श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील फरक ओळखणे ही आजच्या समाजाची गरज आहे. साप हा निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे, शत्रू नाही. अंधविश्वासामुळे निरपराध सापांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक होणे आवश्यक आहे.

भारतीय संस्कृतीत सापाला प्राचीन काळापासून विशेष महत्त्व दिले गेले आहे. अनेक धार्मिक कथा, पुराणे आणि लोकपरंपरांमध्ये सर्पाचा उल्लेख आढळतो. नागपंचमीसारख्या सणांमध्ये सापाची पूजा केली जाते. परंतु ज्या समाजात सापाला देवतेचे स्थान दिले जाते, त्याच समाजात अंधश्रद्धा, गैरसमजामुळे त्यांचा सर्वाधिक छळही होतो. आजही देशाच्या अनेक भागांत सापांविषयी चुकीच्या समजुती पसरलेल्या आहेत आणि याच अंधविश्वासामुळे हजारो साप दरवर्षी मारले जातात.
ग्रामीण भागात सापांविषयी अनेक कथा ऐकायला मिळतात. “साप बदला घेतो”, “नाग-नागीण जोडीदाराचा चेहरा लक्षात ठेवतात”, “सापाजवळ नागमणी असतो”, मण्यार उडी मारुन चावा घेतो, नाग सुड उगवतो, हरयाळी डोक्यावर फुंकर मारते यासारखे समाजात असलेले गैरसमज अंधश्रद्धेचा गाभा बनतात आणि याचा फायदा भोंदू बाबा, ढोंगी साधू, मांत्रिक, तांत्रिक घेतात. प्रत्यक्षात विज्ञानाने जरी या गोष्टी खोट्या ठरवलेल्या असल्या तरी एकविसाव्या शतकातही कित्येक सुशिक्षित, उच्चभ्रू, प्रतिभावंत, प्रतिष्ठित व्यक्ति आयुष्यात झटपट यश संपादित करण्यासाठी मांत्रिक, तांत्रिकाकडे वळत असल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात.
साप हा अत्यंत संवेदनशील पण भित्रा प्राणी आहे. तो माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. माणूस त्याला त्रास देतो किंवा त्याच्यावर अचानक पाय पडतो तेव्हाच तो स्वतःच्या संरक्षणासाठी दंश करतो. अंधश्रद्धेमुळे सापांचा सर्वाधिक छळ होतो. वैज्ञानिकदृष्ट्या साप दूध पित नाही; कारण तो सस्तन प्राणी नाही. तहान लागल्यामुळे तो कधी दूध चाटू शकतो, पण ते त्याच्या शरीरासाठी घातक असते. अनेक वेळा साप दूध पितो हे लोकांना पटवून देण्यासाठी त्यांना उपाशी ठेवले जाते. दूध समोर ठेवत त्याला लोकांसमोर आणले जाते. तहानेने व्याकुळ झालेला साप द्रव दिसताच ते चाटण्यासाठी सरसावतो व लोकांमधील गैरसमज अधिक दृढ होतो. अशा रीतीने समाजात अंधश्रद्धा वाढत जाते. काही गारुडी लोकांसमोर खेळ दाखवण्यासाठी विषारी सापांचे दात तोडतात, त्यांचे तोंड शिवतात किंवा विष काढून घेतात. या अमानुष प्रकारांमुळे अनेक साप काही दिवसांतच मरून जातात.
अंधश्रद्धेचा आणखी एक भयंकर प्रकार म्हणजे काळी जादू आणि जादूटोणा. काही भोंदूबाबा लोकांना घाबरवण्यासाठी किंवा स्वतःचे चमत्कार सिद्ध करण्यासाठी सापांचा वापर करतात. “सापाच्या कातडीने धनप्राप्ती होते”, “नागमणी घरात ठेवल्यास श्रीमंती येते”, “विशिष्ट मंत्रांनी साप नियंत्रणात येतो” अशा अफवा पसरवल्या जातात. यामुळे काही लोक पैशाच्या लालसेपोटी साप पकडतात, त्यांची तस्करी करतात आणि त्यांची हत्या करतात. नागमणी नावाची कोणतीही वस्तू प्रत्यक्षात अस्तित्वात नसते, तरीही लोक आजही या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात वनविभागाने एका कारवाईत अनेक विषारी सापांची सुटका केली होती. हे साप धार्मिक विधींसाठी विकले जाणार होते. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार साप पकडणे, त्यांचा व्यापार करणे किंवा त्यांना इजा पोहोचवणे हा गंभीर गुन्हा आहे. तरीही अंधश्रद्धा आणि पैशाचा मोह यामुळे हे प्रकार थांबत नाहीत.
अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनी सापांविषयी योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. सर्पमित्र आणि वनविभाग यांच्या मदतीने सापांना सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्याची सवय लोकांनी लावून घेतली पाहिजे. तसेच भोंदूबाबा आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणेही आवश्यक आहे.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील फरक ओळखणे ही आजच्या समाजाची गरज आहे. साप हा निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे, शत्रू नाही. अंधविश्वासामुळे निरपराध सापांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक होणे आवश्यक आहे.

-स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)