प्रतिबंधात्मक कारवाईनंतर आज दाखल झाला गुन्हा

पणजी : गोव्यातील (Goa) सावर्डे (Sanvordem) विधानसभा मतदारसंघातील मिराबाग येथील प्रस्तावित बंधारा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी विधानसभेच्या (Assembly) प्रेक्षक गॅलरीत येऊन फलक झळकावून सरकारचा (Government) निषेध केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध पर्वरी पोलिसांनी भारतीय न्याय संस्थेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. या चारही जणांना काल प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक करण्यात आली होती.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशनात काल शुक्रवारी पहिल्याच दिवशी मिराबाग बंधारा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी चारजण फलक घेऊन प्रेक्षक गॅलरीत गेले व फलक उंचावून निषेध केला. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. त्याचबरोबर विधानसभेच्या कडक मानल्या जात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
आंदोलकांच्या या कृतीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. संबंधितांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली होती. सभापती गणेश गावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी काल आपा नाईक, उपेंद्र नाईक, उमेश नाईक, हेमंत भंडारी या चार जणांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली होती. पर्वरी पोलिसांनी आता या चारजणांविरुद्ध भारतीय न्याय संस्थेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.