पूर्वी पाचवीचा विधी हाच या समाजातील मुलासाठी बारसा होता. नाळ पाळण्याला बांधली जायची; असे केल्याने बाळाच्या बुद्धिमत्तेत वृद्धी होते, असा समज रूढ होता.

धनगर समाजात बाळ जन्माला आले की त्याच्या पाचव्या दिवशी पाचवी करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. बारसे करण्याची पद्धत त्यांच्यात नव्हती. रानोमाळ म्हशी-बोकडांसोबत हिंडून संसार मांडताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असे. निसर्गाच्या सोबतीने निकोप, निरामय आयुष्य जगण्याची त्यांची सवय आरोग्यदायी होती. मुबलक दूध-दुभते, तूप-लोणी असा आहार शारीरिक सुदृढता बहाल करीत होता. निसर्ग आणि समाजमन यांचे नाते सुदृढ आणि सुंदर होते.
पाचवीचा विधी करताना कोणकोणत्या विधी केल्या जातात हे सौ. संगीता बाबल शेळके यांनी सांगितले. चांदीवड्याची दहा पाने, नाचणीच्या पिठाचे दहा छोटे छोटे वडे (वडडूले) वापरले जातात. दहा वाती करून त्या नाचणीच्या वडुल्यात ठेवून पेटविल्या जातात. चांदीवड्याची पाच पाने घेऊन त्यावर भात, पाच पणत्या व पाच वाती व मधोमध दिवा लावून ठेवला जातो. त्याच सुपाच्या पुढ्यात बाळाला झोपवले जाते. सुपातला तेवता दिवा हा त्या लहान मुलाच्या नजरेस पडायला हवा, अशी त्यामागची धारणा आहे. सुपाला हळद-पिंजर लावून पांढऱ्या धाग्याचे पाच फेरे सुपाभोवती घातले जातात.
दुसरा दिवा उरलेल्या पाच चांदीवड्यांच्या पानांवर पेटवतात. त्यावर कुळीथाचे घुगरे घालतात. घुगरे म्हणजेच उकडलेले कुळीथ. मुलाच्या आईच्या पदरात ते दिले जातात. पाच वेळा आई ते घुगरे नैवेद्यावर सोडते. हे करताना आईने माथ्यावरून पदर घ्यावा अशी पद्धत आहे. नैवेद्याला पाच वेळा पाया पडते. बेळाच्या टोपलीत गवत घालून त्यावर कांबळ घातली जाते. त्यात लहान मुलाला झोपवण्यासाठी छोटी गोधडी असते. धनगर समाजात कांबळीला खूप महत्त्व असते, कांबळ हवीच असते. बाळाच्या आतेने किंवा मावशीने बाळाच्या हातापायात, कमरेत आणि गळ्यात पांढरा धागा बांधायचा असतो.
बाळंतघरातील बाळाला आंघोळ घालणे हा एक मोठा उत्सवच असतो. "बाळंतघर आणि लग्नघर दोन्हीही सारखीच" अशी म्हण लोकमनसात प्रचलित आहे. आंघोळ घालणे ही खूप कठीण गोष्ट, ते कौशल्य पूर्वीच्या 'मालनींच्या' हातात होते. न्हाणीघर ही खास जागा असायची, जिथे बाळाच्या आंघोळीसाठी पाणी तापविले जायचे. पाचवीच्या दिवशी न्हाणीघरात नैवेद्य ठेवला जातो आणि न्हाणीला हळकुंड बांधतात.
पाणी तापविण्यात येणाऱ्या भांड्याच्या सभोवताली आईला कुळीथाचे घुगरे पाच वेळा न्हाणीच्या भोवताली घालावे लागतात. त्याचबरोबर नैवेद्य व दिवा ठेवलेले पान आईनेच पाच वेळा वर-खाली करीत पाचव्या वेळी भांड्यात ठेवून त्यावर कळशी उपडी घातली जाते. आतील तेवता दिवा मालवता कामा नये आणि ही कृती करताना भांड्याचा किंवा काकणांचा आवाज होता कामा नये, असा संकेत आहे. जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवसापर्यंत कापलेल्या नाळेची जखम ताजी असते.
पूर्वी पाचवीचा विधी हाच या समाजातील मुलासाठी बारसा होता. नाळ पाळण्याला बांधली जायची; असे केल्याने बाळाच्या बुद्धिमत्तेत वृद्धी होते, असा समज रूढ होता. बेंबीच्या जागी जखम भरून येण्यासाठी गोवरी जाळून त्याची राख लावली जायची. पूर्वी प्रामुख्याने घरातच मुले जन्माला यायची. त्यामुळे जन्म झाल्यावर बाळाला पाण्यात बुडवून काढणे, नाळ कापणे, दोऱ्याने ती बांधणे या गोष्टी केल्या जात. ही नाळ एकतर न्हाणीघरात पुरली जायची किंवा बाळाच्या आंघोळीचे पाणी जेथे जाते तेथे ती पुरली जायची. त्यासाठी मातीचे कुंडले वापरले जायचे. कुंडल्यासकट नाळ पुरत असत.
बाळंतीण पाणवठ्यावर जायची, तेव्हा तिला बाहेरील गोष्टींची बाधा होऊ नये म्हणून तिच्या गळ्यात हळकुंड बांधण्याची परंपरा होती. पाचवीच्या या विधीला घुगरे वापरले जातात, त्यामागची आख्यायिका सांगताना असे म्हटले जाते की, खूप वर्षांपूर्वी धनगर समाजातील एक महिला बाळंत झाली होती. एरव्ही देवाला दही-भाताचा नैवेद्य दाखविला जायचा, परंतु 'सुयेर' असल्याने देवाला नैवेद्य कसा दाखवायचा? हा प्रश्न पडला. त्यावेळी फक्त कुळीथ उकडून देऊन वेळ मारून नेली. त्यावेळेपासून ही घुगरे करण्याची परंपरा सुरू झाली असे सांगितले जाते.
बाळाला जन्म देणे हा आईचा दुसरा जन्मच असतो. बाळाचे संगोपन करायचे तर तिला सुदृढ-सशक्त व्हावे लागते. पूर्वी आजच्यासारखे खाण्याचे पदार्थ नव्हते, त्यामुळे घरगुती आरोग्यवर्धक पदार्थ बाळंतिणीला दिले जात असत. त्यात मिरपूड, लाल मिरची, लसूण व सुके खोबरे भाजून त्याची चटणी, सोबत भात आणि वरून तुपाची धार दिली जाई. धनगर समाजात तूप-लोणी मुबलक असल्याने शारीरिक वृद्धी व्हायची. बाळंतिणीला दूध यायला हवे म्हणून गव्हाची कणी, गूळ, जिऱ्याची फोडणी, ओवा व सुके खोबरे घालून केलेला पदार्थ किंवा मेथीची पेज दिली जायची. 'कंणूक' म्हणजे कोंबडीच्या पिल्लाचा गरमागरम काढा, मग एके दिवशी गावठी हरभऱ्याचा, असे अकरा दिवसांपर्यंत बाळंतिणीची काळजी घेतली जायची. हे सारे बाळाच्या आरोग्यासाठी असायचे.
या फक्त परंपरा नव्हत्या, त्यामागे लोकमानसाचे वैज्ञानिक आणि नैसर्गिक तत्त्वांचे अधिष्ठान होते, जे आज आपण विसरत चाललो आहोत...

- पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)