ही वाट चालताना..!

Story: पुस्तक |
23rd May, 10:33 pm
ही वाट चालताना..!

‘न​​​​​शा विरुद्ध प्रेम' अशा संकल्पनेवर आधारित लघुकादंबरी म्हणजे 'ही वाट चालताना'. दारू, ड्रग्जची नशा हे आपल्या गोव्याला हळूहळू विळख्यात घेणारे भयावह संकट आहे. आज या गोष्टी सर्रास होताना दिसतात, मात्र काही वर्षांपूर्वी खूप कमी भागांत अशा गोष्टी प्रचलित होत्या. या गोष्टी हमखास होण्याचे तेव्हाचे ठिकाण म्हणजे समुद्रकिनारे होय. गोवा ही पर्यटनभूमी असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा सतत राबता असायचा आणि मूळ गोमंतकीय तरुण-तरुणी त्यांची सरबराई करून चार पैसे कमावायचे. मात्र, पोटासाठी राबताना ही निरागस मुले कधी त्या विळख्यात सापडायची, त्यांचे त्यांनाही समजायचे नाही. अशा वेळी क्वचितच कोणीतरी त्यातून बाहेर पडे, अन्यथा त्यांच्या आयुष्याची धुळधाण ठरलेली असे.

​कलंगुट या गोव्याच्या प्रसिद्ध समुद्रकिनारी भागात घडणारी ही कथा आहे. उच्चवर्णीय ख्रिश्चन कुटुंबात घडणाऱ्या या घडामोडी आहेत. गोव्यातून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ऐसपैस आडवी पसरलेली, उंच पण रिकामी दिसणारी घरे आपण बघतो. घरासभोवती दगडी चौथरा, आतमध्ये प्रवेशद्वारालगत आंब्याचे किंवा जांभळाचे मोठे झाड, उंच पायऱ्या, मोठ्या खांबांचा व्हरांडा, पायऱ्यांलगतचे बाक (बाकबजा), सिमेंटचे बलकांव व त्या बलकांवावर आपल्या मुटमुटू डोळ्यांनी गेटकडे नजर लावून बसलेले म्हातारे खोड! त्या गेटमधून बाहेर गेलेले तिचे सोयरे... मुलगे, मुली, नातवंडे... कधीतरी या घराच्या ओढीने परत येतील या आशेवर जगणारी ती म्हातारी माय... या प्रचंड, रिकाम्या घरांत पाठीमागे उभा असतो तो तिचा भूतकाळ आणि गेटच्या बाहेर असतो भविष्यकाळ. यामध्ये लटकणारी ती उरते, वर्तमानकाळातच बनलेली एक शीला... ती जिवंत असते, तोवर घर उभे राहणार असते. पण तिच्यानंतर? असा प्रश्न प्रस्तावनेतून माधवी देसाईंनी मांडला आहे.

​पुस्तकाच्या कृष्णधवल मुखपृष्ठावर रेखाटलेले दोन धूसर चेहरे आणि भरगच्च झाडांच्या मधोमध उभे पोर्तुगीज बनावटीचे टुमदार घर वाचकांचे लक्ष वेधून घेते. दुरावलेल्या नात्यांना प्रेमाने जवळ आणण्याचा प्रयत्न या कादंबरीतून प्रदर्शित करण्यात लेखिकेला यश आले आहे. फिलोमिना माय, फ्रँक, एडगर, लुईजा (लिना), आशिष, देबाशिष, जॉय, अॅना ही पात्रे कादंबरीभर वावरत असतात. या पात्रांभोवती प्रसंग फिरतात. फिलोमिना आणि फ्रँक या जोडप्याला झालेली दोन मुले म्हणजे एडगर नि लुईजा. फिलोमिनाची मदर मेरीवर अपार श्रद्धा; तिच्या कृपेने सारे सुरळीत होईल असा विश्वास. कादंबरीची सुरुवात तिच्या वाट पाहण्याने होते. ती एकटीच आपल्या भल्यामोठ्या पोर्तुगीज पद्धतीने बांधलेल्या घरात आहे; सोबतीला नाही म्हणायला तिची नात अॅना जी असून नसल्यासारखी आहे आणि नोकर मारिया आहे. पण तरीही ती एकटीच आपल्या जीवाभावाच्या माणसांची वाट बघत बसलेली. लुईजा तीच मुलगी जिने आंतरधर्मीय विवाह केलाय आणि एडगर तिचा मुलगा ज्याने आंतरजातीय विवाह केलाय, ज्यामुळे फ्रँकने दोघांना घराबाहेर काढलेय. पण तो धक्का सहन न झाल्याने फ्रँकने अर्ध्या वाटेवर तिची साथ सोडली अन् ती एकटी राहिली.

​लुईजाला आंतरधर्मीय विवाह करून नवऱ्याने घेतलेल्या संशयामुळे उद्ध्वस्त व्हावे लागले नि तो गेल्यावर ती आपल्या मुळांकडे गोव्यात परतली. एडगर आणि मार्थाचे नेहमीच पैशांवरून भांडण होत राहिले, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलाला गमावले नि स्वतःही अपघातात गेले; परिणामी अॅना पोरकी होऊन आजी फिलोमिनाच्या आसऱ्याला आली. तरी लहानपणापासून प्रेम न मिळाल्याने, प्रेमाच्या आशेने ती नशाग्रस्त झाली. पण या सगळ्यांच्या आयुष्यावर प्रेमाची फुंकर घालणारा दुवा म्हणजे 'जॉय' जो स्वतः डॉक्टर आहे. तो आपल्या पुढील शिक्षणासाठी 'जीएमसी'ची निवड करतो आणि आईच्या माहेरी येतो. तेव्हा त्याची भेट अॅनाशी होते. त्यापूर्वी मित्राच्या लग्नाला आलेला असताना तिला दुरून पाहून तिच्या प्रेमात पडलेला जॉय, तिला जाणून घेतो, समजावतो, प्रसंगी दटावतोही आणि तिला बदलण्याचा दृढ निश्चय करतो. अॅनाही त्याच्या प्रेमाच्या जोरावर नशामुक्त होते आणि दोघे एकत्र प्रवासासाठी सज्ज होतात.

​आजकालच्या धकाधकीच्या जीवनात 'प्रायव्हसी', 'न्यूक्लियर फॅमिली' अशा संकल्पना रूढ होताना दिसत आहेत, मात्र शेवटी मानवी जीवनात प्रेम, नाती यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे; मानवी भावनांची जागा कुठल्याही कृत्रिम साधन-सुविधा घेऊ शकत नाहीत. 'नात्यातील प्रेम' हा या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. या प्रेमामुळेच माणूस अनेक दिव्य करायला सज्ज होतो. त्याचेच जिवंत उदाहरण म्हणजे या कादंबरीत मांडलेली 'नशामुक्ती'. ही कादंबरी गोमंतकीय पार्श्वभूमीवर आधारित असल्यामुळे यात बागा, वागातोर, पणजी, बांबोळी, दोना पावला या ठिकाणांचा उल्लेख आढळतो. कोंकणी भाषेचा वापर बऱ्यापैकी संवाद, शब्द आणि वर्णन स्वरूपात दिसून येतो. बिबिंका, दोदोल (दोदॅल) अशा चविष्ट गोमंतकीय पदार्थांची रेलचेलही यात आपल्याला पाहायला मिळते. फिलोमिना मायच्या एकटेपणापासून सुरू झालेली ही कादंबरी जॉय आणि अॅनाच्या निर्मळ मिलनाने विसावते. या त्यांच्या प्रवासातील लहान-मोठ्या सायासांचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी नक्की वाचावी 'ही वाट चालताना'..!

लघुकादंबरी : ही वाट चालताना

लेखिका : सुजाता सिंगबाळ


- अनु देसाई, हळर्ण पेडणे-गोवा