महासत्तेची दुखरी बाजू!

मानवी श्रमाला किंवा भावभावनांना पैशाच्या तराजूत तोलणाऱ्या आणि दिखाऊ-बाजारू व्यवस्थेला विकास समजणाऱ्या व्यवस्थेचे आपण वाहक बनलो आहोत. आपल्या भारतीय समाजाची अवस्थासुद्धा पत्ता हरवलेल्या अमेरिकेसारखी व्हायला फार काळ लागणार नाही.

Story: वेध |
04th April, 11:20 pm
महासत्तेची दुखरी बाजू!

परवा बंगळुरू येथील उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने अमेरिकेच्या आयटी कंपनीतील नोकरी गेल्यामुळे आत्महत्या केली. सकाळी ६ वाजता आलेल्या एका साध्या ई-मेलने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले. पण तो एकटाच नव्हता, तब्बल १२,००० भारतीय कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी, एकाच प्रकारे कामावरून कमी करण्यात आले. ही घटना ज्या कंपनीत घडली, तिला नुकताच ५१,००० कोटींचा विक्रमी नफा झाला होता. म्हणजेच, ही कपात आर्थिक अडचणीमुळे किंवा युद्धामुळे नव्हे, तर उपयोगितेच्या बदललेल्या प्राधान्यक्रमांमुळे करण्यात आली होती, हे स्पष्टच आहे.

ज्यावेळी मानवी श्रमाची गरज कमी कमी होत जाऊन त्याची जागा मशीन घेते, तेव्हा काम करण्याची पद्धत बदलून जाते. १९९० च्या जागतिकीकरण-खासगीकरणाच्या धोरणानंतर आपल्या देशात आलेल्या संगणकीय तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात तरुण परदेशात जाऊन विविध सॉफ्टवेअर देशी-परदेशी कंपन्यांमध्ये नोकऱ्या करू लागले. त्यावेळी आलेल्या संगणकीय प्रणालीचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांवर झाला, तर आता आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ माजली आणि हजारो लोकांना आपली रोजगाराची साधने बदलावी लागली किंवा नोकऱ्या सोडाव्या लागल्या.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत मानवी मूल्यांची जपणूक होत नसेल, तर हा विकास कोणासाठी? असा प्रश्न निर्माण होतो. अमेरिकेसारख्या देशांमध्ये आज प्रचंड बेरोजगारी आहे. आपणही अमेरिकेच्या पावलावर पाऊल टाकत त्याच दिशेने जात आहोत. अशावेळी अमेरिकेच्या अंतर्गत समाजामध्ये अस्थैर्याच्या टोकदार जाणिवा किती भयानक आहेत, हे पु. ल. देशपांडे यांच्या लेखातून कळून येतं. 'जिथे जीवन म्हणजे काहीतरी विकून श्रीमंत होण्याची संधी एवढाच अर्थ होतो, तिथे मढी पुरायची जागा विकली काय किंवा पिढीच्या पिढी गारद करणारी एलएसडी - गांजा-अफू विकली काय, सारे काही संस्कृतीला साजेसेच आहे. शस्त्रास्त्रांची विक्री थांबेल म्हणून ज्यांचे सोयरसुतक नाही, अशा देशांत जाऊन बॉम्बचा वर्षाव करायचा! काय विकतो आणि त्या विक्रीच्या वस्तूंचे काय परिणाम होतील, याचा विचार न करता विकत राहायचे. त्यांच्या बाजारपेठा शोधायच्या, त्या विक्रीसाठी जाहिरातीच्या नव्या नव्या क्लृप्त्या काढायच्या, त्यात मग विकणाऱ्या-विकणाऱ्यांची भयानक चढाओढ! बाजारात येणारा दुसऱ्याचा माल हुसकता हुसकता तो माल विकणाऱ्यालाच कसे हुसकता येईल, याच्या योजना आखायच्या. गिऱ्हाईकाची हे बरे की ते बरे? याचा विचार करण्याची विचारशक्तीच नष्ट करायची. हे सारे करताना कसलाही विधिनिषेध बाळगायचा नाही. वरील उतारा १९७४ साली प्रकाशित पु. ल. देशपांडे यांच्या 'जावे त्यांच्या देशा' या पुस्तकातील आहे. आज अचानक या लेखाची प्रकर्षाने आठवण येत आहे. 'जावे त्यांच्या देशा' हे पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले प्रवास वर्णन. व्हेनिस, रोम, इटली, सॅनफ्रान्सिस्को, हंगेरी आणि अमेरिका या देशातील प्रवासातील अनुभव आणि निरीक्षणे या पुस्तकात पु. ल. देशपांडे यांनी नोंदवली आहेत. त्यापैकी 'एक बेपत्ता देश' हा अमेरिकावर आधारित आहे. सत्तरच्या दशकातील अमेरिका आणि आजचा अमेरिका यांच्या मानसिकतेमध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही, परंतु १९७० चा भारत आणि आजचा भारत यामध्ये मात्र प्रचंड अंतर पडलेले दिसते.

या लेखात अमेरिकेत असणारी अस्थिरता आणि असुरक्षितता प्रकर्षाने जाणवते. त्याचे वर्णन करताना पु. ल. देशपांडे लिहितात, 'किती संपन्न देश! प्रचंड वस्तुभांडारे! नजर ठरत नाही अशा एकेक वास्तू. पण प्रत्येक मजल्यावर रिव्हॉल्व्हर्स घेऊन पोलीस उभे! कुठल्या क्षणी भडका उडेल सांगता येत नाही. अमेरिकन विचारवंतांची डोकी सुन्न झालेली. कुठल्याही अमेरिकन माणसाशी याबाबतीत बोलावे- अनेक कारणे सांगतात आणि शेवटी असहाय्यपणे माना हलवीत बसतात. कुणी व्हिएतनाम युद्ध म्हणतो - कुणी राजकारणी लोकांवर खापर फोडतो, कुणी अतोनात समृद्धीचे हे सैतानी अर्भक आहे म्हणतो, आम्ही अर्धपोटी म्हणून अभागी, तर अमेरिकेला अत्याहारामुळे झालेले अपचनाचे रोग!'

आज आपल्या देशाची 'भारत विरुद्ध इंडिया' अशी विभागणी झालेली असली तरी कोकाकोला दोन्ही ठिकाणी सारख्याच दरात मिळतो. म्हणजे साधन आणि समृद्धीमध्ये विभागणी झाली असली तरी कंपन्या दोन्हीकडे नफा सारखाच शोधतात. ७०-८० च्या दशकात भारतात पाणी विकणे आणि विकत घेणे निषेधार्थ होते. अनेक लोक पाणपोया लावून पुण्य पदरात पाडून घेत होते. आज मात्र शहरातच नव्हे, तर खेड्यापाड्यात सुद्धा बाटलीबंद पाणी विकत घेणे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. हा मानसिकतेमध्ये असणारा बदल सहज झालेला नाही. भारताचे अमेरिकीकरण यापेक्षा काय वेगळे असणार आहे. उपभोग आणि केवळ उपभोग हे लक्षण असणाऱ्या संस्कृतीचे आपण वाहक बनत आहोत. खाद्यपदार्थ असो की नवनवीन गाड्यांची मॉडेल्स, कपड्यांची नवी फॅशन असो की मॉलमध्ये जाऊन प्रचंड खरेदी करण्याची नशा असो, या चकचकीत दुनियेने सर्वांनाच वेडे केले आहे. 'जगण्याचे सूत्र केवळ पैसा' हेच असावे, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. पैसा मिळवण्यासाठी कोणतेही खोटे कृत्य करण्याला ही मंडळी तयार असतात. ऑनलाइन गंडा घालणारे हजारो तरुण अडाणी नक्कीच नसतात. गंडा घातल्यानंतर किंवा ऑनलाइन फसवणूक केल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला काय वेदना होतील, याची कोणतीही सोयरसुतक नसणारी पिढी या बाजार व्यवस्थेने निर्माण केली आहे.

अमेरिकन समाजाचे वर्णन करताना पु. ल. देशपांडे म्हणतात, 'या भ्रमिष्टांच्या समाजात घेरी आणणारी अस्थिरता हेच सत्य आहे. कुटुंब संस्था तर अशी काही डगमगू लागली आहे की, हे जहाज कुठे फुटणार ते कळत नाही!' पण हे केवळ अमेरिकेचे वर्णन आहे का? तर नाही, आज आपणही त्याच रांगेत आहोत.

लहानपणी माझी आजी चकव्याची गोष्ट सांगायची. चकवा आपल्याला रस्ते भरकटवतो, आणि विहिरीत ढकलतो असे तिने सांगितल्यावर प्रचंड भीती वाटायची. आज आपण अशाच चकव्यात गुरफटलो आहोत. लांबच लांब रस्ता आपल्याला चकवतो आणि बाजारू व्यवस्था आपल्याला मेंदू गहाण ठेवायला लावते. त्याला सहाय्यभूत ठरतात ती प्रसार माध्यमे आणि जाहिराती.

आनंदी जगण्याचे सूत्र पैसा हेच व्हावे आणि त्यासाठी कोणतीही कृती करायला तयार असणारी पिढी निर्माण करणे, हे बाजारू व्यवस्थेचे लक्षण असते. हे लक्षण आपल्या मनामनात कधी उतरले ते कळलेही नाही. कालची वस्तू आज निकामी होते. कालचे मॉडेल आज निकृष्ट ठरते, त्यातून सुरू होते नवीन वस्तू घेण्याची बाजार नियंत्रित नशा. कारण नवीन वस्तू विकणे हे बाजार व्यवस्थेचे तंत्र आहे. त्याशिवाय ती व्यवस्था चालणार कशी? यातूनच सुरू होते मेंदू गहाण टाकण्याची प्रक्रिया.

बाजारकेंद्रित व्यवस्था माणसांना 'युज अँड थ्रो', वापरा आणि फेकून द्या या मानसिकतेतून कार्य करायला लावते. ही मानसिकता आपल्या देशात रुजते आहे, त्याचे भान आपल्याला नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ही मानसिकता केवळ वस्तूंच्या संदर्भात नाही तर माणसांच्याही संदर्भात आहे. माणसांनाही आवश्यक असेल तेवढे वापरा आणि त्यानंतर टाकून द्या, अशी ही मानसिकता निर्माण करण्यात आली आहे. याच्या जोडीला माध्यमांमधून चालणाऱ्या सेक्स स्कँडल, खून, हाणामाऱ्या, बलात्कार, तंत्रमंत्र यांच्या बातम्या आणि व्हिडीओ यामुळे समाज जीवनामध्ये सामूहिक नैराश्य आणि भीतीचे वातावरण पसरत जाते.

आयुष्य सुंदर आहे आणि ते श्रमाने अधिक सुंदर करता येते, हा विचार नष्ट झाला आहे. मानवी श्रमाला किंवा भावभावनांना पैशाच्या तराजूत तोलणाऱ्या आणि दिखाऊ-बाजारू व्यवस्थेला विकास समजणाऱ्या व्यवस्थेचे आपण वाहक बनलो आहोत. आपल्या भारतीय समाजाची अवस्था सुद्धा पत्ता हरवलेल्या अमेरिकेसारखी व्हायला फार काळ नाही, असे आजचे धोकादायक अस्वस्थ वर्तमान आहे.


- डॉ. प्रवीण बनसोड