नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे आदेश

मडगाव : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एग्ना क्लिंटस यांनी सर्व नोडल अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी मतदारसंघातील सर्व मार्गांवर तपासणी नाके अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च निरीक्षक शरयू अधे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक संतोष देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गावकर, उपजिल्हाधिकारी वेल्टन टेलिस यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संशयास्पद रोख व्यवहार, मद्य, अमलीपदार्थ आणि इतर प्रलोभनांवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना अंमलबजावणी यंत्रणांना दिल्या. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रलंबित दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले. टपाल मतपत्रिकांचे व्यवस्थापन, त्यांचे सुरक्षित संचयन आणि सीसीटीव्ही निगराणीखालील पारदर्शक प्रक्रियेवरही चर्चा करण्यात आली.
दिव्यांग, ज्येष्ठांसाठी सुविधांवर चर्चा
मतदान प्रक्रियेनंतर मतपेट्या ठेवल्या जाणार्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्याठिकाणी चोवीस तास सीसीटीव्ही आणि मर्यादित प्रवेशाचे आदेश देण्यात आले. दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आणि स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. मतदानाच्या ७२ तास आधी पाळावयाची एसओपी आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले.