कुडणे येथील प्रसिद्ध होमकुंड जत्रोत्सव उद्यापासून

रस्त्याच्या बाजूला दुकाने लावण्यास बंदी : धगधगत्या निखाऱ्यांवरील अग्निदिव्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
04th April, 11:29 pm
कुडणे येथील प्रसिद्ध होमकुंड जत्रोत्सव उद्यापासून

साखळी : डिचोली तालुक्यातील कुडणे येथील श्री देवी महालक्ष्मी आणि कुडणेश्वर देवाचा ऐतिहासिक होमकुंड जत्रोत्सव सोमवार, ६ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. धगधगत्या निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून हजारो भाविक कुडणे येथे उपस्थित राहणार आहेत.
या जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'होमकुंड'. पारंपरिक धोल-ताशांच्या गजरात 'धोंडगण' कडक सोवळे पाळून पेटत्या निखाऱ्यांवरून अनवाणी चालतात. हा सोहळा पाहणे भाविकांसाठी अत्यंत चैतन्यमयी अनुभव असतो. ६ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वा. धार्मिक विधींना प्रारंभ होईल आणि ७ एप्रिलच्या पहाटे ४ वाजल्यापासून धोंडगणांचे होमकुंडावरून मार्गक्रमण सुरू होईल.
६ एप्रिल रोजी पहाटे मूर्तीस अभिषेक, सायंकाळी श्री सातेरी देवीची ओटी भरणे, रात्री ११ वा. हरवळे येथून रुद्रेश्वराचा प्रसाद स्वीकारणे आणि पहाटे २ वाजता होमकुंडाला मंत्राग्नी देणे. मुख्य जत्रोत्सवानंतर पुढील चार दिवस रात्री मंदिराच्या प्रांगणात विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. यामध्ये ७ एप्रिल रोजी ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’, ८ रोजी ‘संगीत मुक्ताई’, ९ रोजी ‘आंगश्यो मागंश्यो’ ही नाटके, तर १० एप्रिल रोजी ऑर्केस्ट्रा सादर केला जाणार आहे. श्री महालक्ष्मी कुडणेश्वर देवस्थान समितीने सर्व भाविकांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
गोबी मन्च्युरीयन दुकानांवर बंदी
उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने देवस्थान समितीने यंदा जत्रोत्सवात ‘गोबी मन्च्युरीयन’ विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच, रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मुख्य रस्त्याच्या बाजूला दुकाने थाटण्यास मनाई करण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.      

हेही वाचा