अस्वस्थतेतून साकारलेले सृजन 'निःशब्द'..!

कारवार आणि गोमंतकीय परिसरातील मानवी नातेसंबंध, अगतिकता आणि हृदयस्पर्शी कथांचा वेध घेत, वाचक मनाला अंतर्मुख करायला लावणाऱ्या लक्ष्मण साईल यांच्या 'निःशब्द' कथासंग्रहाचे हे एक सुंदर रसग्रहण.

Story: पुस्तक |
30th May, 11:22 pm
अस्वस्थतेतून साकारलेले सृजन 'निःशब्द'..!

अा​​​​​पल्या गोव्याला वर्तमानपत्रांची समृद्ध परंपरा आहे. याच वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होणाऱ्या पुरवण्यांमुळे अनेक लेखक घडले आणि अनेकांच्या लेखन कौशल्याला झळाळी प्राप्त झाली. असेच एक लेखक म्हणजे लक्ष्मण साईल. त्यांच्या 'निःशब्द' या कथासंग्रहातील कथा या 'गोमंतक' या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या आणि म्हणूनच त्यांनी हा कथासंग्रह 'गोमंतक'ला कृतज्ञतापूर्वक अर्पण केला आहे. या कथासंग्रहाला विश्राम गुप्ते यांची प्रस्तावना लाभली आहे आणि सुदाम जयदेव मोटे यांनी या कथांवर भाष्य केले आहे. 'निःशब्द' या कथासंग्रहातील कथांमध्ये घडणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात.

​त्या आपल्याला ओळखीच्या वाटतात आणि वाचक म्हणून आपण त्यांचा भाग होतो. या कथासंग्रहात एकूण दहा कथा आहेत. प्रत्येक कथा ही विशिष्ट प्रश्नाचा गाभा आहे. लेखक स्वतः गोमंतकीय असूनही त्यांच्या कथांमध्ये मुख्यत्वे कारवार व तेथील गावे, परिसराचे वर्णन आढळते; तसेच गोव्यातील काही ठिकाणांचा विशेषतः दक्षिण गोव्यातील उल्लेखही यात पाहावयास मिळतो. गोपसिट्टा, सदाशिवगड, थोरले भाग, होसाळी, घोमुसिट्टा, गोटणीवाडा अशा कारवारी ठिकाणी घडलेल्या कथा या कथासंग्रहात वाचावयास मिळतात, तर गावडोंगरी, भाटपाळी, नेत्रावळी, बार्देश, पेडणे, मडगाव, कुंकळ्ळी अशा गोमंतकीय गाव-शहरांचा अनुभव घेता येतो.

​या कथांमध्ये ग्रामीण बाज दिसून येतो. मात्र यात ठिकाणांच्या वर्णनांची तसेच प्रादेशिक विशेष गोष्टींच्या विवेचनांची उणीव जाणवते. यात थोडीफार प्रमाण कोकणीकडे झुकणारी, कारवारी कोकणीचा हेल असणारी भाषा लेखकाने चांगल्या प्रकारे संवादांसाठी वापरली आहे; तसेच सोपी, प्रवाही प्रमाण मराठी वर्णन-कथनासाठी वापरली आहे. या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ सुंदर व बोलके आहे. क्षितिजरेषेवर बुडण्याच्या तयारीत असलेला रवीकर, त्यास भेदणारा पक्षी अन् अथांग समुद्रावर छायारूपी चिंतनमग्न मानव मुखाकृती, त्यात कुठून तरी वाट काढत आलेली उभी व्यक्ती असे चित्र वाचकांचे लक्ष वेधते.

​कथासंग्रहाची सुरुवात 'वाटणी' या कथेने झालेली आहे, ज्यात आई-वडिलांमागे ज्या मोठ्या भावाने पालनपोषण करून वाढवले, त्याच्याकडे आपापल्या बायकांच्या सांगण्यावरून वाटणी मागणारे दोन भाऊ; तर मोठ्या भाव्याच्या कष्टाची जाणीव ठेवत आपल्या वाट्याला "दादा-वहिनी तुम्हीच या" म्हणणारा धाकटा भाऊ अशी दोन भिन्न स्वभावचित्रे लेखकाने उभी केली आहेत. 'पैसा म्हणजे सर्वस्व' असे मानून एकेकाळी धुडकावून लावलेल्या प्रेमाला यशस्वी स्वरूपात समोर पाहून होणारी देवयानीची अवस्था म्हणजे कथा क्रमांक दोन 'निःशब्द'.

​जग वीरपत्नी म्हणून सन्मान करत असताना, लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांत नवऱ्याला गमावलेली नि हुंडा न घेऊन आल्यामुळे सुनेला दिली जाणारी मोलकरणीची वागणूक 'प्राक्तन' या कथेतून लेखकाने रेखाटली आहे. कधीकाळी आपल्याला तीन पुत्र झाले आणि जावेला मुली झाल्या म्हणून हिणवणाऱ्या रमाबाईंना म्हातारपणी तिन्ही मुलांनी दूर लोटल्यानंतर झालेला पश्चात्ताप 'पुत्रवती असूनही' या कथेतून दिसून येतो. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या बाळकृष्णला केवळ वडिलांच्या व्यसनापायी नको असलेला गवंडी व्यवसाय स्वीकारावा लागतो, याची करुण कहाणी म्हणजे 'वारसा'.

​केवळ तिसरी मुलगी नि जन्मतः झालेल्या पोलिओमुळे वडिलांच्या प्रेमाला पोरकी होऊन अकाली जीवनयात्रा संपणाऱ्या दुर्दैवाचे कथन अर्थात 'प्रायश्चित्त'. दारुडा असून वाटेत सापडलेल्या कुत्र्याच्या पिल्लावर केलेले निर्मळ प्रेम नि कुत्रा पिसाळल्याने त्याला मारण्याची दिलेली संमती अन् त्याच्यासोबत संपवलेली जीवनयात्रा यांचे हृदयद्रावक चित्रण 'टॉमी' या कथेमध्ये वाचावयास मिळते. समाजप्रमुख म्हणून एरवी पाच-पन्नास माणसांचा गराडा घेऊन फिरणारा दत्तू गरजेच्या वेळी कपड्याचा व्यापारी गंगा शेट्टीकडे उधारी मागावयास जातो, मात्र शेट्टी आपले व्यापारी स्वरूप दाखवत त्याला टाळतो अन् दत्तूला अडाणी बायकोचे व्यवहार आठवून स्वतःची अगतिकता जाणवते, याचे चित्रण 'अगतिक' या कथेत आलेले आहे.

​नाबालिग कोवळ्या वयात आई-वडिलांनी जबाबदारी झटकण्यासाठी लग्न करून दिलेली शर्मिला मोठी होऊन स्वतः दुसरी व्यक्ती नवरा म्हणून निवडते; मात्र पहिल्या नवऱ्याच्या तक्रारीमुळे पोलिसांकडून पकडली जाऊन तिची सुधारगृहात रवानगी होते. तिच्या मनात घोंघावणारा प्रश्न 'माझं काय चुकलं?' या कथेतून वाचकांसमोर येतो. कुठल्याशा गावातून दुसऱ्या गावात पोट भरण्यासाठी आलेला येसू गरिबांच्या मदतीला धावून जातो, तर श्रीमंतांशी रुक्षपणे परंतु प्रामाणिकपणे वागतो; मात्र त्याचा नारळ काढण्याचा, माड तोडण्याचा पोटभरीचा धंदाच त्याच्या दुर्दैवी मृत्यूचे कारण ठरतो, याचे वर्णन लेखकाने 'येसू' या व्यक्तिचित्रणात्मक कथेतून केलेले आहे. वाचक मनाला विचार करायला भाग पाडणाऱ्या, मानवी संवेदना जागृत करणाऱ्या नि हृदय हेलावून टाकणाऱ्या कथांची अनुभूती घेण्यासाठी सर्वांनी वाचावा 'निःशब्द..!'

 ​​​कथासंग्रह : निःशब्द,  ​​लेखक : लक्ष्मण साईल


अनु देसाई, हळर्ण पेडणे-गोवा