चीज चिकन क्रिस्पी फ्राय

Story: चमचमीत रविवार |
23rd May, 10:31 pm
चीज चिकन क्रिस्पी फ्राय

साहित्य :

बोनलेस चिकन: पाव किलो (लांब आणि पातळ पट्ट्यांमध्ये किंवा लहान चौकोनी तुकड्यांमध्ये कापलेले)

आले-लसूण पेस्ट: १ छोटा चमचा

सोया सॉस: १ छोटा चमचा

काळी मिरी पावडर: अर्धा छोटा चमचा

मिक्स्ड हर्ब्स किंवा ओरिगाॅनो: अर्धा छोटा चमचा

अंडे: १ (फेटलेले)

कॉर्नफ्लावर: २ मोठे चमचे

मैदा: १ मोठा चमचा

मीठ: चवीनुसार

प्रोसेस्ड किंवा मोझारेला चीज: १ वाटी (किसलेले)

बटर: १ ते २ मोठे चमचे

बारीक चिरलेला लसूण: १ मोठा चमचा

बारीक चिरलेली हिरवी मिरची: २ (आवडीनुसार)

दूध: अर्धा कप

चिली फ्लेक्स: १ छोटा चमचा

बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कांद्याची पात: सजावटीसाठी

तेल: चिकन तळण्यासाठी

कृती : 

स्वच्छ धुवून सुकवलेल्या चिकनच्या तुकड्यांमध्ये आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, काळी मिरी पावडर, मिक्स्ड हर्ब्स, फेटलेले अंडे, कॉर्नफ्लावर, मैदा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करा आणि हे मिश्रण पंधरा मिनिटे बाजूला मुरु द्या. त्यानंतर एका कढईत तेल चांगले गरम करून हे मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे मध्यम आचेवर छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून एका टिश्यूपेपरवर काढून ठेवा. आता चीज सॉस तयार करण्यासाठी दुसऱ्या एका पॅनमध्ये बटर गरम करा आणि बटर वितळल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून लसणाचा छान सुगंध सुटेपर्यंत एक मिनिट परतून घ्या. त्यानंतर गॅस बारीक करून पॅनमध्ये अर्धा कप दूध ओता आणि दुधाला हलकी उकळी आल्यावर त्यात किसलेले चीज घालून मंद आचेवर चमच्याने सतत ढवळत राहा, जेणेकरून चीज दुधात पूर्णपणे वितळून एक घट्ट, क्रीमी सॉस तयार होईल. 

शेवटी या गरमागरम चीज सॉसमध्ये आधी तळून ठेवलेले क्रिस्पी चिकनचे तुकडे घाला, वरून चिली फ्लेक्स आणि थोडे मिक्स्ड हर्ब्स भुरभुरा आणि हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून चीजचे कोटिंग सर्व तुकड्यांना व्यवस्थित लागेल. चिकन जास्त वेळ परतू नका नाहीतर त्याचा कुरकुरीतपणा कमी होईल, आता गॅस बंद करा आणि वरून कोथिंबीर किंवा कांद्याची पात घालून गरमागरम चीज चिकन क्रिस्पी फ्राय सर्व्ह करा.


- शिल्पा रामचंद्र, मांद्रे