वाढते रस्ते अपघात आणि आगामी पावसाळा पाहता गोव्यातील वाहतूक व्यवस्था चिंतेचा विषय बनली आहे. चालकांचा निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन यामुळे होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी आता कडक पावले उचलण्याची गरज आहे.

राज्यातील रस्ते अपघातांची मालिका दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. अशातच राज्यात पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वाहन चालवावे. वाहतूक पोलीस विभागाने जारी केलेल्या ताज्या मासिक अहवालानुसार, १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२६ या चार महिन्यांत राज्यात ८५१ अपघातांची नोंद झाली आहे. या भीषण अपघातांमध्ये ८९ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, झालेल्या एकूण अपघातांपैकी तब्बल ९२.६२ टक्के अपघात हे केवळ वाहनचालकांचा निष्काळजीपणा, बेफिकिरी आणि वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे घडले आहेत. भरधाव वेगाने वाहन चालवणे, लाल सिग्नल तोडणे, मद्यपान करून गाडी चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. राज्यात मागील दोन दिवसांत ट्रक अपघातात चिरडल्या गेल्यामुळे दुचाकी चालकाचा तसेच पादचाऱ्याचा मृत्यू झाला. यावरून राज्यात पायी चालणेही तितकेच धोकादायक बनले असल्याचे दिसते.
रस्त्यांवरील वाढते अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी गोवा पोलीस सातत्याने जनजागृती उपक्रम, विशेष तपासणी मोहिमा व समुपदेशन राबवत आहेत. तरीही खराब रस्ते, रस्त्यांचे चुकीचे व धोकादायक बांधकाम, अपुरी दिशादर्शक चिन्हे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांची बेफिकीर वृत्ती यामुळे अपघातांचे सत्र थांबायला तयार नाही. त्यामुळे आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर कडक दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
मागील चार महिन्यांच्या आकडेवारीची दखल घेतली असता, एकूण ८५१ अपघातांपैकी ४४.११ टक्के म्हणजे ३७५ अपघात केवळ दुचाकींचे झाले आहेत. मृत्यूंच्या आकडेवारीत तर परिस्थिती अधिक गंभीर आहे. एकूण ८९ मृत्यूंपैकी ७७.५२ टक्के म्हणजेच ६९ मृत्यू दुचाकी चालक किंवा त्यांच्या मागे बसलेल्या सहप्रवाशांचे झाले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक चिंताजनक आहे. हेल्मेट न घालणे, तिहेरी सीट (ट्रिपल सीट), अचानक लेन बदलणे, मोबाईलवर बोलणे अशा कारणांमुळे दुचाकीस्वार सहज बळी पडत आहेत.
अहवालानुसार सर्वाधिक ३३.६४ टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. महामार्गावरील अतिवेग, ओव्हरटेकिंगची घाई आणि रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था यामुळे धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या ३३५ अपघातांच्या तुलनेत दिवसा ५१६ अपघात झाले आहेत. याचा अर्थ वर्दळीच्या वेळेतही चालकांचे दुर्लक्ष होत आहे. याशिवाय इतर ठिकाणी अरुंद रस्ते, धोकादायक वळणे आणि वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात होत आहेत.
'उशिरा झाला तरी चालेल, पण सुरक्षित पोहोचणे महत्त्वाचे आहे' हे प्रत्येक वाहनचालकाने लक्षात ठेवावे. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने रस्त्याची वेगमर्यादा पाळावी. 'ड्रंक अँड ड्राईव्ह' हा दखलपात्र गुन्हा असून त्यासाठी १० हजार रुपये दंड आहे. असे असतानाही वाहनचालकांवर याचा काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे या नियमात बदल करून थेट कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे.
अशाच पद्धतीचा एक अपघात १९ मे रोजी रात्री दोनापावला येथे घडला. त्यात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू (BMW) कार चालवून तीन वाहनांना धडक देण्यात आली होती. त्यातील एक महिंद्रा ईव्ही (EV) कार त्याच दिवशी सकाळी खरेदी केली होती. त्या कार मालकाने 'आपण विमा कंपनीकडून नुकसान भरपाई घेणार आहोत' असे सांगून संबंधित कार चालकाविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला. याशिवाय इतर कार मालकांनीही तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे बीएमडब्ल्यू कार चालकावर कायदेशीर प्रक्रिया करण्यास पोलिसांना अडचण आली. त्यावेळी त्या कार चालकाला पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक करून उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यावेळी त्याला ७५ हजार रुपयांचा बाँड, सहा महिने दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावणे व इतर हमीची ताकीद देण्यात आली. सदर चालकाला यापूर्वीही दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे न्यायालयाने ११ हजार रुपये दंड ठोठावला होता. यावरून अशा दंडाचा त्याच्यावर काहीच परिणाम झालेला नसल्याचे समोर आले आहे.
वाहन चालवताना मोबाईलवर कॉल, मेसेज करणे किंवा रील्स पाहणे टाळा. एक सेकंदाचे दुर्लक्ष आयुष्यभराचा पश्चात्ताप देऊ शकते. तसेच ओव्हरटेक करताना समोरून वाहन येत नाही ना, याची खात्री करा. पादचारी व सायकलस्वारांना प्राधान्य द्या. झेब्रा क्रॉसिंग, शाळा व बाजारपेठेजवळ वाहनाचा वेग कमी करा. दरम्यान, राज्यात पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पावसाळ्यापूर्वी ब्रेक, टायर, वायपर, हेडलाईट तपासून घ्यावेत, तसेच रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर व पार्किंग लाईटचा वापर करावा. याशिवाय 'नो एंट्री', 'वन वे', 'स्पीड ब्रेकर' अशा सूचनांकडे दुर्लक्ष न करता, वाहतूक चिन्हांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाचे म्हणजे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चारचाकी चालवू देऊ नये. वाहनचालकांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, तुमच्या एका चुकीमुळे स्वतःचा किंवा दुसऱ्याचा जीव जाऊ शकतो.
अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित खात्याकडून कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याशिवाय राज्यात दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही हेल्मेट अनिवार्य करावे. दुचाकीस्वारांनी आयएसआय (ISI) मार्क असलेले हेल्मेट वापरणे व चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावणे कायद्याने बंधनकारक आहे, त्याची कडक अंमलबजावणी व्हावी. यासोबतच खराब रस्ते, खड्डे व चुकीच्या पद्धतीने तयार केलेले स्पीड ब्रेकर यांची तातडीने दुरुस्ती करावी. अपघात प्रवण क्षेत्रांत (ब्लॅक स्पॉट्स) सीसीटीव्ही, स्पीडगन व योग्य प्रकारचे पथदिवे बसवावेत. तसेच शाळांमध्ये 'रस्ता सुरक्षा' हा विषय सक्तीचा करावा.
अपघात सहज होत नसतात, ते कोणाच्या तरी चुकीमुळे होत असतात आणि त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पोलीस, सरकार आणि नागरिक या तिघांनी एकत्र येऊन काम केले, तरच राज्यात अपघातांचे तसेच अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी होणार आहे.

- प्रसाद शेट काणकोणकर, (लेखक गोवन वार्ताचे वरिष्ठ प्रतिनिधी आहेत.)