जादुई अंगठीची लोककाणी

पूर्वी अंगणात रात्रीच्यावेळी झोपल्यावर मनोरंजनासाठी म्हणून घरातली मोठी माणसे लहानांना काणी सांगयचे. आता नवीन पर्व याच काणीयांचे!

Story: भरजरी - भाग -१ |
04th April, 10:52 pm
जादुई अंगठीची लोककाणी

​एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता. त्या व्यापाऱ्याला तीन मुलगे होते. तिन्ही मुले एकदम आळशी. घरात नुसते पडून असायचे. ना काम ना धंदा. व्यापाऱ्याने तिघांनाही समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण पालथ्या घागरीवर पाणी. त्यांच्या या वागण्याचा व्यापाऱ्याला खूप राग येई. एके दिवशी व्यापाऱ्याने एक निश्चय केला. त्या तिघांनाही आपल्याजवळ बोलावले. प्रत्येकाच्या हातावर तीन-तीन रुपये ठेवले आणि सांगितले,

​“तुम्हाला तीन वर्षांची मुदत देतो. या तीन वर्षांत या तीन रुपयांचे एक हजार रुपये जो कोण करेल, तोच पुन्हा या घरात येऊ शकेल. तोपर्यंत घरात पाऊल टाकायचे नाही.” तिघाही मुलांनी घराकडे पाठ केली. गावाच्या वेशीबाहेर पोहोचताच तिघेही तीन दिशांना गेले.

​मोठा मुलगा चालत-चालत एका नगरात पोहोचला. तिथे एक कापूसवाला कापूस विकायला बसला होता. त्याने त्या कापूसवाल्याकडून तीन रुपयांचा कापूस विकत घेतला. त्या कापसापासून वाती तयार केल्या. त्या वाती बाजारात नेऊन विकल्या. तीन रुपयांच्या कापसाच्या वातींचे तीस रुपये नफा झाला. त्या रुपयांमध्ये त्याने अजून कापूस घेतला. कापसापासून सूत तयार केले. तीस रुपयांच्या कापसाच्या सुताचे शंभर रुपये झाले. त्या शंभर रुपयांपासून त्याने सूत घेतले. सुतापासून साडी विणली. साडी विकून अजून जास्त नफा झाला. करता-करता तीन वर्षांत तो साड्यांचा मोठा व्यापारी बनला.

​मधला मुलगा चालत-चालत एका गावात पोहोचला. तिथे त्याला एक शेतकरी भेटला. तो शेतकरी गाजर काढत होता. मुलाने त्याच्याकडून तीन रुपयांची गाजरे घेतली. ती नगरातल्या मोठ्या बाजारात नेऊन विकली. झालेल्या नफ्यातून त्याने अजून गाजरे घेतली. ती पुन्हा नेऊन नगरातल्या बाजारात विकली. अशा प्रकारे भाज्यांचा व्यापार करून त्याने काही पैसे जमवले. जमवलेल्या पैशातून एक शेत घेतले. त्यानंतर तो स्वतः शेती करून उत्पन्न बाजारात नेऊन विकू लागला. अशा प्रकारे त्याच्या शेतीचा व्यवसाय वाढला. तिसऱ्या वर्षाच्या अखेरीस त्याच्याकडे मोठे शेत आणि भाजीपाल्याचा मोठा व्यवसाय होता.

​तिसरा मुलगा चालत-चालत रानात पोहोचला. तिथे त्याला एक मनुष्य भेटला. तो एका कुत्र्याला पाण्यात बुडवायला चालला होता. मुलाने त्या मनुष्याला विचारले, “भल्या माणसा, तू या कुत्र्याला घेऊन कुठे चालला आहेस?”

“अरे, काय सांगू तुला? माझ्याकडे दोन कुत्रे आहेत. हा तिसरा. सगळ्यांना सांभाळणे मला आता परवडत नाही. म्हणून याला मी बुडवून मारण्याचा विचार करतोय.”

“तू या कुत्र्याला बुडवू नकोस, मला दे. त्याच्या बदल्यात मी तुला एक रुपया देतो.”

मारायला नेत असलेल्या कुत्र्याच्या बदल्यात एक रुपया मिळत असेल तर कोणाला नको वाटणार? त्या मनुष्याने आनंदाने तो कुत्रा मुलाच्या स्वाधीन केला. कुत्र्याला घेऊन मुलगा पुढे जाऊ लागला. तिथे त्याला एक जण मांजराला मारताना दिसला. मुलाला मांजराची कणव आली.

“भल्या माणसा, तू या मांजराला का मारत आहेस?”

“या मांजराने माझ्या घरातील सर्व दूध पिले. अशा चोरट्या मांजराला मारणेच योग्य.” म्हणून त्या माणसाने मांजराला मारण्यासाठी पुन्हा काठी उचलली. ती अडवत मुलगा म्हणाला, “मी या मांजराच्या बदल्यात तुला एक रुपया देतो. तू हे मांजर मला दे.” तो माणूस आनंदाने तो रुपया घेऊन मांजराला तिथेच टाकून निघाला.

​मांजराला आणि कुत्र्याला घेऊन मुलगा पुढे निघाला. तिथे त्याला एक मनुष्य एका सापाला ठेचण्याच्या तयारीत दिसला. मुलाला सापाचीही दया आली.

“भल्या माणसा, या सापाला का मारत आहेस?”

“अरे हा कोणालाही चावू शकतो. सापाची ब्याद दूर करावी, म्हणून मी याला मारतो.”

“तू या सापाला मारू नकोस, त्या बदल्यात मी तुला हा एक रुपया देतो.” आपल्या जवळचा उरलेला फक्त एक रुपया, तो सुद्धा त्या अनोळखी माणसाला देऊन मुलाने सापाला आपल्याजवळ घेतले.

त्यानंतर कुत्रा, मांजर आणि साप या तिघांना घेऊन तो भ्रमंती करू लागला. नवनवीन गावे, नगरे, डोंगर, जंगले फिरू लागला. तीन वर्षे भ्रमंती केल्यानंतर तो आपल्या गावी परत निघाला.

​ठरल्या दिवशी तिन्ही भाऊ गावाच्या वेशीपाशी भेटले. मोठा भाऊ कापडाचा व्यापारी बनला होता. श्रीमंती त्याच्या कपड्यांमधून झळकत होती. मधला भाऊ मोठा शेतकरी बनला होता. त्याने आणलेल्या बैलगाडीच्या बांधणीवरून त्याची श्रीमंती झळकत होती. तिसरा मुलगा मात्र साधारण कपड्यांत होता. त्याच्याजवळ साप, मांजर आणि कुत्रा याखेरीज काहीच नव्हते. तिघेही घरी पोहोचले.

​वडिलांच्या सांगण्याप्रमाणे दोन्ही मुलगे धनवान होऊन आले होते. पण तिसऱ्या मुलाने मात्र काहीच मिळकत आणली नव्हती. याचा वडिलांना फार राग आला. त्यांनी दोन्ही मुलांना सन्मानाने घरात घेतले, पण तिसऱ्या मुलाला मात्र घरातून हाकलून लावले. बिचारा मुलगा, प्राण्यांविषयी त्याला दया असल्यामुळे त्याने ते पैसे त्यांचा जीव वाचवण्यासाठी दिले होते. त्यामुळे त्याच्या हातात काहीच न उरल्याने त्याला कोणताही व्यवसायही करता आला नाही. पण त्याचे हे वागणे वडिलांना पटले नाही. शेवटी तिसऱ्या मुलाने वडिलांच्या पाया पडून कुत्र्याला आणि मांजराला घरात आसरा द्यायला सांगितले आणि सापाला सोबत घेऊन घराकडे पाठ करून चालायला लागला.

​चालत-चालत तो एका जंगलात पोहोचला. तिथे त्याला एक वारूळ दिसले. मुलाने सापाला वारुळाजवळ ठेवले आणि सांगितले, “बाबा, आतापर्यंत तू माझ्यापाशी सुरक्षित होतास, पण आता मला पोटापाण्यासाठी काहीतरी कामधंदा बघावा लागेल. अशा परिस्थितीत मी तुला माझ्याजवळ ठेवू शकत नाही. तेव्हा तू या वारुळात आसरा घे आणि तुझे पुढचे आयुष्य इथेच निवांतपणे जग.” असे म्हणून मुलाने सापाला वारुळाजवळ सोडले. एवढ्यात एक चमत्कार झाला. सोडलेल्या सापाने आपला फणा उभारला आणि तो चक्क बोलू लागला,

​“मित्रा, जिथे सारे जग स्वतःचा स्वार्थ बघते, तिथे निस्वार्थीपणाने तू माझा आणि त्या कुत्र्या-मांजराचा जीव वाचवलास. त्यासाठी तू स्वतःजवळील सगळी पुंजी खर्च केलीस, वडिलांची नाराजी पत्करलीस, पण तुझा हा त्याग व्यर्थ जाणार नाही. मी एका तपस्वी सापाचा मुलगा आहे. माझे तपस्वी वडील नदीकाठी असलेल्या वारुळात तप करीत आहेत. त्यांच्या तपामुळे त्यांना मोठी दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे. तसेच त्यांच्या शेपटीला एक अंगठी आहे. ती अंगठी जादुई आहे. प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची ताकद त्या अंगठीमध्ये आहे. तेव्हा तू त्या नदीकाठी जा. तुझ्याकडून शक्य होईल तशी तिथे तू माझ्या वडिलांची सेवा कर. ते तुझ्यावर नक्की प्रसन्न होतील. प्रसन्न होऊन त्यांनी वर मागायला सांगितले, तर त्यांच्या शेपटीत असलेली अंगठी मागून घे. तुझे भले होईल.”

​निस्वार्थपणे केलेली प्राण्यांची सेवा मुलासाठी वरदान ठरली. तो उत्साहाने त्या नदीकाठी जाऊ लागला. नदीकाठी पोहोचताच त्याला ते दैवी वारूळ दिसले.

​क्रमश:


- गाैतमी चाेर्लेकर गावस