हा लेख माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप खास आहे; कारण नेहाची आई, श्रीमती नीलम मराठे आणि मी चौगुले कॉलेजमध्ये सहाध्यायी होतो. आज त्यांच्या मुलीने गाठलेली ही उंची पाहून मला एक मित्र म्हणून खूप अभिमान वाटतो.

मडगावच्या साध्या वातावरणात वाढलेली एक स्वप्नाळू मुलगी आणि पुढे जाऊन भारतीय हवाई दलात विंग कमांडर पदापर्यंत पोहोचलेली एक कर्तृत्ववान अधिकारी हाै प्रवास आहे विंग कमांडर नेहा विवेक मराठे (सेवानिवृत्त) यांचा. त्यांच्या आयुष्याची ही कहाणी केवळ वैयक्तिक यशाची नसून जिद्द, चिकाटी आणि देशसेवेच्या अढळ निष्ठेची प्रेरणादायी गाथा आहे.
नेहा यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडील विवेक मराठे आणि आई नीलम मराठे यांनी लहानपणापासूनच “कोणतेही स्वप्न मोठे नसते” हा संस्कार त्यांच्या मनावर रुजवला. आईने शिक्षणाचा मजबूत पाया घातला, तर वडिलांनी खेळ आणि विविध उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. या सर्वांमुळे नेहा एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून घडल्या. बॅडमिंटनमध्ये त्यांनी ‘नॅशनल स्कूल गेम्स’मध्ये दोनदा गोव्याचे प्रतिनिधित्व केले, ही त्यांच्या जिद्दीची साक्ष आहे.
हवाई दलात जाण्याची प्रेरणा त्यांना आठवीत असताना मिळाली. टीव्हीवरील एका मालिकेतून त्यांनी गणवेशातील शिस्त, साहस आणि अभिमान अनुभवला आणि तो क्षण त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्या दिवसापासून त्यांनी स्वतःला एका अधिकारीप्रमाणे घडवण्यास सुरुवात केली. प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक परीक्षा त्यांनी एका संधीप्रमाणे स्वीकारली.
आपले ध्येय स्पष्ट ठेवून त्यांनी दहावीनंतर विज्ञान शाखा निवडली आणि पुढे पाद्रे कॉन्सेसाओ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCE) मधून अभियांत्रिकी पूर्ण केली. शिक्षणादरम्यान त्यांनी चालू घडामोडींचा अभ्यास, वाचन आणि स्वतःच्या नोट्स तयार करण्यावर भर दिला. याच काळात त्यांची निवड टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये झाली होती. मात्र, त्यांच्या मनात एकच ध्यास होता, भारतीय हवाई दलात जाण्याचा.
पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) ची मुलाखत दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. TCS च्या ट्रेनिंगदरम्यानच मेरिट लिस्टमध्ये नाव आल्याची बातमी मिळाल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कॉर्पोरेट करिअर सोडले आणि एअर फोर्स अकॅडमीकडे वाटचाल केली.
जानेवारी २०११ मध्ये त्यांनी भारतीय हवाई दलात ‘एअर डिफेन्स इंजिनिअरिंग ऑफिसर’ म्हणून प्रवेश केला. देशाच्या आकाशाचे रक्षण करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या यंत्रणांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ईशान्येकडील जंगलांपासून ते पश्चिमेकडील वाळवंटांपर्यंत विविध ठिकाणी काम करताना त्यांनी अनेक आव्हानांना सामोरे जात नेतृत्व, धैर्य आणि सांघिक कार्याचे धडे आत्मसात केले. वडिलांच्या वयाच्या सैनिकांचे नेतृत्व करताना त्यांनी सिद्ध केले की खरे नेतृत्व पदाने नव्हे, तर कार्यक्षमतेने आणि सातत्याने मिळते.
२०१५ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ‘सर्व महिला अधिकारी’ तुकडीचा भाग होण्याचा सन्मान त्यांना लाभला. राजपथावर ताठ मानेने चालताना त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर बदलत्या भारताचे प्रतिनिधित्व केले. तो क्षण त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत अभिमानाचा ठरला.
हवाई दलाने त्यांना केवळ करिअरच दिले नाही, तर आयुष्याला नवे आयाम दिले. प्रशिक्षणादरम्यानच त्यांना जीवनसाथी मिळाला आणि आज त्या एका मुलीच्या आई आहेत. त्यांच्या मते, हवाई दलाने त्यांना ‘उडण्यासाठी पंख’ दिले आणि देशाची विविधता अनुभवण्याची संधी दिली.
आजच्या तरुणांना संदेश देताना त्या स्पष्टपणे सांगतात, “कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा.” कॉर्पोरेट क्षेत्रातील सुरक्षित वाट सोडून सशस्त्र दलात करिअर करणे म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर एक ध्येय आहे. गोव्यासारख्या छोट्या ठिकाणाहूनही मोठी स्वप्ने पूर्ण होऊ शकतात, याचे त्या जिवंत उदाहरण आहेत.
विंग कमांडर नेहा मराठे यांचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी एक प्रेरणा आहे स्वप्न पाहण्याची, त्यासाठी झगडण्याची आणि शेवटी त्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्याची.

- जॉन आगियार, + ९१ ९८२२१५९७०५