रानमेवा

करवंदे, चुरणे, जांभळे बाजारात मिळतात; परंतु काट्याचे ओरबाडे मनगटावर मिरवीत करवंदाच्या जाळीतून काढलेली करवंदे अलगद दाढेखाली ठेवल्यानंतर रसाची जी धार त्याच्या चिकासकट आत झिरपायची, तो तसा रस आता अभावानेच अनुभवता येतो.

Story: लोकरंग |
28th February, 11:46 pm
रानमेवा

उन्हाळी सुट्टी सुरू झाली की पूर्वी मुलांची पावले वळायची ती रानमेव्याच्या शोधात. अंगाची लाहीलाही करणारा वैशाखातला वणवा भर दुपारी मुलांना घरी स्वस्थ बसू देत नसे. सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त रानोमाळ हिंडायचे; काटेकुटे तुडवत, दगडधोंड्यांना ठोकर देत - ढोपरं, कोपरं ओरबाडून घेत, रानमेव्यासाठी रानोमाळ हिंडणे व्हायचे. जांभळे, चारा, करवंदे, चुरना, फातरफळा, भेडसा अशी अनेक फळे ही पक्षी-पाखरांच्या बरोबरीने माणसांचीही असायची. मुलांसाठी  उन्हाळी सुट्टी सत्कारणी लागायची. 

शाळेतून घरी आल्या आल्या नदी-तळ्यावर आंघोळीला जायचे. मनसोक्त डुंबून झाल्यावर खूप भूक लागायची. आंबे-फणसांचा मौसम, त्यामुळे यथेच्छ ताव मारता यायचा. माळरानावर रखरखाट असायचा; तरीसुद्धा करवंदाच्या जाळीची टवटवीत पाने आणि टणक काट्यांच्या सहवासात झुबक्या-झुबक्यांनी करवंदे दिसायची. करवंदाच्या जाळीत हात घालून तेवढ्याच काळजीने ती काढताना हाताला डिंक लागायचा. अणकुचीदार, टणक असे काटे टोचायचे, शिवाय त्या झुडूपभर काळ्या रंगाच्या चावणाऱ्या मुंग्यांचे साम्राज्य असे. कधी कधी हुमल्याचे घरटे तिथे असायचे. या सगळ्या संकटांचा सामना करीत करवंदे काढताना ती पहिल्यांदा पोटात जात असत. ती घरी नेऊन धुवायची असतात व नंतर खायची असतात, ही शिस्त त्या वयात आणि त्यावेळी कधी पाळलेली आठवत नाही.

​करवंदे झुडुपावरून काढून ठेवण्यासाठी काहीही सोबत नसायचे, मग ओटीत ठेवण्याच्या प्रयत्नात ती खाली पडत आणि खाली पडताना त्यांना असलेल्या डिंकामुळे ती एकमेकांना चिकटायची. एखादे-दुसरे करवंद खाली पडले तर सहसा काही वाटत नसे; पण अशी एकदमच सगळी खाली पडली की मेहनत फुकट गेल्याचे दुःख मनात सलत राहायचे. झुडुपाखाली सुकलेल्या पानांचा खच पडलेला असायचा. तिथे असलेले काटे, मुंग्यांचा सामना करणे कठीण व्हायचे खरे; पण एकदा का आंबट-गोड चवीचा हा रानमेवा जिभेवरून हळूहळू दाढेखाली घेत, हलकेच दाब देत रसपान केले, की त्याची ती रसदार चव बाजारी द्राक्षांना सुद्धा मागे टाकत असे.

​कच्ची करवंदे लोणच्यासाठी, खारवण्यासाठी वापरात यायची. उकड्या तांदळाच्या पेजेबरोबर खळातील करवंदे, कैरीच्या फोडी लावून जेवतानाचा आनंद अवर्णनीय असाच होता. चाफरा, चारा, लालसर रंगाची चव आंबट-गोड. चारांच्या बियांना बाजारात मोठी मागणी. चाफरे आकाराने करवंदासारखी, तर 'चारा' काहीशी लहान. चवीच्या बाबतीत तर चारा उजवी ठरतात, असे ती खाणाऱ्यांना निश्चितच वाटणार. चारा पिकल्यानंतर काळपट रंगाची होतात. त्यातील बिया टणक असतात, त्या फोडून आतील गर खाल्ला तर चवीला खूपच चांगला लागतो. विविध प्रकारची मिठाई करताना, शिरखुरम्यात चाराच्या बियांमधील गराचा वापर होतो. चाफरे काहीशी नाजूक, झाडावरून काढून लगेच खाल्ली तर चव जिभेवर चढते; अन्यथा ती मऊ होतात व चवीत फरक जाणवतो.

​चुरणे ही काटेरी झुडुपावर असलेली फळे. पांढऱ्या रंगाची, गोल, पिठूळ छोट्या आकाराची फळे. फळांच्या आकाराच्या मानाने ती खाताना चोखून त्यातून बिया फेकून द्याव्या लागतात, म्हणून त्याचा बऱ्याच जणांना त्रास वाटतो. बुटक्या बटन मोगरीच्या कळ्यांसारखी दिसणारी चुरणे खाण्यातला आनंद काही वेगळाच. फातरफळे दिसायला फारशी आकर्षक नाहीत, त्याशिवाय झाडही मोठे. पानाआड झुबक्यांनी लागणारी फातरफळे सहजासहजी कोणाला आवडत नसत. लोकांना त्या भलेमोठ्या झाडाचीच ओढ मोठी होती. आंबट, तुरट चव आणि अतिशय छोटे फळ, त्यामुळे ते मुलांच्या हाताला लागत नसे. खाली पडलेली फळे खायची तर ती सुकून पडलेल्या पानांच्या ढिगाऱ्याखाली शोधावी लागायची. असे असले तरी त्या बालवयाने ही फळे सुद्धा भरभरून खाल्लेली आहेत.

​जांभळे, फणस, आंबे, कोकम या फळांची झाडे मोठी. जांभळाच्या झाडांवर चढण्यासाठी मोठी माणसेच पुढाकार घ्यायची. वर चढून फांद्या हलवल्या की रसाळ, नाजूक आणि मांसल जांभळे खाली पडायची. ती वरून जमिनीवर पडली की फुटायची, आतील गराला माती लागायची. म्हणून मग खाली एखादा कपडा धरून, तर कधी अंथरून त्यावर पडलेली जांभळे पोटभर खाल्ली जायची. ती झाडपिकी घोटे म्हणजे छोट्या आकाराचे पण चवीला छान लागणारे आंबे वाऱ्याने खाली पडायचे. त्यावर मालकी सांगायला सुद्धा कोणी येत नसे, त्यामुळे मुलांचेच राज्य असायचे. 'सासव' हा आंबट-गोड चवीचा पदार्थ मोठ्या प्रमाणात केला जायचा. काप्या, रसाळ फणसाचे गरे खाल्ले जायचे.

​कोकमाची फळे (भिरंडे), देठ काढून त्यात मीठ भरून ते रसदार फळ खाताना तोंडाला पाणी सुटायचे. झाडाची कोवळी लाल पाने चरचरून खाण्यातील आनंद औरच होता. कोकम फोडल्यानंतर त्यातील बिया चाखता चाखता कधी गटकन गिळणे व्हायचे हे लक्षात येत नसे. जांभळाचे झाड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. पूर्वी डांबरी रस्त्याशेजारी जांभळाची झाडे दिसायची, आता तीही दिसत नाहीत. जांभळे पिकून पडून वाया जातात. पावसाळ्यात जांभळांचा रस्त्यावर पडलेला सडा अपघातास कारणीभूत ठरतो, म्हणून बरीचशी झाडे कापून टाकण्यात आलेली आहेत. पण एकेकाळी हीच झाडे, जेव्हा प्रवासाची साधने नव्हती, तेव्हा वाटसरूंची भूक भागवायची. मधुमेहींसाठी गुणकारी असलेल्या या जांभळांचा भाव आज बराच वाढलेला आहे. इतकी वर्षे अगदी फुकट दिली तरी कोणाला नको असलेला हा रानमेवा बाजारातून विकत घेण्यासाठी आता स्पर्धाच लागलेली असते.

​रानात हिंडून रानमेवा खाण्याचे दिवस आता इतिहासजमा होत आहेत. करवंदे, चुरणे, जांभळे बाजारात मिळतात; परंतु काट्याचे ओरबाडे मनगटावर मिरवीत करवंदाच्या जाळीतून काढलेली करवंदे अलगद दाढेखाली ठेवल्यानंतर रसाची जी धार त्याच्या चिकासकट आत झिरपायची, तो तसा रस आता अभावानेच अनुभवता येतो.


- पौर्णिमा केरकर

(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, 

कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)