मुलीला वाचवण्यास गेलेल्या वृद्धालाही केले जखमी. कुठ्ठाळी येथील घटना.

पणजी : दक्षिण गोव्यातील कुठ्ठाळी येथील व्हाळांत येथे शनिवारी सकाळी एकाने आपल्याच नात्यातील ३४ वर्षीय विवाहित महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिला वाचवण्यासाठी धावलेल्या ६६ वर्षीय वडिलांनाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी ३४ वर्षीय सुशांत नरशीव शिरोडकर या संशयिताविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून आणि मद्याच्या नशेत हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळदास शिरोडकर (वय ६६, रा. व्हाळांत) यांनी या संदर्भात वेर्णा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांची ३४ वर्षीय विवाहित मुलगी शीतल पालेकर ही सध्या आपल्या माहेरी कुठ्ठाळी येथे राहण्यास आली होती. शनिवारी सकाळी ९:४५ च्या सुमारास शीतल घराबाहेरील रस्त्याच्या बाजूला असलेली फुले तोडण्यासाठी गेली असताना, संशयित सुशांत शिरोडकर त्या ठिकाणी आला. सुशांत हा तक्रारदाराचा सख्खा पुतण्या असला तरी, गेल्या काही काळापासून त्यांचे कौटुंबिक संबंध ताणलेले आहेत. घटनेच्या वेळी सुशांत मद्याच्या नशेत होता.
संशयिताने सुरुवातीला शीतलला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुझे लग्न झाले ना तर मग माहेरी कशासाठी आली आहेस? असा जाब विचारत त्याने वाद उकरून काढला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सुशांतने आपल्याकडे असलेला चाकू काढून शीतलवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या डोक्यावर आणि मानेवर वार केल्याने शीतल रक्ताच्या थारोळ्यात पडली. मुलीचा आक्रोश ऐकून तिचे वडील गोकुळदास शिरोडकर तिला वाचवण्यासाठी धावले, मात्र संशयिताने त्यांच्यावरही हल्ला केला, यात ते देखील जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी संशयित सुशांत शिरोडकर याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मडगावचे उपअधीक्षक गुरुदास कदम आणि पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोमकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.