घोगळ येथील वाईन शॉपला आग; लाखोंचे नुकसान

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
5 hours ago
घोगळ येथील वाईन शॉपला आग; लाखोंचे नुकसान

मडगाव: घोगळ येथे झुडिओ मॉलसमोरील इमारतीतील वाईन शॉपला आग लागण्याची घटना रविवारी सकाळी घडली. मडगाव अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत दुकानातील फर्निचर, फ्रीज, एसी, वायरिंगसह मद्याच्या बाटल्यांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



घोगळ येथील 'शॉप राईट लिकर स्टोअर' या केनेडी सुझा (राय) यांच्या मालकीच्या वाईन शॉपला आग लागली. रविवारी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. केवळ दहा मिनिटांत अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला, तेव्हा आगीचा भडका उडालेला होता. हे वाईन शॉप एका निवासी इमारतीच्या तळमजल्यावर होते. आगीच्या ज्वाळा पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्याचा मारा करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे स्वरूप मोठे असल्याने दुसऱ्या बंबालाही पाचारण करण्यात आले होते. या आगीत दुकानातील चार फ्रीज, फर्निचर, पीओपी आणि खाद्यपदार्थांसह मद्याचा साठा भस्मसात झाला आहे.




बाजूच्या दुकानांनाही बसली आगीची झळ

'शॉप राईट लिकर स्टोअर'ला लागलेल्या आगीच्या ज्वाळांमुळे शेजारील 'मुलर ज्वेलर्स' या दुकानालाही झळ बसली. आगीमुळे सुवर्णालंकाराच्या दुकानातील दोन एसी युनिट जळाले असून दुकानाच्या बॅनरचेही नुकसान झाले आहे. ही निवासी इमारत असल्याने पहिल्या मजल्यावरील फ्लॅटपर्यंत आगीची उष्णता पोहोचली. धुरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला; तसेच खिडकीतील कुंड्या जळाल्या असून खिडकीची तावदाने काळी पडली आहेत.

घोगळ येथील हाउसिंग बोर्डकडे जाणाऱ्या रस्त्यावरील 'रुडॉल्फ दोराय' इमारतीतील तळमजल्यावरील वाईन शॉपला ही आग लागली होती. दुकानात वरच्या बाजूला मद्याची साठवणूक केली होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. या दुकानांत कोणतीही अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याने निवासी इमारतींमधील अशी दुकाने धोकादायक ठरतात.
- गिल सुझा, अग्निशमन अधिकारी, मडगाव


पालिका क्षेत्रातील आस्थापनांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

मडगावातील न्यू मार्केट परिसरातील दोन दुकानांना शनिवारी आग लागली होती, तर रविवारी सकाळी घोगळ परिसरात ही घटना घडली. या लागोपाठच्या घटनांमुळे छोट्या जागेतील आस्थापनांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने सर्व आस्थापनांना आवश्यक परवान्यांसह अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांची सक्ती करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

हेही वाचा