सुमारे ५ हजार नागरिकांचा सहभाग : चारित्र्यहनन खपवून घेणार नाही

विश्वजीत राणे यांच्या समर्थनार्थ भव्य निषेध सभेला उपस्थित नागरिक.
वाळपई : नगरनियोजन कायद्यातील दुरुस्तीवरून मंत्री विश्वजीत राणे यांना लक्ष्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात सत्तरी तालुक्यातील जनता आक्रमक झाली आहे. शनिवारी वाळपई येथील हातवाडा जंक्शन येथे आयोजित निषेध सभेत सुमारे ५ हजारांहून अधिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून राणे यांना आपला ठाम पाठिंबा दर्शविला. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला तरी, मंत्र्यांचे वैयक्तिक चारित्र्यहनन करणे ही गोव्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारी बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सभेतील वक्त्यांनी पणजी येथील आंदोलनादरम्यान मंत्री राणे यांची ‘तिरडी’ काढण्याच्या प्रकाराचा कडक शब्दांत निषेध केला. राजकीय विरोधासाठी मंत्र्यांच्या खासगी निवासस्थानावर मोर्चा नेणे आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास देणे हे निंदनीय आहे, असे मत विविध पंचायतींच्या सरपंचांनी व्यक्त केले. वाळपईचे नगराध्यक्ष प्रसन्न गावस आणि जिल्हा पंचायत सदस्य नीलेश पवार यांनी राणे यांना सत्तरीच्या विकासाचा आधारस्तंभ संबोधले.
मेणबत्त्या प्रज्वलित करून पाठिंबा
सभेच्या शेवटी, मंत्री विश्वजीत राणे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत सर्व नागरिकांनी मेणबत्त्या प्रज्वलित केल्या. सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर उदय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. या सभेत तालुक्यातील दोन्ही मतदारसंघांतील सरपंच, पंच सदस्य आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्तरीच्या स्वाभिमानासाठी शक्तिप्रदर्शन
आंदोलकांकडून होत असलेल्या बदनामीच्या प्रयत्नांमुळे सत्तरीच्या स्वाभिमानाला ठेच लागली असून, गरज पडल्यास पणजी येथे हजारोंच्या संख्येने शक्तिप्रदर्शन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. वाळपई नगरपालिकेतून निघालेली रॅली हातवाडा जंक्शन येथे सभेत रूपांतरित झाली, जिथे ‘विश्वजीत राणे आगे बढो...’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.