जायची सहजासहजी कोणाचीही हिंमत होत नसे. पण इथे तर चक्क स्मशानभूमीशी निगडित सर्व घटक हातात व खांद्यावर घेऊन एका वेगळ्याच जगात वावरताना अनाकलनीय, अगम्य गुढत्वाची ओढ अनिवार्य लागलेली दिसते. एरव्ही सर्वसामान्य लोकांना सुद्धा या कृत्याची भीती वा किळस वाटत असते; इथे मात्र प्रत्येक जण हे दृश्य भयचकित वृत्तीने अनुभवत होता.
फाल्गुन मासात साजरा होणारा शिगमोत्सव आणि अशी अंगावर काटा आणणारी दृश्ये लोकमनाला नवीन नाहीत. डिचोलीतील पिळगाव गावचे हे गडे होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी संपन्न होतात. 'गडे उत्सव' ही तर शिगमोत्सवाची एक खास ओळख. त्यामध्ये साळचे गडे 'देवचार' संकल्पनेला जोडून घेतात, तर कुडणे, नार्वे आणि पिळगावच्या गडे उत्सवात स्मशानभूमीशी संबंधित अतर्क्य गोष्टींची भीती मनाला वेढून राहते. उत्साह, आनंद, उन्मेष आणि चैतन्य फाल्गुन मासात अनुभवता येते. गोवा-कोकणात या उत्सवाची झिंग मोठी आहे. गडे उत्सवाचेच वैविध्यपूर्ण प्रकार अनुभवता येतात. प्रत्येक गाव शिगम्याच्या उत्सवातील स्वतःचे वेगळेपण जतन करीत आलेला आहे.
एकेकाळी निसर्गसंपन्न असलेला डिचोली तालुक्यातील पिळगाव गाव आज खाणींच्या भक्ष्यस्थानी पडलेला दिसतो. सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. डोंगर उघडे-बोडके झालेले, पाण्याची कमतरता आणि शेतीवाडी उद्ध्वस्त झालेली दिसते. मानवी जीवन, नैसर्गिक जलस्रोत आणि जैवविविधता यांना मुळापासून हलवणारा हा बदल सर्वच पातळ्यांवर घडून आला. गाव आणि घर सोडून कित्येकांनी कामधंदा व शिक्षणाच्या निमित्ताने दूर राहणेच पसंत केले. हे असे असले तरीही मातीची ओढ पावलांना लागते आणि मग सुरू होतो प्रवास सण-उत्सवात सहभागी होण्यासाठी.
अदृश्य अनाकलनीय शक्ती निसर्गात वावरत असल्याची श्रद्धा लोकमानसाने आपल्या जगण्यात नेहमीच बाळगलेली आहे. घनदाट जंगल, अथांग खोल डोह, महाकाय वृक्षराजी, धबधबे आणि अमर्याद आकाश या सर्वांविषयी त्याला आश्चर्य आणि कुतूहल वाटत आलेले होते. शिवाय मनात अनाकलनीय भीती होतीच. या भीतीला श्रद्धेची जोड देत सण-उत्सवाच्या माध्यमातून लोकमानसाने स्वतःला आविष्कृत केले. इतकेच नाही तर दैवी तत्वाला संतुष्ट करण्यासाठी वैविध्यपूर्ण अघोरी, अनाकलनीय व गूढरम्य विधी, रूढी आणि परंपरा निर्माण केल्या. शिगमोत्सव फाल्गुन मासात येतो. होळीच्या माध्यमातून प्रकृती-पुरुषाच्या मिलनाचे तत्व अधोरेखित होते. पुढे येणाऱ्या चैत्राला नवपालवी फुटणार असते. हा सर्जकतेचा उत्सव असतो. या सर्जकतेला गुढत्वाचे वलय देणारा हा गडे उत्सव अनुभवताना रहस्यमय जगात वावरायला होते, असा भास झाल्याशिवाय राहत नाही.

पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)