पेडणे पोलिसांनी घेतले ९ जणांना ताब्यात

पणजी : गोव्यातील (Goa) धारगळ (Dhargal) येथे इतरांबरोबर तीन बेकायदेशीर बांधकामांची पाहणी करण्यासाठी गेलेले ॲड. सदानंद वायंगणकर यांच्यावर केलेल्या हल्लाप्रकरणाची मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी (Pernem Police) निवृत्त पोलीस सज्जन कोनाडकर याच्यासहीत ९ जणांना ताब्यात घेतले आहे.
धारगळ येथे काल शुक्रवारी वरील प्रकरण घडले होते. ओशेलबाग परिसरात सर्व्हे क्रमांक ५४७/० या जागेवर तीन बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आली असल्याची तक्रार नीलेश धर्मा पटेकर यांनी सरकारी खात्यांकडे केली होती.
या तक्रारीला अनुसरून गटविकास कार्यालयामार्फत धारगळ पंचायतीतर्फे काल शुक्रवारी पंचनामा करण्यासाठी धारगळचे सरपंच अर्जुन कानोळकर, पंचायत सचिव प्रीतम सावंत, गटविकास कार्यालयाचे अभियंता आणि ॲड. सदानंद वायंगणकर गेले होते. त्यावेळी ॲड. वायंगणकर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणाचे पडसाद काल विधानसभा अधिवेशनात उमटले होते.