उन्हाळ्याच्या दिवसांत गरोदर बायकोचे दोडक्याचे डोहाळे पुरवण्यासाठी निघालेल्या एका शेतकऱ्याला नदीकाठी बोलणारा बेडूक भेटतो आणि तिथूनच सुरू होते एका अजब शर्तीची ही रंजक लोककथा.

एका गावात एक शेतकरी होता. त्याची बायको लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी गरोदर राहिली होती. एके दिवशी ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, “अहो, मला दोडक्याची भाजी खावीशी वाटते.” ते दिवस उन्हाळ्याचे होते. त्यामुळे दोडक्याचा हंगाम निघून गेला होता. अशा वेळी दोडक्याची भाजी कुठून आणायची? शेतकरी विचार करू लागला. पण काहीही झाले तरी आपल्या बायकोचे डोहाळे पुरवायचे, असा त्याने निश्चयच केला. दोडक्याची भाजी शोधण्यासाठी तो नदीचा काठ फिरू लागला. एवढ्यात त्याला नदीकाठी एक दोडक्याचा वेल दिसला. उन्हाळ्याच्या दिवसांतही पानांनी गर्द असलेला दोडक्याचा वेल पाहून शेतकऱ्याच्या मनात आशेचा किरण जागा झाला. तो लगबगीने दोडक्याच्या वेलाजवळ गेला.
खरेच! ती दोडक्याची वेल अगदी भरगच्च होती. पसरट पानांच्या अधूनमधून लांबलचक दोडकी डोकावत होती. पोपटी रंगाची, सात धारांची ती दोडकी रसरशीत वाटत होती. शेतकऱ्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तो उमेदीने वेलीच्या अगदी जवळ गेला. आपला हात लांब करून दोडके काढणार, एवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला, “डराव डराव, डराव डराव.” आवाजात एक प्रकारची जरब होती.
पहिल्यांदा आवाज ऐकून शेतकरी दचकला. मग लक्षात आले, “अरेच्चा! आपण बेडकाच्या आवाजाला उगीचच घाबरलो.” दोडकी काढण्यासाठी त्याने पुन्हा हात लांब केला. इतक्यात त्याला पुन्हा एकदा तोच आवाज ऐकू आला, “डराव डराव, कोण हात लावते माझ्या दोडक्यांना?”
शेतकऱ्याने आजूबाजूला पाहिले, “कोणाचा बरं आवाज आहे हा? इथे माणूस तर कोणी दिसत नाही. पण बोलण्याचा आवाज मात्र येतो.”
शेतकरी कुठे माणूस दिसतोय का हे शोधण्यासाठी इकडेतिकडे पाहू लागला. कोणी माणूस दिसत नाही असे बघून पुन्हा एकदा त्याने हात लांब केला. तर पुन्हा एकदा तोच आवाज ऐकू आला, “खबरदार, माझ्या दोडक्यांना हात लावायचा नाही.”
शेतकरी विचारात पडला. “कोणी माणूस दिसत नाही पण माणसाचा आवाज येतो, हा भुताटकीचा प्रकार आहे की काय?” तो मनाशी बोलू लागला. घाबरागुबरा झाला तो, त्याला शिळा घाम फुटला. हे पाहून पुन्हा आवाज आला, “अरे घाबरतोस काय? आणि कोणाला शोधतोस? हा बघ मी इथे आहे तुझ्या पायाखाली.”
शेतकऱ्याने दचकून खाली पाहिले. पाहतो तर काय? त्याच्या पायाच्या अगदी जवळ एक भला मोठा बेडूक शेतकऱ्याकडे डोळे वटारून बघत होता. “अच्छा! तर हा बेडूक बोलत होता काय?”
शेतकरी हसत हसत बेडकाला म्हणाला, “बेडूक महाराज, माफ करा. हा दोडक्याचा वेल तुमचा आहे हे मला माहिती नव्हतं. पण त्याचं काय आहे, मला दोन दोडकी हवी होती. माझ्या बायकोला दिवस गेले आहेत. तिची दोडक्याची भाजी खाण्याची इच्छा झाली आहे. तेव्हा कृपा करून मला दोन दोडकी द्याल का?”
“पण त्या दोडकीच्या बदल्यात मला काय मिळणार?” बेडकाने उच्चरवाने विचारले.
“सांग तुला काय हवे आहे, जे तुला पाहिजे ते देईन.” शेतकरी म्हणाला.
“बघा हा, विचार करून आत्ताच काय ते सांग. नाहीतर मग माघार घेशीश.”
“छे छे, तू मागून तर बघ, जे तुला हवे ते देईन.” हा एवढाच बेडूक मागून मागून काय मागणार, हा विचार करत शेतकऱ्याने बेडकाला जे हवे ते देण्याचे वचन दिले.
“तर मग ऐका, तुमची बायको गरोदर आहे. तिला दोडक्याची भाजी खाण्याची इच्छा झाली आहे. म्हणून तू माझी दोडकी नेत आहेस. तुला हवी तितकी दोडकी तू आनंदाने घेऊन जा. पण जर तुझ्या बायकोला मुलगी झाली, तर या दोडक्यांच्या बदल्यात तुला मला तुझा जावई करून घ्यावे लागेल. त्या मुलीबरोबर माझे लग्न करून द्यावे लागेल. बोल, आहे मंजूर माझी अट?”
अरे बापरे! हा बेडूक असले काहीतरी भलतेसलते मागेल, हा विचारसुद्धा शेतकऱ्याच्या डोक्यात आला नव्हता. “याला आणि जावई? कसे शक्य आहे? त्यापेक्षा ही दोडकीच नकोत. पण या जागेव्यतिरिक्त दोडकी अजून कुठेच नाहीत. आणि बायकोची तर दोडकीची भाजी खाण्याची इच्छा झाली आहे. काय करावे बरे?” शेतकऱ्याला काय करावे काही सुचेना.
‘अरे बोलून चालून हा बेडूक. माझी बायको सध्या गरोदर आहे. पण तिला मुलगीच होईल हे कशावरून? मुलगा झाला तर बेडकाच्या या अटीचा काही अर्थच राहणार नाही. आणि मुलगी झाली तरीही हा बेडूक काय तिला उचलून थोडेच नेणार आहे? सध्यापुरती वचन देऊन वेळ मारून घ्यावी. झालीच मुलगी तर पुढचे पुढे बघूया.’
मनाशी हसत शेतकरी म्हणाला, “ठीक आहे बेडूक महाराज. मला तुमची अट मान्य आहे. जर मला मुलगी झाली तर मी तिचे लग्न तुमच्याशी नक्की लावून देईन. मग आता तोडू का दोडकी?”
बेडूकही खुशीत आला, “हो हो! तुला हवी तेवढी दोडकी तुला हवी तेव्हा नेऊ शकतो. तुला कोणीही अडवणार नाही. पण तू दिलेले वचन लक्षात ठेव. तुला मुलगी झाली तर मोठी झाल्यावर तिचे लग्न माझ्याशीच लावले पाहिजे.” असे म्हणून बेडूक तिथून निघून गेला. शेतकरी दोडक्याच्या वेलापाशी आला. दोडकी चांगलीच भरलेली आणि लांबलचक होती. हवी तेवढी दोडकी शेतकऱ्याने तोडली. त्याचा भारा बांधला. तो भारा काखेत घेऊन शेतकरी शीळ घालत आनंदाने परतीची वाट चालू लागला.
शेतकरी घरी पोहोचला. त्याच्याजवळ असलेली दोडकी पाहून बायको म्हणाली, “अहो, या उन्हाळ्याच्या दिवसांत एवढी चांगली दोडकी तुम्हाला कुठे मिळाली?”
शेतकऱ्याने बायकोला सारी हकीकत सांगितली. हकीकत ऐकताच बायको घाबरीघुबरी झाली. “अहो, असे कसे वचन देऊन आलात? आपल्याला मुलगी झाली तर तिचे लग्न बेडकाशी करायचे? कसे शक्य आहे हे?” शेतकऱ्याची बायको चिंतित झाली. पण शेतकरी मात्र बेफिकीर होता. कालची चिंता आज कशाला करायची? पुढचे पुढे, असा विचार करून तो निवांत होता.
शेतकऱ्याच्या बायकोचे महिने भरत आले. जितका बेफिकीर शेतकरी होता, तेवढीच चिंतित त्याची बायको होती. बोलणारा बेडूक म्हणजे तर काही सामान्य बेडूक नसणार. जर आपल्याला खरीच मुलगी झाली तर तिचे पुढे काय होईल? कुठून दुर्बुद्धी झाली मला दोडक्याची भाजी खाण्याची! त्यापेक्षा मी भाजीची मागणी केली नसती तर ते चांगले झाले असते. दिवस पुढे पुढे सरकत होते, तशी शेतकऱ्याच्या बायकोची चिंता वाढत होती. अशातच तिला नऊ महिने नऊ दिवस झाले आणि एके दिवशी बाळंतकळा जाणवू लागल्या. क्रमशः

गाैतमी चाेर्लेकर गावस