प्रत्येक मतदारसंघांत १०० कोटींच्या विकासकामांची तरतूद

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सादर केलेला ३० हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात विकासासह लोकाभिमुख कामे करण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. भाजपच्या डबल इंजिन सरकारची जनसेवेप्रती असलेली कटिबद्धता स्पष्ट होते, असे मत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केले. शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार दाजी साळकर उपस्थित होते.
दामू नाईक म्हणाले की, अर्थसंकल्पाद्वारे जुन्या योजना अधिक बळकट करत नवीन योजना आणल्या आहेत. पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भेदभाव न करता प्रत्येक मतदारसंघात १०० कोटी रुपयांची विकासकामे करण्यास तरतूद करण्यात आली आहे. सामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या डीएसएसआर, गृह आधार योजनांतील निधी वाढवण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
दहा वर्षे कंत्राटावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार आहे. एसटी समाजाचा विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कुशावती जिल्ह्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे येथे पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. डिजिटल टॅक्सी धोरणामुळे अनेक वर्ष प्रलंबित असणारा टॅक्सी प्रश्न सुटणार आहे. याद्वारे स्थानिक टॅक्सी चालकांचाच फायदा होणार आहे. वाढत्या महागाईचा विचार करून दीनदयाळ स्वास्थ सेवा योजनेचा निधी वाढवण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात नारीशक्तीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या महिलांना ट्युशन फी माफ करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृह उभारण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एसटी बांधवांसाठी असलेल्या अटल आसरा योजनेचा निधी १.५ लाख रुपयांवरून ३ लाख करण्यात आला आहे. याबाबत आम्हाला अनेक जणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. माझे घर योजनेमुळे जमीन सोसायटीच्या नावे करणे सुलभ होणार आहे. लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आम्ही पक्षातर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करतो, असे नाईक यांनी सांगितले.
अर्थसंकल्प ‘स्वयंपूर्ण गोवा’साठी उपयुक्त
दाजी साळकर म्हणाले की, अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसह मानवी विकासावर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पामुळे पर्यटन, दळणवळण, आरोग्य, शिक्षण, उद्योग क्षेत्राला फायदा होईल. स्वयंपूर्ण गोवाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा अर्थसंकल्प उपयुक्त ठरणार आहे.