
डिचोली : कारापूर–सर्वण हमरस्ता परिसरात शुक्रवारी रात्री ११ वा. सुमारास बिबट्या आणि दुचाकीची धडक होऊन भाऊ-बहीण जखमी झाले. डिचोली येथील भाऊ-बहीण घोडेमोडणी उत्सव पाहण्यासाठी आले होते. ते दुचाकीवरून रात्री हरवळेच्या दिशेने जात असताना हमरस्त्यावर बसलेल्या बिबट्याला दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले.
धडकेनंतर बिबट्या काही वेळ रस्त्यावरच पडून राहिला; मात्र नंतर तो जंगलाच्या दिशेने पळून गेला. जखमी अवस्थेत दोघांनाही साखळी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारानंतर दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.