४.२ मीटरचा रस्ता आता ६.५ मीटर रुंद; उतारही केला कमी. चेंगराचेंगरीचा धोका टळणार; आमदार प्रेमेंद्र शेट यांची माहिती

पणजी : प्रसिद्ध शिरगाव जत्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कंबर कसली असून, स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी तयारीचा आढावा सादर केला आहे. गेल्या वर्षी जत्रेदरम्यान ज्या ठिकाणी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली होती, त्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सपाटीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाविकांना कोणताही अडथळा न येता दर्शन घेता यावे, यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

आमदार शेट यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीनुसार, संबंधित रस्त्याचा उतार १ मीटरने कमी करण्यात आला असून, पूर्वीची ४.२ मीटरची रंदी आता ६.५ मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय, रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंतही उभारण्यात आली आहे. यावर्षी 'अग्निदिव्य' स्थळी भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने प्रवेश मिळावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जत्रेच्या काळात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उच्च न्यायालयात सुनावणी आणि प्रशासनाचा 'ॲक्शन प्लॅन'
दुसरीकडे, श्री देवी लईराई जत्रोत्सवाच्या सुरक्षेबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर बुधवारी महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी सरकारची बाजू मांडताना स्पष्ट केले की, २१ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जत्रेसाठी भाविकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आपत्ती व्यवस्थापन आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने एक व्यापक 'ॲक्शन प्लॅन' तयार केला असून, त्याची सविस्तर माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, संपूर्ण मंदिर परिसर आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले जाणार आहे. एका 'संयुक्त कमांड सेंटर'द्वारे सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाईल. एकूणच गेल्या वर्षी घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती हौवू नये यासाठी प्रशासन सज्ज झाले.