गोव्यात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत बेडकांची शिकार करण्यावर बंदी आहे. गोव्यात धर-पकड वाढल्यामुळे कर्नाटकातून बेडूक आणणे, तस्करीसाठी महाराष्ट्राची सीमा वापरणे, रात्री वाहतूक करणे यासारख्या तस्करी पद्धतींना उत येऊ लागला आहे.

बेडकांची शिकार करणे, त्यांना मारणे, त्यांची विक्री करणे याविरोधात नुकताच वन विभागाने नागरिकांना इशारा दिला आहे. हंगामाच्या दरम्यान बेकायदेशीर बेडूक पकडण्यावर नियंत्रण आणण्यासाठी, विशेषतः शिकारीचा संशय असलेल्या भागांत, गस्त घालण्यात येणार असल्याचे वन विभागाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. "भारतात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत बेडकांची शिकार केल्यास दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते. कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड, तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोन्ही होऊ शकतात".
गोव्यात 'जम्पिंग चिकन' हा शब्द बेडकाच्या मासासाठी, विशेषतः बेडकाच्या पायांसाठी वापरला जातो. जम्पिंग चिकन म्हणजे बेडकाच्या मांसापासून बनवलेला पदार्थ. पावसाळ्यात गोव्यातील काही भागात हा पदार्थ पावसाळी डॅलिकसिच्या नावाने गुप्तपणे खाल्ला जातो. यासाठी विशेषतः 'इंडीयन बुलफ्रॉग' आणि 'जेरडन्स बुलफ्रॉग' या मोठ्या आकाराच्या बेडकाच्या प्रजातींची शिकार केली जाते.
बेडकांची शिकार मुख्यतः मुसळधार पावसाच्या रात्री केली जाते. प्रजननाच्या काळात म्हणजेच पावसाळ्यात रात्री बेडूक बाहेर येतात व मादीला आकर्षित करण्यासाठी मोठ्याने डराव डराव असा आवाज करतात. शिकारी टॉर्च घेऊन शेतात जातात व आवाजाच्या दिशेने बेडूक शोधतात. बेडूक दिसताच टॉर्चचा प्रकाश डोळ्यावर टाकून त्यांना काही क्षण दिपकवतात. नंतर जाळी किंवा हाताने पकडून त्यांना गोणीत भरतात. अशारीतीने बेडकांची शिकार केली जाते.
गोव्यात पोर्तुगीज काळात विविध मांसाहारी पदार्थ लोकप्रिय झाले आणि त्यात बेडकाचे मांसही आले. हा पदार्थ गोव्याच्या ग्रामीण भागातील जुन्या खाद्यसंस्कृतीचा भाग मानला जात असे. पण नंतर पाणथळ जागा नष्ट झाल्याने, किटकनाशकांचा भरमसाठ वापर, शहरीकरण, मातीचा भर घालून भात-शेती पुरवून टाकल्याने, पर्यावरण बदल यासारख्या मानव निर्मित कारणांमूळे त्यांचा अधिवास नष्ट होऊ लागला. बेडकांची संख्या चिंताजनक होत चाललेली असताना त्यांची शिकार करणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे झाले. बेडकांना संरक्षण देण्याच्या हेतूने शिकारबंदी करत इंडीयन बुलफ्रॉगला संरक्षित प्रजातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. गोव्यात बेडकांची शिकार आणि विक्री करण्यावर कायद्याने बंदी आहे. गोवा राज्याच्या व्यतिरीक्त केरळ, आसाम, उत्तर- पूर्व भारतात देखील बेडकांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. शिकारबंदी असल्याने काळाबाजारही वाढतोय. जम्पिंग चिकनच्या नावाखाली इतर मासाची विक्री करत ग्राहकांची फसवणूकही केली जाते.
बेडूक हा प्राणी शेतातील कीटक व डासांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. बेडकांची संख्या कमी झाल्यास डास वाढून पर्यावरणीय संतुलन बिघडू शकते. बेडकांचे संवर्धन करण्यासाठी गोव्यात 'बेडूक वाचवा' यासारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत. शाळांमध्ये जागृती, रात्री गस्त आणि रेस्टॉरंट तपासणी यामुळे जम्पिंग चिकनची उघड विक्री जरी कमी झालेली असली तरी काही ठिकाणी अजूनही गुप्तपणे हा व्यापार चालतो. काही गावांमध्ये पावसाळ्यात छोट्या खानावळीत बेडकाचे मास गुप्तपणे विकले जाते. बेकायदेशीरपणाचा संशय येऊ नये म्हणून याला 'बेडकाचे मास' असे न म्हणता 'जम्पिंग चिकन', 'जेसी', 'जम्पिंग' असे गुप्त शब्द वापरून विक्री केली जात. अनेक लहान खानावळींमध्ये “खास मान्सून पदार्थ” म्हणून गुप्तपणे दिला जात.
गोव्यात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत बेडकांची शिकार करण्यावर बंदी आहे. गोव्यात धर-पकड वाढल्यामुळे कर्नाटकातून बेडूक आणणे, तस्करीसाठी महाराष्ट्राची सीमा वापरणे, रात्री वाहतूक करणे यासारख्या तस्करी पद्धतींना उत येऊ लागला आहे. रात्रीची अवैध वाहतूक, कर्नाटक-गोवा सीमेजवळ तस्करी अशा घटनाही वारंवार समोर येऊ लागल्या आहेत. खाण्यासाठी बेडूक पकडण्याच्या प्रथेमुळे त्यांच्या संख्येवर गंभीर परिणाम होऊन नैसर्गिक संतुलनात बिघड होत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शिकारीमुळे अन्नसाखळीवर परिणाम होत असल्याने हॉटेल्स आणि व्यक्तींनाही बेडकाचे मास विक्री करण्याविरोधात इशारा दिला आहे. बेडकाचे मास माणसाच्या आरोग्यासाठीही घातक असते. बेडूक खाल्ल्याने माणसाला मूत्रपिंडाचा विकार होण्याचा धोका असतो.
बेडूक पकडण्याची प्रक्रिया, गुप्तशब्द हे नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या उद्दिष्ठाने दिलेले आहेत. एखाद्या खानावळीत/ हॉटेलमध्ये असे शब्द कानावर पडल्यास किंवा अवैधरीत्या शिकार करताना आढळल्यास नागरिकांनी त्वरीत वन खात्याला संपर्क साधून माहिती द्यावी.

- स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)