तेलंगणाच्या 'ईगल' पथकाची मोठी कारवाई; मुंबई, गोवा आणि दिल्लीत पसरलेय ड्रग्सचे जाळे. गोव्यातील जेलमधील पेडलर्सकडून केली जायची अमली पदार्थांची खरेदी.

हैदराबाद/ पणजी : अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात लढणाऱ्या तेलंगणाच्या 'ईगल' (EAGLE) या विशेष तपास पथकाने दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड यांसारख्या युरोपीय देशांतून कुरियर सेवांचा वापर करून भारतात कोकेनसारख्या महागड्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचे कारस्थान उघडकीस आले आहे. या कारवाईमुळे देशातील मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू यांसारख्या महानगरांमध्ये तसेच गोव्यात पसरलेल्या अंमली पदार्थांच्या काळ्या साम्राज्याला मोठा तडा बसला आहे.
याप्रकरणी २२ जणांवर आरोपपत्र दाखल केले असून यात गोव्यातील ५ जणांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात दोन टॅक्सी व्यावसायिकांचाही समावेश आहे. टॅक्सीद्वारे पार्सलची ने-आण केली जात होती अशीही माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार इवाला उडोका स्टेनली नावाचा नायजेरियन नागरिक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्टेनलीला २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती, मात्र तो सध्या जामीन मिळवून बाहेर असून त्याच्यावर खटला सुरू आहे. अमली पदार्थ तस्करी विरोधात कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या 'ईगल' (Elite Action Group for Drug Law Enforcement) या पथकाने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्टेनली हा नेदरलँडमधील एका मुख्य सप्लायरच्या संपर्कात होता. फ्रान्स आणि बेल्जियममधून अमली पदार्थांच्या कंन्साइन्मेंट्स तो भारतात पाठवत असे. साधारणपणे जहाजे किंवा विमानाने छुप्या पद्धतीने तस्करी करण्याचे टाळून या टोळीने कुरियर मार्गाचा अवलंब केला होता, ही बाब तपास यंत्रणांसाठी अत्यंत दुर्मिळ आणि आव्हानात्मक ठरली आहे.
तपास पथकाने या ड्रग रॅकेटचे वितरण जाळे केवळ मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित नसल्याचे स्पष्ट केले आहे. हैद्राबाद, मुंबई, दिल्ली, बंगळुरू सारखी शहरे आणि गोवा सारख्या ठिकाणांव्यतिरिक्त अहमदनगर, लुधियाना, जालंधर, वलसाड आणि बेळगाव यांसारख्या टायर-२ भागातही या अमली पदार्थांचा पुरवठा केला जात होता. या रॅकेटमध्ये पुणे येथील सौरभ नावाच्या एका कोरिओग्राफरचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. स्टेनलीचा सहकारी राफेल याने सौरभला जास्तीच्या कमिशनचे आमिष दाखवून या व्यवसायात ओढले होते. आंतरराष्ट्रीय पार्सल स्वीकारणे आणि ते निर्देशानुसार गोवा व इतर शहरांतील संपर्कांपर्यंत पोहोचवणे, असे काम सौरभला देण्यात आले होते. सौरभच्या पुणे येथील घरावर कमीत कमी सहा वेळा कोकेनच्या कंन्साइन्मेंट्स आल्या होत्या, यात प्रत्येक पार्सलमध्ये सुमारे ३ किलो कोकेन असायचे.
हा आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत असे. नायजेरियात बसलेले हँडलर्स स्टेनलीला सातत्याने सूचना देत असत. स्टेनलीने भारतात ५०० हून अधिक ग्राहकांचे जाळे विणले असून, अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी त्याने टॅक्सी चालकांचीही एक विशेष टीम तयार केली होती. गोव्याच्या तुरुंगात असलेल्या काही ड्रग पेडलर्सकडूनही तो माल उचलत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सौरभने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे की, त्याला या पार्सलमध्ये कपडे असल्याचे सांगून त्याला फसवण्यात आले होते आणि गोवा आणि बंगळुरू सारख्या शहरांत प्रत्येक डिलिव्हरीसाठी त्याला ३० ते ८० हजार रुपये दिले जात असत. अनेकदा सूत्रधार स्टेनली स्वतः गोव्यात येऊन ही कंन्साइन्मेंट ताब्यात घेत असे, ही बाब गोव्यातील ड्रग पेडलिंगच्या वाढत्या व्यापावर प्रकाश टाकणारी आहे.
सध्या 'ईगल' पथकाने पंजाबगुट्टा पोलिसांच्या मदतीने याप्रकरणी २२ जणांवर आरोपपत्र दाखल केले असून आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. अद्याप अनेक मुख्य आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. कार्गो आणि कुरियर तपासणी अधिक कडक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हे रॅकेट ज्या पद्धतीने कार्यरत होते, त्यावरून देशातील अमली पदार्थांचे संकट किती खोलवर पसरले आहे, हे स्पष्ट होते. युवकांना कमिशनचे आमिष दाखवून या दलदलीत ओढणाऱ्या या टोळीचा पूर्ण बिमोड करण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही तपासाची चक्रे फिरू लागली आहेत.