​अंधश्रद्धेचा बळी खवले मांजर

खवले मांजर हा जगातील सर्वाधिक तस्करी होणारा सस्तन प्राणी आहे. मानवी हाव, चुकीच्या समजुती आणि अंधश्रद्धेमुळे या निरुपद्रवी ‘जंगलाच्या सफाईदाराचे’ अस्तित्व आज धोक्यात आले असून दर तीन मिनिटाला एकाची शिकार होत आहे.

Story: साद निसर्गाची |
07th March, 11:40 pm
​अंधश्रद्धेचा बळी  खवले मांजर

खवले मांजर हा प्राणी त्याच्या शरीरावर असलेल्या कडक खवल्यांमुळे ओळखला जातो. इंग्रजीमध्ये या प्राण्याला 'पॅंगोलिन' असे म्हणतात. खवले मांजर दिसायला खूप वेगळे आणि अनोखे असते. त्याचे शरीर लांबट आणि मजबूत असते तर डोके लहान आणि नाक टोकदार असते. बारीक डोळ्यांच्या या प्राण्याची जीभ लांब (त्यांच्या शरीराच्या अर्ध्या लांबीची) व चिकट असते. पाय लहान पण मजबूत असतात. खवल्याची नखे टोकदार आणि तीक्ष्ण असतात. त्याची शेपटी लांब आणि जाड असते. खवले मांजराच्या संपूर्ण शरीरावर कडक तपकिरी रंगाचे खवले असतात. कॅरटिनपासून बनलेले हे खवले अत्यंत लवचिक आणि टिकाऊ असतात. कॅरटिन हे तेच प्रथिन आहे जे मानवी नखांमध्ये, केसांमध्ये व प्राण्यांच्या खुरांमध्ये आढळते.

​खवले मांजर हा एक कीटकभक्षी प्राणी आहे. तो आपल्या तीक्ष्ण नखांनी मुंग्यांची वारुळे व वाळवीची घरटी फोडतो व आपली लांब चिकट जीभ त्यामध्ये शिरकावतो. मुंग्या व वाळवी जिभेला चिकटताच खवले चटकन आपली जीभ आत ओढतो व कीटकांचे भक्षण करतो. अशा पद्धतीने तो जंगलातील कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवतो. म्हणूनच त्याला 'जंगलाचा सफाईदार' असेही म्हटले जाते.

​हा उष्णरक्तीय सस्तन प्राणी पिल्लांना जन्म देतो व त्यांची काळजी घेतो. मादीचा गर्भधारणा कालावधी साधारण ६५ ते ७० दिवस असतो. खवले मांजर एका वेळेस १ ते ३ पिल्लांना जन्म देते. मादी पिल्ले मोठी होईपर्यंत त्यांना आपल्या पाठीवर घेऊन फिरते. खवले मांजर हा शरीरावर खवले असणारा जगातील एकमेव सस्तन प्राणी आहे. खवल्यांचे हे संरक्षणात्मक आच्छादन या प्राण्याला पर्यावरणातील धोक्यांपासून संरक्षण देते. भक्षकांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी खवले मांजर एक खास पद्धत वापरतो. धोक्याची चाहूल लागताच हा प्राणी आपले अंग एखाद्या गोळ्यासारखे गुंडाळून घेतो. स्वतःला गुंडाळताच त्याच्या शरीरावरील कडक खवले बाहेरच्या बाजूने उघडतात. अशा अवस्थेत शत्रू त्याच्यावर हल्ला करायला जात नाही. हा प्रामुख्याने रात्री सक्रिय असणारा निशाचर प्राणी आहे.

​भारतात प्रामुख्याने खवले मांजराच्या प्रजातीतील 'भारतीय खवले मांजर' आढळते. हा प्राणी जास्त करून जंगल आणि गवताळ प्रदेशात आढळतो. कधी कधी हा शेताजवळही दिसून येतो. हा जंगलात, गवताळ भागात किंवा शेताजवळील मऊ जमिनीत आपले बीळ खणतो. आपल्या तीक्ष्ण नखांनी हळूहळू माती खोदून हा लांब बोगद्यासारखे बीळ तयार करतो आणि बिळाच्या टोकाला विश्रांती घेण्यासाठी सुरक्षित जागा बनवतो. हे बीळ त्याला उष्णता, पाऊस आणि शत्रूपासून संरक्षण देते.

​खवले मांजर हा पर्यावरणातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग आहे, पण दुर्दैवाने हा जगातील सर्वाधिक तस्करी होणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. अवैध तस्करी, शिकार आणि बेकायदेशीर व्यापारामुळे या प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेकदा चुकीच्या समजुतींमुळे याला तस्करीला सामोरे जावे लागते. 'पॅंगोलिनचे खवले धारण केल्यास भाग्य उजळते' यासारखे गैरसमज त्याचा बळी घेतात. जादूटोणा, पारंपरिक किंवा धार्मिक प्रथांमध्ये पॅंगोलिनच्या अवयवांचा अवैधरीत्या वापर केला जातो. कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय चीनसारख्या देशात पॅंगोलिनचे खवले आणि मांस औषधासाठी वापरले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असलेल्या मागणीमुळे या प्राण्यांची जास्त तस्करी केली जाते. दुर्मिळ असल्याने काही लोक खवले मांजरला पाळीव प्राणी म्हणून विकत घेतात. दर तीन मिनिटाला एक खवले मांजर अंधश्रद्धेची शिकार ठरते असे संशोधन सांगते. यामुळे हा प्राणी पृथ्वीवरील सर्वात जास्त अवैध तस्करी होणारा सस्तन प्राणी ठरला आहे. खवले मांजर हा एक अत्यंत लाजाळू आणि निरुपद्रवी प्राणी आहे. केवळ मानवी हाव आणि चुकीच्या समजुतींमुळे याचा बळी जातो.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका इलेक्ट्रिकल आणि
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)