भुयारी वाहिनीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात : नागरी पुरवठा खात्याची माहिती

पणजी : गोव्यात पाईप नॅचरल गॅस (पीएनजी) सुविधा सर्वदूर पोहोचवण्यासाठी भुयारी पाईपलाईन जाळे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच राज्यभर पाईपलाईन टाकण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याची माहिती नागरी पुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नागरी पुरवठा खात्याने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ज्या व्यावसायिक आस्थापनांकडे पीएनजी सुविधा आहे किंवा ज्यांनी कनेक्शनसाठी अर्ज करून हमीपत्र दिले आहे, त्यांनाच ४० टक्के वाढीव गॅस सिलिंडर कोटा दिला जाणार आहे. यामुळे पीएनजी वापराला प्रोत्साहन मिळणार आहे.
पीएनजी सुविधेचा विस्तार करण्यासाठी नागरी पुरवठा खात्याने विशेष फाईल तयार केली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी), नगरपालिका आणि पंचायतींना थेट निर्देश दिले जातील. गॅस वाहिनी टाकण्यासाठी लागणारी परवानगी गृहीत धरून कामाला वेग दिला जाईल, जेणेकरून २४ तास काम करून हे प्रकल्प पूर्ण करता येतील. सध्या पणजी, फोंडा, कुंडई आणि मडगाव या भागांत पीएनजी पुरवठा सुरू आहे.
गोव्यात पीएनजी वाहिनी टाकणे आणि गॅस पुरवठा करण्याची मुख्य जबाबदारी गोवा नॅचरल गॅस प्रा. लि. आणि इंडियन ऑईल अदानी गॅस प्रा. लि. यांच्यावर असणार आहे. उत्तर गोव्यात गोवा नॅचरल गॅस, तर दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्ह्यात अदानी गॅसद्वारे पुरवठा केला जाईल. पणजी ते म्हापसा दरम्यानची वाहिनी पुलावरून किंवा पाण्याखालून नेण्याबाबत विशेष तांत्रिक परवानगीची प्रक्रिया सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
नागरिकांसाठी हेल्पलाईन लवकरच
पीएनजी कनेक्शनसंदर्भात नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी नागरी पुरवठा खाते लवकरच हेल्पलाईन क्रमांक जाहीर करणार आहे. नागरिकांनी आपल्या अडचणी या हेल्पलाईनवर मांडाव्यात तसेच आवश्यकतेनुसार संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.