
पणजी : महाविद्यालयात (College) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students) गणवेश (Uniform) सक्ती नसावी अशी मागणी एनएसयुआय (NSUI) आणि गोवा विद्यापीठ (Goa University) विद्यार्थी मंडळातर्फे करण्यात आली.
याबाबत दोन्ही संघटनेच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. संघटनांच्या मागण्या योग्य व्यासपीठावर मांडण्याची विनंती त्यांनी आलेमाव यांना केली. यावेळी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६५ टक्के उपस्थिती, सायबर एज योजना पुन्हा सुरू करणे अशा मागण्या देखील करण्यात आल्या.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी सज्ञान असतात. त्यांनी शालेय जीवनात गणवेश वापरलेला असतो. असे असताना महाविद्यालयात देखील गणवेश सक्ती केल्यास विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येऊ शकते.
सक्तीच्या गणवेश धोरणामुळे ठराविक पद्धतीचे गणवेश विकत घ्यावे लागतात. यामुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार वाढत आहे. राज्यातील दमट वातावरणामुळे प्रमाणित गणवेश त्रासदायक ठरू शकतात. अर्धवेळ नोकरी करणाऱ्यांसाठी देखील गणवेश उपयुक्त नाहीत. स्वतंत्र विचाराला पाठिंबा देण्यासाठी गणवेश सक्ती नसावी.
याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी सायबर एज योजना पुन्हा सुरू करावी. निवडून आलेल्या विद्यार्थी मंडळाला दोन लाख रुपये पर्यंत निधी, मासिक पाळीच्या काळात महिला विद्यार्थ्यांना सुटीचे धोरण सुरू करणे, महाविद्यालयात चालू स्थितीतील कॅम्पस प्लेसमेंट केंद्र कार्यान्वित करणे, पुनर्मूल्यांकनासाठी अध्यादेश ओए-२५ पुन्हा सुरू करणे, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी सेमिस्टर परीक्षा नंतर काही काळ विश्रांती देणे अशा मागण्या देखील करण्यात आल्या.