खटला मेरशीतील उत्तर गोवा प्रधान सत्र न्यायालयात वर्ग

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ अग्नितांडव प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमवर्ग न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील हे प्रकरण असल्यामुळे हा खटला मेरशी येथील उत्तर गोवा प्रधान सत्र न्यायालयात वर्ग केला असून येत्या १६ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या दुर्घटने प्रकरणी हणजूण पोलिसांनी गेल्या २६ फेब्रुवारी रोजी म्हापसा येथील प्रथमश्रेणी न्यायालयात १४ संशयित आरोपींविरुद्ध ३०६ साक्षीदारांच्या साक्षीसह ४१५० पानी आरोपपत्र सादर केले होते. हा खटला सदोष मनुष्यवधाचा आहे. त्यामुळे हा खटला प्रथमवर्ग न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्यामुळे हा खटला मेरशी येथील प्रधान सत्र न्यायालयात वर्ग करण्यात येत असून सर्व संशयित आरोपींनी दि. १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता प्रधान सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर रहावे, असा आदेश म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश ज्यूड सिक्वेरा यांनी दिला आहे.
या खटल्यातील संशयित आरोपी अजय गुप्ता, सौरभ लुथरा, गौरव लुथरा, राजीव उर्फ राजीब मोडक, विवेक सिंग व बिजय कुमार हे न्यायलयीन कोठडीत आहेत. तर बिजय सिंग, प्रियांशू ठाकूर, राजवीर सिंघानिया, रेशन रेडकर, रघुवीर बागकर व भरत कोहली हे जामिनावर आहेत.
या सर्वांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या १०५, १२५, १२५(अ), १२५ (ब), २८७, ३३८, ३३६(३), ३४०(२), ६१(२), २३८, २४१, ३(७) व ३(५) कलमान्वये नोंदवलेल्या गुन्ह्याखालील खटल्याची सुनावणी प्रधान सत्र न्यायालयात सुरू होणार आहे.
सुरींदरकुमार खाेसला अद्याप फरारच
के. इव्हेंट प्रा. लि. कंपनीचे संचालक मयुर कोलवाळकर व सरव्यवस्थापक मोहम्मद अफिफ बतेरी यांना अद्याप अटक झालेली नाही. शिवाय बर्च क्लब जागेचा मालक सुरींदरकुमार खाेसला हा फरार असून त्याच्या विरोधात अटक वॉरंन्ट आणि प्रोक्लेमेशन आदेश जारी करण्यात आला आहे.