माय माझी आई देवी लईराई

गोमंतकाची माउली, आई लईराई आपल्या भक्तांची परीक्षा घेत असते. जत्रेचे ते पाच दिवस, जेव्हा आई भक्तांना कौल देण्यासाठी मंदिरातून बाहेर येते, तेव्हा तिचा वास कणाकणात जाणवतो. ही कथा आहे अशाच एका निस्सीम भक्त संगीताची.

Story: कथा |
23rd May, 10:40 pm
माय माझी आई देवी लईराई

संगीता एक निवृत्त शिक्षिका. अत्यंत प्रेमळ आणि परोपकारी. स्वतः उपाशी राहील, पण गरजूला अन्न देईल अशी तिची वृत्ती. दरवर्षीप्रमाणे ती आपल्या वाढदिवशी देवीच्या दर्शनाला गेली. मात्र, नेहमी हसऱ्या असणाऱ्या संगीताच्या चेहऱ्यावर यंदा कमालीची उदासीनता आणि थकवा होता. तिला तिच्या आईचे शेवटचे शब्द आठवत होते "गीता, आजपासून देवी आईच तुझी आई!" तेव्हापासून लईराई देवीच तिचे सर्वस्व होती.

मागील वर्षापासून संगीताचे पती गंभीर आजारी होते. त्यामुळे तिला मंदिरात येणे किंवा देवीशी मनमोकळे बोलणे जमले नव्हते. पतीची सेवा करताना ती घरातूनच आपली व्यथा मांडायची. आज मंदिरात तिने आईपुढे मन मोकळे केले, “आई, माझ्याने होईल तेवढी सेवा मी करत आहे. पण त्यांचे रात्रीचे वेदनेने ओरडणे मला सहन होत नाही. त्यांचा त्रास थोडा कमी कर गं माउली!"

नेहमीप्रमाणे दुर्गासप्तशतीचा पाठ करून ती घरी परतली. तोच तिचा शेवटचा सौभाग्य अलंकार ठरला. 'दासनवमी'ला तिच्या पतीचे निधन झाले. दुःखाच्या या कठीण प्रसंगातही देवीची आंतरिक साथ तिच्यासोबत होती. पतीच्या निधनानंतर, एके दिवशी खोली साफ करताना तिला पती आजारी पडण्यापूर्वी अर्धवट राहिलेले ज्ञानेश्वरीचे पुस्तक सापडले. तो मंगळवारचा दिवस होता. संगीताने दुःख बाजूला सारून नव्या उमेदीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला.

२१ एप्रिल २०२६ रोजी देवीची जत्रा होती. पतीच्या निधनानंतर तिने देवीची भेट घेतली नव्हती. “आपण मंदिरात जावे की नाही?" या संभ्रमात ती देवघरात नामस्मरण करत बसली. अचानक तिला मोगऱ्याचा तीव्र सुगंध आला. डोळे उघडले, तेव्हा तिची सून हातात मोगऱ्याची फुले घेऊन उभी होती. “आई, ही फुले देवीला आवडतात ना? तुम्हीच वाहा," सून म्हणाली. संगीताचे डोळे भरून आले. तिने देवीला फुले वाहिली आणि मनोमन एक पण केला, “आई, हे कौलांचे दिवस संपेपर्यंत जर माझ्या घरी ५ सवाष्णी येऊन ओटी घेऊन गेल्या, तर मी तुला नक्की भेटायला येईन." तिने पाच ओट्या काढून ठेवल्या.

काही वेळातच, दारावर चिंचा विकणारी एक स्त्री आली. ती दरवर्षी यायची, पण कधीच काही खायची-प्यायची नाही. मात्र, आज संगीताने आग्रह केल्यावर तिने चहा आणि चपाती-भाजी आनंदाने खाल्ली, वरून अजून दोन चपात्या मागून घेतल्या. संगीताला आश्चर्य वाटले. “याच्या रूपात देवी तर आली नाही ना?" असा विचार करून तिने सुनेकरवी तिला हळद-कुंकू लावले आणि पहिली ओटी दिली. ती स्त्री आशीर्वाद देऊन निघून गेली.

दुसऱ्या दिवशी, पंढरपूरहून दरवर्षी दान मागण्यासाठी येणारी एक काकू अचानक दारावर आली. हिरवा चुडा आणि लाल-हिरवी साडी नेसलेल्या त्या काकूला पाहून संगीता म्हणाली, “तुम्ही तर जानेवारीत येता ना?" काकू म्हणाली, “तेव्हा मुलीची तब्येत बरी नव्हती, म्हणून आता आले." संगीताने तिला साड्या दिल्या. एरवी गावात कुठेही पाणी न पिणाऱ्या त्या काकूने आज स्वतःहून पाणी मागितले. संगीताने तिला आदराने पाणी दिले आणि दुसरी ओटी दिली.

तिसऱ्या दिवशी काही कामानिमित्त संगीताला मांद्रे येथील घरी जावे लागले. “दोन दिवस आई कोणत्या ना कोणत्या रूपात घरी आली, पण आज मी घरी नसताना ती आली तर?" या विचाराने ती व्याकुळ झाली. तिने देवीची माफी मागितली. ती कामात असतानाच मुंबई आणि सावंतवाडीहून कुलदेवीच्या दर्शनासाठी गोव्यात आलेल्या तिच्या तीन बहिणींचा फोन आला. त्या तिघी संगीताला भेटायला आल्या. संगीताने अत्यंत आनंदाने त्या तिघींची पावले धुतली आणि उर्वरित तीन ओट्या त्यांना दिल्या. देवीने आपला पण पूर्ण केला होता; घरात पाच सवाष्णी येऊन गेल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळीच संगीता लईराईच्या मंदिरात पोहोचली. सुनेने तयार केलेली ओटी तिने देवीसमोर ठेवली. देवीचा कौल घेण्यासाठी ती बाहेर पडली, पण देवी नक्की कुठे आहे हे तिला माहीत नव्हते आणि सकाळी तिथे कोणी नव्हतेही. तिने देवीचे नाव घेतले आणि चालत राहिली. पुढे एका घराच्या गेटवर लाल धोतर नेसलेला एक माणूस उभा होता. संगीताने त्याला विचारले, “देवी कुठे आहे माहीत आहे का?"

त्या माणसाने तिच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाला, “अहो, आई कुठे आहे काय विचारता? ही बघा आत आहे! मागील दोन तासांपासून तुमचीच वाट पाहत आहे. या आत!" आत जाऊन पाहते तर तिथे फक्त घरची काही माणसे होती आणि बाहेरून आलेली संगीता एकटीच होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिची खात्री पटली की, आई ही आईच असते; ती आपल्या लेकरासाठी कितीही वेळ वाट पाहू शकते. संगीताने प्रेमाने विणलेली मोगऱ्याची आटी पुजाऱ्याकडे सुपूर्द केली. देवीच्या मूर्तीवर ती फुले अत्यंत लोभस दिसत होती. आईला मनोभावे नमस्कार करून, संगीता कृतकृत्य भावनेने आणि नि:शंक मनाने घराकडे निघाली.


- अंकिता अशोक नाईक