बँकिंग परीक्षा कशी असते?

बँकिंग क्षेत्रातील वाढत्या संधी, 'आयबीपीएस' (IBPS) परीक्षेचे स्वरूप, विविध विषय आणि पूर्व-मुख्य परीक्षेची तयारी याबद्दल सविस्तर माहिती देऊन, गोमंतकीय तरुणांना बँकिंग करिअरसाठी प्रवृत्त करणारा महत्त्वपूर्ण मार्गदर्शक लेख.

Story: यशस्वी भव: |
30th May, 11:13 pm
बँकिंग परीक्षा कशी असते?

भा​रतामध्ये शेकडो बँका आहेत, ज्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जातात. दरवर्षी शेकडो कर्मचारी निवृत्त होतात आणि तेवढेच नवीन कर्मचारी निवडले जातात. काही दशकांपूर्वी या बँकांमध्ये कसेही कामावर लावले जायचे, परंतु औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या (ग्लोबलायझेशनच्या) रेट्यामुळे आता एकत्रित परीक्षेच्या माध्यमातून बँकांमधील कर्मचारी निवडले जातात. 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन' अर्थात 'आयबीपीएस' (IBPS) या केंद्रीय संस्थेतर्फे ही परीक्षा घेतली जाते. भारतात आजमितीस ११ पब्लिक सेक्टर (सार्वजनिक क्षेत्रातील) बँका आहेत. यातील कर्मचारी निवड एका सामायिक परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. या परीक्षेचे दोन स्तर असतात.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि युको बँक अशा या पब्लिक सेक्टर बँका आहेत. या प्रवेश परीक्षेला 'कॉमन रिटन एक्झाम' अर्थात 'सीडब्ल्यूई' (CWE) परीक्षा म्हणतात. क्लेरिकल (लिपिक) आणि अधिकारी पोस्टसाठी निवड यातून केली जाते. या परीक्षा दोन स्तरांवर घेतल्या जातात. प्रीलिम (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य परीक्षा). प्रीलिम परीक्षा १ तासाची असते व त्यात १०० प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला १ गुण दिला जातो. यामध्ये इंग्रजी विषयाचे ३० प्रश्न असतात, न्यूमेरिकल अर्थात अंकगणित या विषयावर ३५ प्रश्न असतात आणि रिझनिंग अ‍ॅबिलिटी (बौद्धिक चाचणी) या विषयावर ३५ प्रश्न असतात. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले व कट-ऑफच्या वर गुण मिळवणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी (मेन एक्झाम) पात्र ठरतात.

मुख्य परीक्षेत विषयवार प्रश्न असतात. यामध्ये ४० गुणांसाठी इंग्रजी, ३५ गुणांसाठी क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्युड, ४० गुणांसाठी रिझनिंग अ‍ॅबिलिटी तर जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेससाठी ४० प्रश्न असतात. ही परीक्षा एकूण २०० गुणांची असते व १२० मिनिटांत हे प्रश्न सोडवायचे असतात.

अंकगणित (Numerical Ability / Quantitative Aptitude) विषयामध्ये पुढील घटक असतात:

सिंप्लीफिकेशन (सरळीकरण), अ‍ॅव्हरेज (सरासरी), प्रॉफिट अँड लॉस (नफा-तोटा), सिम्पल इंटरेस्ट व कंपाउंड इंटरेस्ट (सरळव्याज व चक्रवाढ व्याज), सर्च अँड इंडायसेस (घातांक व करणी), वर्क अँड टाईम (काम व वेळ), टाईम अँड डिस्टन्स (वेळ व अंतर), मेन्सुरेशन (भूमिती/क्षेत्रफळ), डेटा इंटरप्रिटेशन (माहितीचे विश्लेषण), रेशो अँड प्रोपोर्शन (गुणोत्तर व प्रमाण), नंबर सिस्टीम (संख्या पद्धती), सिरीज, सिक्वेन्स, प्रोबॅबिलिटी (संभाव्यता), डेटा सफिशियन्सी आणि कॉम्बिनेशन हे विषय असतात.

बौद्धिक चाचणी (Reasoning Ability) विषयामध्ये पुढील घटक असतात:

अल्फान्युमेरिकल सिरीज, रँकिंग, डायरेक्शन (दिशा ज्ञान), अल्फाबेट टेस्ट, सिटिंग अरेंजमेंट (बैठक व्यवस्था), पझल (कोडी), टॅब्युलेशन, सिलॉजिझम, ब्लड रिलेशन (नातेसंबंध), इनपुट-आउटपुट आणि कोडिंग-डिकोडिंग हे विषय असतात.

इंग्रजी (English) विषयामध्ये पुढील घटक असतात:

एडिटिंग, कॉम्प्रिहेन्शन (उतारा), क्लोज टेस्ट, पॅरा जम्बल, वर्ड युसेज, वर्ड स्वॅप, फिल इन द ब्लँक्स (रिकाम्या जागा भरा), एरर डिटेक्शन स्पॉट (चूका शोधणे), एरर पॅराग्राफ कॉम्प्लिशन आणि सेन्टेन्स करेक्शन हे विषय असतात.

सामान्य ज्ञान (General Awareness) विषयामध्ये पुढील घटक असतात:

करंट अफेअर्स (चालू घडामोडी), जनरल नॉलेज, फायनान्शियल अवेअरनेस आणि स्टॅटिक अवेअरनेस हे विषय असतात. याशिवाय काही परीक्षांमध्ये डिस्क्रिप्टिव्ह (लेखन चाचणी) मध्ये लेटर रायटिंग (पत्रलेखन) आणि निबंध असे विषय असतात.

या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण पद्धती) असते. क्लेरिकल, प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि जनरल पोस्टसाठी ही परीक्षा घेतली जाते. योग्य सराव, उपयुक्त कोचिंग व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामधून या परीक्षेची खूप छान तयारी करता येते. यासाठी सराव फार महत्त्वाचा असतो. प्रश्न सोडवण्याच्या काही ट्रिक्स असतात, त्या एकदा समजून घेतल्या की ठरलेल्या वेळेत उत्तर देणे सोपे पडते. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवर कधी कोणत्या परीक्षा आहेत, याची माहिती उपलब्ध होते. या क्षेत्रातील पगार आणि करिअर खूप आकर्षक असते.

गोव्यात अनेक बँका आहेत, परंतु त्या बँकांमध्ये गोमंतकीय तरुण फार अभावानेच दिसतात. गोमंतकीयांनी फक्त शासकीय नोकरीवर अवलंबून न राहता या बँकिंग परीक्षा देऊन स्वतःचे करिअर सुरक्षित केले पाहिजे, कारण शासकीय परीक्षा आणि बँकिंग परीक्षा या दोन्हीचा ८०% अभ्यासक्रम सारखाच आहे.


अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, ९८७५४४५३९९, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)