यश हा दशमीच्या आयुष्यातील कधीच न विसरणारा अध्याय होता. पहिल्या अपत्याच्या जाण्याने दाटलेल्या काळोखात, पाच वर्षांनंतर सोनूच्या निरागस हसण्याने आणि तिच्या उजेडाने त्यांना पुन्हा जगण्याचे नवीन बळ आणि उमेद दिली.

आज सोनूचा पाचवा वाढदिवस होता. एका प्रशस्त हॉलमध्ये, रोषणाईच्या झगमगाटात आणि कुटुंबाच्या गराड्यात हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत होता. दशमी आणि तिचा पती सुजय अतिशय आनंदात होते. खरं तर दृष्ट लागावी असाच त्यांचा हा सुखी संसार होता; पण अचानक भूतकाळातील काही आठवणींनी दशमीच्या डोळ्यांतून वाट काढली.
तिच्या डोळ्यांतील पाणी पाहून सुजय हळूच जवळ आला आणि म्हणाला, "अगं, का रडतेस? आता विसर ना ते सगळं... बघ, आपली सोनू आज पाच वर्षांची झाली आहे. किती खुश आहे ती!" सोनालीकडे (सोनू कडे) बोट दाखवत त्याने तिला सावरलं.
दशमीने डोळे पुसले आणि ती पुन्हा त्या उत्साहात सामील झाली. नर्तकींचे नृत्य, वेटरची धावपळ आणि पाहुण्यांची वर्दळ यामुळे वातावरण चैतन्यमयी होते. मुलांसाठी मजेशीर खेळ झाले. आजी आणि मामाच्या हस्ते सोनालीकडून सर्वांना बक्षिसे वाटण्यात आली. त्यानंतर केक कापला गेला आणि सोनूचा पाचवा वाढदिवस अगदी थाटामाटात संपन्न झाला.
दुसऱ्या दिवशी दशमी कालचे फोटो पाहत होती. सुजयसोबत चहा पिताना ती अचानक म्हणाली, "आपला यश आज असता, तर तो सात वर्षांचा झाला असता ना रे?.." इतकं बोलताना तिचा कंठ दाटून आला.
सुजय तिला समजावत म्हणाला, "दशमी, तुला किती वेळा सांगितलंय की त्याची आठवण काढू नकोस. आठवण आली की तुला खूप त्रास होतो."
यश... सुजय आणि दशमीचं पहिलं अपत्य. पहिल्यांदा आई-बाबा होणार ही बातमी समजल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. डोहाळे जेवण, बारसं सगळं कसं स्वप्नवत आणि थाटात पार पडलं. नॉर्मल डिलिव्हरी झाली होती, बाळ सुखरूप होतं.
पण काही महिन्यांतच आनंदाला दृष्ट लागली. यश चार महिन्यांचा असताना लक्षात आलं की त्याची शारीरिक वाढ होत नाहीये. त्याला मानही नीट धरता येत नव्हती. मोठ्या हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला एक दुर्धर आजार आहे आणि त्यावर काहीच उपाय नाही.
दुर्दैवाचा तो फेरा थांबला नाही. यश अवघ्या आठ महिन्यांचा असताना, अचानक एका रात्री त्याला उलटी झाली आणि त्याचा श्वास कायमचा थांबला. सुजय आणि दशमीच्या पायाखालची जमीनच सरकली. हसत्या-खेळत्या जगात अचानक काळोख दाटला. "आपल्याच बाबतीत असं का घडलं?" या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं.
दशमीसाठी हा काळ खूप कठीण होता. या घटनेच्या वर्षभरापूर्वीच तिची आई कॅन्सरने गेली होती. आई नसताना गरोदरपणाचे दिवस तिने कसेबसे काढले होते. पण आता तर पोटचा गोळाही गेला होता. या धक्क्यातून सावरण्यासाठी दशमीने स्वतःला कामात झोकून दिलं. शाळा आणि घर या दोन भिंतीं पलीकडे ती कोणातही मिसळत नव्हती. बाहेर गेल्यावर लोक प्रश्न विचारून जखमा ताज्या करतील, याची तिला भीती वाटायची.
दोन वर्षं अशीच डोळ्यांतलं पाणी आणि काळजातली रुखरुख काळवंडून गेली. पण यंदाची गणेश चतुर्थी मात्र काहीतरी वेगळं चैतन्य घेऊन आली होती. गणरायाच्या आगमनासोबतच दशमी दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच आपल्या माहेरी, त्या जुन्या अंगणात पाऊल ठेवत होती. तिला दारात पाहताच घरच्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि सगळ्यांचं मन सुखावलं. दशमी आता सहा महिन्यांची गरोदर होती, तिच्या चेहऱ्यावर एक निराळं मातृत्व आणि काहीशी धाकधूकही दिसत होती. घरच्या प्रत्येकाने फुलासारखी तिची काळजी घेतली; आईच्या हाताचा मायेचा घास आणि वडिलांच्या डोळ्यांतील दिलासा तिला बळ देत होता. गणपती बाप्पाच्या चरणी सर्वांनी मनोभावे एकच साकडं घातलं की, "देवा, मागलं सगळं विसरू दे आणि यावेळी तरी दशमीच्या पदरात पूर्ण सुख पडू दे."
आणि अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला... गोंडस 'सोनू'चा जन्म झाला! तिच्या पहिल्या रडण्याने घराच्या भिंतींनाही जणू आनंदाचा पाझर फुटला. सोनूच्या येण्याने दशमीच्या काळोखलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा उजेड पडला. यशची आठवण कधीच न पुसली जाणारी, एक कायमची टोचणारी कळ आणि वेदनादायी अध्याय होता, जो त्यांच्या काळजात कायमचा कोरायला गेला आहे. त्याची जागा कोणीच घेऊ शकणार नव्हतं, पण सोनूच्या त्या इवल्याशा हातांनी आणि निरागस हसण्याने दशमीला पुन्हा एकदा जगण्याचं बळ आणि उमेद दिली. जणू यशनेच सोनूच्या रूपाने दशमीच्या आयुष्यात पुन्हा हसू परत पाठवलं होतं.

गौरी रोशन वेर्लेकर