मागच्या दोन भागात आपण पाहिले… वड्यांवरून रागावलेल्या भटजीने सात मुलींना जंगलात सोडले. त्यांनी राक्षसाला हरवून वाडा मिळवला. कुण्याच्या खोलीमुळे गरिब राहिलेल्या सातव्या बहिणीला कष्टांतून जादुई मोर व अफाट संपत्ती मिळाली.

राक्षसाच्या घरात येऊन आज पहिल्यांदा सगळ्या बहिणी घराबाहेर जाणार होत्या. त्यांना राक्षसाच्या घराची संपत्ती मिळाली होती. आज जत्रेत जाऊन आपल्याकडे असलेल्या संपत्तीचे प्रदर्शन त्यांना करायचे होते. त्यामुळे आपापल्या जवळील प्रत्येक महागडी वस्तू त्यांनी परिधान केली. महागड्या साड्या नेसल्या, मौल्यवान दागिने घातले. सजल्या-सवरल्या आणि सातव्या बहिणीच्या खोलीपाशी आल्या. रोजच्या प्रमाणे तिची खिल्ली उडवत त्या तिला म्हणाल्या, “ए कुण्या कुस्कुड्या, काय गो करतय?” “काय ना, कुणो कुस्कुडतय.” “कुस्कड बाये, आम्ही वयतूय नाटक बघूक. तिया येतंय?” “ना गे बाये, माका कुणो कुस्कडचो आसा.” सगळ्या बहिणी फिदीफिदी तिच्यावर हसत नाटकाला निघाल्या. सातवी बहीण उदास झाली. आपल्या डोळ्यांदेखत आपल्या मोठ्या बहिणींचा बदललेला स्वभाव ती बघत होती.
दुसऱ्या गावात जाणारी वाट जंगलातून जात होती. सहाही बहिणी त्या वाटेवरून निघाल्या. महागडे कपडे आणि मौल्यवान डागडुगिन्यांमुळे त्या सहाही मुली अप्सरेसारख्या भासत होत्या. हसत-खेळत, मौजमजा करत त्या आपल्याच धुंदीत वाट चालत होत्या. जंगलाच्या मध्यभागी पोहोचताच त्यांना झाडीतून कसलीतरी चाहूल लागली आणि बघता बघता त्यांच्यासमोर दरोडेखोर उभे राहिले. दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरचे दागदागिने बघितले. मग काय, व्हायचे तेच झाले! दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरचे सगळे दागदागिने काढून घेतले, त्यांची वस्त्रेही काढून घेतली आणि ते पळून गेले. इतका वेळ आपल्या दागदागिन्यांचा आणि मौल्यवान वस्त्रांचा माज करणाऱ्या सहाही बहिणी विवस्त्र झाल्या. त्यांच्या अंगावर एकही दागिना राहिला नाही. शेवटी त्यांनी करमळाच्या झाडाची पाने काढली, आपल्या अंगाभोवती गुंडाळली आणि त्या वाट चालू लागल्या. परतीची वाट खूप लांब होती, त्यामानाने जत्रेचा गाव जवळ होता; म्हणून त्या गावाच्या दिशेने चालू लागल्या आणि गावाच्या वेशीजवळ जाऊन थांबल्या.
इकडे कुणा कूसकुडणाऱ्या बहिणीने आपले काम चालूच ठेवले होते. त्यामधून तिला अनेक दिव्य वस्तू मिळत गेल्या—भरजरी वस्त्रे, मौल्यवान दागिने आणि जादुई वस्तू. हे सापडत असतानाच तिला एक जादुई मोर सापडला, जो दिसायला छोटासा, मुठीएवढा आणि नवरत्नांचा मोर असल्यासारखा वाटत होता. पण जमिनीवर ठेवताच त्याचा खराखुरा मोर व्हायचा आणि तो उंच आभाळात दिमाखात उडायचा. या मोरावर बसून सातवी बहीण कधी मध्यरात्री फिरायला जायची आणि आपले मनोरंजन करायची. आजही आपल्या बहिणी गेल्यानंतर तिने आपले काम बाजूला ठेवले. आपल्याला मिळालेली मौल्यवान वस्त्रे नेसली आणि रत्नजडित दागिने घातले. या मौल्यवान वस्त्रांमुळे आणि दागिन्यांमुळे ती स्वर्गातली अप्सरा भासत होती. त्यानंतर ती मोरावर बसली. सोबत आपल्याजवळील अनेक लहान-मोठ्या रत्नजडित वस्तू आणि भरजरी वस्त्रे घेतली आणि ती जत्रा असलेल्या गावाच्या दिशेने आभाळातून उडत उडत गेली.
उडत उडत जाताना तिला त्या घनदाट जंगलात दरोडेखोर दिसले. तिला तिथे आपल्या बहिणींचे जप्त केलेले दागदागिने आणि कपडे दिसले. पुढे वेशीवर आपल्या बहिणी करमळाची पाने नेसून बसलेल्या तिने पाहिल्या. तिला फार दुःख झाले. तिने आपल्या जादुई मोराला विनंती केली की, तिला त्या बहिणींपाशी घेऊन जावे. मोराने सांगितल्याप्रमाणे तो त्या सहाही बहिणींच्या जवळ जाऊन उभा राहिला. दुःखी-कष्टी झालेल्या सहा बहिणींनी मोराला पाहिले आणि त्याच्यावरून कोणीतरी अप्सरा उतरत असलेली पाहिले. सातवी बहीण एवढी सुंदर दिसत होती की, इतर सहा बहिणींनी तिला ओळखलेसुद्धा नाही. सातव्या बहिणीने आपल्या जवळील भरजरी वस्त्रे आणि काही दागिने आपल्या सहाही बहिणींना दिले. त्यानंतर ती जत्रेला गेली. आपल्याजवळील इतर मौल्यवान वस्तू तिने तिथल्या गोरगरिबांना वाटल्या आणि मग ती माघारी परतली. पुन्हा आपल्या कुण्या कुस्कुडण्याच्या कामाला लागली.
इकडे सहाही बहिणींनी आपल्याला दिलेली वस्त्रे परिधान केली आणि त्या निमूट माघारी परतल्या. सगळ्यांचेच चेहरे उतरले होते. घरी परतल्यावर त्यांनी पाहिले की, आपली सातवी बहीण नेहमीप्रमाणे कुण्या कुस्कुडण्याच्या कामाला लागलेली आहे. सातव्या बहिणीने त्यांना विचारले, “ताई, कशी झाली जत्रा?” पण या सहा बहिणी सांगणार तरी काय? कारण या तिला मिजास दाखवून मिरवत मिरवत जत्रेला गेल्या होत्या, वाटेत दरोडेखोरांकडून लुटल्या गेल्या होत्या आणि कोणीतरी देवीसमान स्त्रीने त्यांची लाज राखली होती. पण आता बहीण चौकशी करते आहे म्हटल्यावर जत्रेविषयी काहीतरी सांगायला हवेच ना! एक जण म्हणाली, “अगं काय सांगू तुका! खूप मजा केली आम्ही! तुका खबर असा, त्या जत्रेत एक अप्सरा सुद्धा आयली होती?” “आता कसं कळतलं, मी तर तुमच्या वांगडा येवक सुद्धा नाय. मी हुय कुणा कुस्कुडत असलय.” “ती अप्सरा मोरार बसून आयली. तिच्याकडे अनेक मौल्यवान दागदागिने आणि वस्त्रे होती. जत्रेतील गरीब लोकांका ती दागदागिने वाटत होती.” “तुमकां दिले काय तिणे दागदागिने आणि वस्त्रे?” हा प्रश्न ऐकताच बहिणी एकमेकींकडे बघू लागल्या. मोठ्या बहिणीने विचारले, “तू आयली होतीस गो जत्रेक?” “छे, छे, मी कशी येतलंय? माझो कुणो कुस्कुरानच संपाक ना.” “पण ती अप्सरा तुझ्यासारखीच दिसत होती मगो.” सगळ्या बहिणींना त्या अप्सरेचा चेहरा आठवला. “ता बाय मका काय खबर ना!” सातवी बहीण गालातल्या गालात हसत बोलली. ज्या सातव्या बहिणीची खिल्ली उडवत इतर सहा बहिणी जत्रेला गेल्या होत्या, त्या सहाही बहिणींची अब्रू आज सातव्या बहिणीमुळेच वाचली होती.
पण आज घडलेल्या प्रसंगामुळे सहाही बहिणींचे डोळे खडखडून उघडले. आपण ज्या संपत्तीचा मोह धरला ती संपत्ती क्षणिक आहे, याची त्यांना जाणीव झाली. त्या संपत्तीचा मोह धरून आपण आपल्या लहान बहिणीला कमी लेखले, पण आज तिच्यासारख्याच कोणीतरी येऊन आपल्यावर अनंत उपकार केले. आजवर आपण आपल्या सातव्या बहिणीची केलेली चेष्टा त्यांना आठवली. आपल्या वागणुकीबद्दल त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी सातव्या बहिणीची माफी मागितली. आजवर आम्ही तुला खूप हिणवले याबद्दल त्यांना पश्चाताप झाला. सातव्या बहिणीनेही आपल्या बहिणींना मनापासून माफ केले. त्यानंतर त्या सगळ्याजणी गुण्यागोविंदाने एकत्र राहू लागल्या. (समाप्त)

- गाैतमी चाेर्लेकर गावस