लोक काय म्हणतील? या यक्षप्रश्नाचा बळी : 'सुलभा'..!

Story: पुस्तक |
11th April, 11:07 pm
लोक काय म्हणतील?  या यक्षप्रश्नाचा बळी : 'सुलभा'..!

​​अलीकडच्या काळात तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की सारी दुनिया 'एक क्लिक' दूर आहे असं चित्र तयार होतंय. कमीत कमी, मोडक्या तोडक्या शब्दात थोडीफार कल्पना एआय निर्मित सॉफ्टवेअरला दिली मग ते चॅट जीपीटी असो वा जेमिनी की थोडेफार मुद्दे दिले असता त्यावर आधारित ते सॉफ्टवेअर आपल्याला हव्या त्या साच्यातला साहित्य प्रकार देतं; मग ती कविता असो, कथा असो वा लेख असो. आजकाल हे फार सोपं वाटू लागलं आहे, पण साहित्यनिर्मिती ही दैवी देणगी आहे. मानवी सृजन हे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचं प्रभावी साधन आहे. जगात अनेक भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेत अमाप साहित्यनिर्मिती झालेली आहे. तशीच आपल्या गोव्यात संस्कृतीची नाळ ज्या मराठीशी जोडली गेली आहे, तिच्यातून अनेक गोमंतकीय साहित्यिकांनी साहित्य निर्माण करून मायमराठीचं साहित्यदालन अधिक समृद्ध केलं आहे. आज मानव तंत्रज्ञानाशी अधिकाधिक जोडला जात असताना, गोव्यात अद्याप अनेक साहित्यिक हिरीरीने स्वतः साहित्य निर्माण करताना दिसत आहेत. कविता, कथा, नाटक, कादंबरी असे विविध साहित्यप्रांत ते हाताळताना दिसत आहेत, ही विशेष कौतुकाची बाब आहे.

​माझं वाचनवेड सर्वश्रुत असल्याने, माझ्या परिचयातील अत्यंत अभ्यासू म्हणून गणल्या जाणाऱ्या व्यक्तीने मला डॉ. विभा लाड यांची कादंबरी 'सुलभा' भेट म्हणून दिली. कादंबरी हा माझा आवडता प्रांत असल्याने मी तात्काळ वाचनाला सुरुवात केली. 'सुलभा' ही कादंबरी सुलभा या नायिकेभोवती फिरते. तिच्या आयुष्याचं वास्तवदर्शी चित्रण या कादंबरीत लेखिकेने केलं आहे. डॉ. विभा लाड या हिंदीच्या प्राध्यापिका असून 'सुलभा' ही त्यांची दुसरी मराठी कादंबरी आहे. त्यांच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे, 'सुलभा' हे त्यांनी ऐकलेल्या, पाहिलेल्या अनेक पीडित महिलांच्या वेदनेची गुंफण आहे. या कथानकाला काही अंशी सत्याची किनार असल्याने त्यांनी ठिकाणांचे वर्णन, आडनावाचा उल्लेख अशा काही ठळक गोष्टी टाळल्या आहेत. मात्र हे करत असताना सामान्यतः गोव्याचे ग्रामीण निसर्गचित्रण, इथल्या माणसांचे वर्णन, बोलीभाषेचा (कोंकणी) वापर उत्तम पद्धतीने केला आहे. कादंबरीची भाषा साधी, सोपी आणि प्रवाही आहे. बोलीभाषेचा वापर थोड्याफार प्रमाणात वाढवता आला असता. वयं, मानाय, कामेरी, भाटकान्न हे शब्द उत्तर गोव्यात सर्रास वापरले जातात. मसाले कुटण्याच्या वेळी म्हटले जाणारे उद्गार गोव्यात आजही धाल्याच्या रूपात प्रसिद्ध आहेत. या सगळ्या मिश्रित वर्णनामुळे गोवेकराला ही कादंबरी जवळची वाटेल, तर बिगर गोवेकरांना असा संस्कृतीसंपन्न गोवा नक्की अनुभवावासा वाटेल. या कादंबरीला प्रा. प्रमदा गावस देसाई यांची प्रस्तावना लाभलेली आहे; त्यात त्यांनी पुरुषप्रधान संस्कृतीमुळे बळी गेलेल्या स्त्रीजीवनाचे वास्तव 'सुलभा' या कादंबरीतून कसे उलगडले आहे, त्याचे सुरेख विवेचन केले आहे. 'सुलभा'चे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आणि स्त्रीमनाचे अंतरंग उलगडणारे आहे.

​कादंबरीच्या कथानकाची झलक पाहायची तर, सामान्य घरात जन्मलेली, आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असलेली सुलभा दहावीपर्यंत सर्वसामान्य मुलीप्रमाणे जीवन जगत असते. सुलभाचे सुखवस्तू आयुष्य वडिलांचे निधन आणि आईला आलेला अर्धांगवायूचा झटका यामुळे कोलमडून पडते. उच्च शिक्षणाचे स्वप्न सोडून, आईच्या जबाबदारीपोटी ती वयाने मोठ्या असलेल्या श्रीकरशी लग्न करते. श्रीकरच्या श्रीमंत घरात आल्यावर तिची आई सुरक्षित असली, तरी वैवाहिक आयुष्यात मात्र तिला श्रीकरच्या अनाकलनीय थंडाव्याचा सामना करावा लागतो.

​सुलभा जेव्हा याबद्दल विचारते, तेव्हा तिची सासू सुलक्षणाबाई तिच्यावरच आरोप करून श्रीकरची पाठराखण करतात. पुढे सुलभाच्या आयुष्यात सुखाचे काही क्षण येतात, पण तेही अल्पकाळच टिकतात. मातृत्वाचा आनंद घेत असतानाच तिला श्रीकर आणि त्याच्या कुटुंबाने लपवलेले एक भीषण सत्य समजते. स्वतःची फसवणूक झाल्याचा जाब विचारणाऱ्या सुलभालाच उलट 'व्यभिचारी' ठरवले जाते. समाजात उघड पडण्याच्या भीतीने श्रीकर आत्महत्या करतो.

​या पडझडीत सुलभाच्या मुलांच्या आयुष्यात संगीत शिक्षक म्हणून देवधर येतात, पण तिथेही समाजाच्या 'लोक काय म्हणतील?' या जाचाला तिला सामोरे जावे लागते. सुलक्षणाबाईंच्या टोकाच्या वर्तनामुळे अखेर सुलभाच्या हातून त्यांचा खून होतो.

​ही कादंबरी पुरुषप्रधान संस्कृती, परंपरांचा जाच आणि एका सोशिक स्त्रीचा झालेला अंत उद्रेक अत्यंत उत्कंठावर्धक पद्धतीने मांडते.

  कादंबरी : सुलभा,   लेखिका : डॉ. विभा लाड


- अनु देसाई, हळर्ण पेडणे-गोवा