होळी अंगावर पडून एकाचा मृत्यू, तर म्हापशात होळी पार्टीत हाणामारी

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२६-२७ सालासाठी ३०,१९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. धारगळ येथे बेकायदा बांधकामाचा पंचनामा करताना वकिलाला मारहाण करण्यात आली. म्हापशात होळी पार्टीत मारामारी होऊन युवतीसह चार जण जखमी झाले. याशिवाय आगीत म्हावळिंगेतील किराणा दुकान भस्मसात झाले. याशिवाय फसवणूक, अपघाताच्या घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार

कारापूर येथील तरंगोत्सव उत्साहात
कारापूर साखळी येथील देव श्री रवळनाथ भूतनाथच्या तरंगोत्सवाची मंदिरात दाखल झाल्यानंतर सांगता झाली. कारापूर येथील श्री रवळनाथ मंदिरातून बाहेर पडलेल्या तरंग देवतांनी सहा दिवस संपूर्ण गावातील घरांना भेट दिल्यानंतर रविवार दि. १ मार्च रोजी देव मंदिरात दाखल झाले.
किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाची फेररचना
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने तीन वर्षांच्या कालावधीसाठी १६ सदस्यीय गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाची (जीसीझेडएमए) पुनर्रचना केली आहे. गोवा सरकारचे पर्यावरण सचिव अध्यक्ष तर पर्यावरण संचालक सदस्य सचिव असतील.
कळंगुटमध्ये आर्थिक व्यवहाराच्या वादातून सुरीहल्ला
कळंगुट येथील बागा सर्कल जंक्शनजवळ आर्थिक व्यवहाराच्या वादातून करण मागरे (२४, रा. कळंगुट व मूळ महाराष्ट्र) या स्पाच्या कामगारावर सुरीहल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी समीर सिंग रजपूत (रा. कळंगुट व मूळ राजस्थान) याला अटक केली.
सोमवार

पणजीत पासपोर्ट भवनात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल
पणजीतील पाटो येथील पासपोर्ट भवन इमारतीत बॉम्ब असल्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र सखोल तपासणीनंतर हा कॉल केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्री राणेंच्या बंगल्यासमोर आंदोलन करणाऱ्या नेत्यांची चौकशी
नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या बंगल्यासमोर कलम ३९ (अ) विरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांची पणजी पोलीस स्थानकात चौकशी करण्यात आली. ही कारवाई केवळ विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आगीत म्हावळिंगेतील किराणा दुकान भस्मसात
डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे येथे लागलेल्या भीषण आगीत व्यापाऱ्याचे किराणा मालाचे दुकान पूर्णपणे भस्मसात झाले. या आगीत दुकानातील साहित्यासह इमारतीचेही प्रचंड नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पाच लाख रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जळून खाक झाली आहे.
मंगळवार
चिंचणी येथे घराला भीषण आग; ७० वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू
सासष्टी तालुक्यातील चिंचणी येथे एका भाड्याच्या खोलीला लागलेल्या भीषण आगीत होरपळून ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमती नाईक असे मृत वृद्धेचे नाव असून, या आगीत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

होळी अंगावर पडून जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
मेणकुरे येथे होळी उत्सवादरम्यान घडलेल्या घटनेत मेणकुरे येथील प्रणव पांडुरंग मिशाळ (४२) या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गावातून होळी नेत असताना ती अचानक त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
खोतोडा येथे बेकायदेशीर चिरेखाणीवर वाळपई पोलिसांकडून छापा
खोतोडा पंचायत क्षेत्रातील माळशेकरवाडा येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीवर वाळपई पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात मशिनरी व साहित्य जप्त केले. या प्रकरणी जमिनीचे मालक सडयो यशवंत माळशेकर (रा. माळशेकरवाडा, खोतोडा) यांच्यावर भारतीय न्याय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार
गोमंतक भंडारी समाज समितीवर एस. व्ही. नाईक प्रशासक नियुक्त
गोमंतक भंडारी समाज समितीमध्ये दोन गटांत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. निवृत्त सरकारी अधिकारी एस. व्ही. नाईक हे सहा महिन्यांसाठी प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. भंडारी समाज समितीची निवडणूक घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
महिलेला १४.६७ लाखांना लुबाडणाऱ्यास हुबळीतून अटक
तिसवाडी तालुक्यातील एका ज्येष्ठ महिलेला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) अधिकारी असल्याचे भासवून तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वापर करून १४.६७ लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने हुबळी येथून मोहन कळवे याला अटक केली.

कळंगुट येथे गेस्टहाऊसला आग
तिवायवाडा, कळंगुट येथील स्प्रिंग कॉटेज या गेस्ट हाऊसला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने दोन कॉटेजिससह एक स्टोअर रूम जळून भस्मसात झाला. एक पर्यटक दाम्पत्य आणि एका कर्मचाऱ्याला अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. दुर्घटनेत १५ लाखांचे नुकसान झाले.
गुरुवार
नौदलात कार्यरत पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नी दोषी
वास्को येथे २०१९ मध्ये कौशलेंद्र प्रताप सिंग (३३) या नौदल जवानाचा कौटुंबिक वादातून खून झाला होता. याप्रकरणी पत्नी संध्या चौहान हिला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. शुक्रवारी आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे.
म्हापशात होळी पार्टीत मारामारी; युवतीसह चार जण जखमी
बोडगिणी म्हापसा येथे होळीनिमित्त आयोजित ‘होळी पार्टी इव्हेंट’ या विशेष संगीत कार्यक्रमात दोन गटांतील वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये एका युवतीसह चारजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात १० जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
युदियो कंपनीच्या एमडीसह ६ जणांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आरोपपत्र दाखल
राज्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून सुमारे ३ कोटींहून जास्त रुपयांचा गंडा घालण्यात आला. मनी लॉन्ड्रिंगचा दावा करून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) युदियो प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कृष्ण कुमार उर्फ विजय कुमार जैस्वाल, त्याची पत्नी रश्मी जैस्वाल यांच्यासह इतर चार जणांविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात ३००० पानी आरोपपत्र दाखल केले.
शुक्रवार
राज्याचा अर्थसंकल्प सादर
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२६-२७ सालासाठी ३०,१९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यावर्षी २९,१८१ कोटी रुपयांचा महसूल येण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. विशेष अशा नव्या योजना नसल्या तरी दहा वर्षे कंत्राटी सेवेत पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत नियमित करणे, लाडली लक्ष्मी, गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या मानधनात वाढ करणे, तसेच २५०० नव्या सरकारी नोकऱ्या भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.
मिराबाग बंधाऱ्याविरोधात विधानसभेत फलक दाखवू्न निदर्शन
मिराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी अनपेक्षितपणे विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून फलक झळकावून सरकारचा निषेध नोंदवला. या प्रकारामुळे विधानसभेच्या अत्यंत कडक मानल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आंदोलकांच्या या कृतीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त करून संबंधितांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
धारगळ येथे बेकायदा बांधकामाचा पंचनामा करताना वकिलाला मारहाण
समाज कार्यकर्ते अॅड. सदानंद वायंगणकर हे धारगळ येथील तीन बेकायदेशीर बांधकामा संदर्भात पंचनामा करायला गेले असता, पोलीस व सरकारी यंत्रणेच्या उपस्थितीत स्थानिकांनी त्यांना जबर मारहाण केली.
शनिवार
वायंगणकर मारहाणप्रकरणी ९ जण पोलिसांकडू्न ताब्यात
धारगळ येथे ॲड. सदानंद वायंगणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील निवृत्त पोलीस सज्जन कोनाडकर याच्या समवेत ९ जणांना पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विधानसभेत घोषणाबाजी केलेल्या ४ जणांविरुद्ध गुन्हा
मिराबाग येथील प्रस्तावित बंधारा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत शिरून फलक झळकावणाऱ्या चार जणांविरुद्ध पर्वरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवले आहेत. शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे विधानसभेत एकच खळबळ उडाली होती.
लक्षवेधी
पीडित विदेशी महिलेची न्यायालयात उलटतपासणी झाली नाही. तसेच खटला पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून होता, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने हरमल येथे २०२१ मध्ये इटालियन महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातून केरळ येथील सिमिल मणी या युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
कोकेन बाळगल्याबद्दल इस्रायली ड्रग्ज तस्कर डेव्हिड ड्रिहम ऊर्फ डुडू याच्याविरुद्ध मेरशी येथील विशेष (एनडीपीएस) न्यायालयाने आरोप निश्चित केला आहे. याबाबतचा आदेश न्या. ईर्शाद आगा यांनी दिला. या प्रकरणी केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने गुन्हा दाखल केला होता.
गोव्यात एलडीसी, शिपाई, शिक्षक, अकऊंटंट, पंचायत सचिव, लॅबोरेटरी असिस्टंट यासारख्या ‘क’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची निवड कर्मचारी भरती आयोगामार्फत होत आहे. आतापर्यंत कर्मचारी भरती आयोगामार्फत विविध पदांसाठी मिळून फोंड्यातील सर्वाधिक म्हणजे ६३ उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
मार्ना शिवोली येथे सुमारे १०० वर्षे जुन्या वडाचा काही भाग कोसळल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले. या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतूक खोळंबली. म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर कोसळेलेले हे झाड कापून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.