हडफडे, हणजूणमधील घरफोडी प्रकरण : आंध्रप्रदेशमध्येही गुन्हे दाखल

म्हापसा : हडफडे व हणजूण येथील घरफोडी प्रकरणी आरोपी मदिरीकरी विक्की उर्फ शेख समीर (रा. अनंथपूर आंध्रप्रदेश) याला दोषी घोषित करून म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने सहा महिने कारावासाची शिक्षा दिली. मदिरीकरी विक्की हा सराईत गुन्हेगार असून आंध्रप्रदेशमध्ये त्याच्यावर १ कोटी रुपयांच्या सुवर्णलंकारांच्या चोरीसह पाच गुन्हे नोंद आहेत.
न्यायाधीश ज्यूड सिक्वेरा आणि न्यायाधीश अक्षता काळे यांनी याबाबतचा निवाडा दिला. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे वकील पी. फडते व टी. चोडणकर यांनी, तर संशयितातर्फे एम. पवार यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते.
दोन्ही चोरीच्या घटना जून २०२५ मध्ये घडल्या होत्या. पहिली चोरीची घटना दि. १७ जून रोजी सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान मायना भाटी, हडफडे येथे घडली होती. फिर्यादी ब्रेंडन माथाईस यांच्या घरात चोराने खिडकीचे ग्रील्स काढून १ लाख रुपयांचे मॅकबूक तसेच मर्सडीज आणि बलेनो कारची चावी लंपास केली होती.
दुसरी चोरीची घटना २२ जून रोजी पहाटे ३.१५ वा. सुमारास घडली होती. चोराने हणजूण येथील चार्वी रिमिझ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटच्या खिडकीवरील स्लायडिंग दरवाजा उघडून आतील दोन मोबाईल, एक एअरपॉड आणि १ हजार रुपये रोख रक्कम असा ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी पर्यटक रौशन रंजन (बिहार) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या दोन्ही चोरी प्रकरणी हणजूण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३०५ कलमान्वये घरफोडीचा गुन्हा नोंद केला होता.
पोलीस तपासात आरोपी मदिरीकरी विक्की उर्फ शेख समीर याचा या चोरीमागे समावेश असल्याचे आढळून आले होते. परंतु आरोपी हा आपल्या मूळ गावी पसार झाल्याचे समोर येताच आंध्रप्रदेश पोलिसांच्या मार्फत त्याला अटक केली होती. अनंतपूर टाऊन पोलिसांनी आपल्या गुन्ह्यांमध्ये मदिरीकरी याला अटक केल्यानंतर हस्तांतरण केल्यावर हणजूण पोलिसांनी त्याला अटक केली होती.
आरोपीचा साथीदार जामीन मिळाल्यानंतर फरार
हणजूण येथील चार्वी रिमिझ अपार्टमेंटमधील चोरीमध्ये आरोपीचा साथीदार मंचिनेणी संतोष कुमार (रा. अनंथपूर, आंध्रप्रदेश) यालाही पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटका झाल्यापासून हा संशयित आरोपी फरार आहे.