साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

मिराबाग सावर्डेतील प्रस्तावित बंधारा प्रकल्प रद्द तर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा कायम

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th April, 11:00 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : हडफडे येथील बर्च क्लब अग्नितांडव प्रकरणी संशयित आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांची म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली. व्यावसायिक गॅस ​सिलिंडरचा अद्याप तुटवडा जाणवत आहे. मिराबाग सावर्डे येथील प्रस्तावित बंधारा प्रकल्प अधिकृतपणे रद्द झाला आहे. हरमल येथे सहा रेस्टॉरंट्स आगीत भस्मसात झाली. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार 

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा

व्यावसायिक गॅस सिलिंडरवरील निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. चार सिलिंडरचा कोटा असतानाही प्रत्यक्षात एकच सिलिंडर मिळत असल्याने लहान तसेच मोठ्या हॉटेलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मैत्रीच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार; महिलेची सोहमविरुद्ध तक्रार

कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणात आता एका पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत सोहमविरोधात चार गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तपासाची व्याप्ती वाढल्याने हे प्रकरण गुन्हा शाखेकडे (क्राईम ब्रँच) वर्ग करण्यात आले आहे.

पणसुले-धारबांदोडा येथे बस-मोटारसायकल अपघातात दुचाकीवरील पोलीस कर्मचारी जखमी

पणसुले-धारबांदोडा येथील बगल रस्त्यावर आंतरराज्य प्रवासी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार प्रसाद अर्जुन कालेकर (३१, रा. साकोर्डा) जखमी झाले. कालेकर हे फोंडा पोलीस स्थानकात कार्यरत आहेत.

सोमवार 


विहिरीच्या पाण्याला इंधनाचा वास

सिंदोळी-सांकवाळ येथील अवर लेडी ऑफ हेल्थ चर्चच्या परिसरातील विहिरीतील पाण्याला इंधनाचा वास येऊ लागल्याने, तसेच इंधनमिश्रित पाणी पेट घेऊ लागल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. जवळच्या स्रोतांत इंधन मिसळण्याची भीती व्यक्त होत आहे. कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

राज्यात तीन ठिकाणी सुरी हल्ले

राज्यात तीन ठिकाणी चाकूहल्ल्याच्या घटना घडल्या. हळदणवाडी-मये येथे रागाच्या भरात सख्ख्या धाकट्या भावावर सुरीने हल्ला केल्याची घटना घडली. यात गंभीर जखमी झालेल्या धाकट्या भावावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. चाकू हल्ल्याची दुसरी घटना कोरगावात घडली. येथे पूर्ववैमनस्यातून तिघांनी दोघा चुलत भावांवर चाकू आणि दंडुक्याने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. वागातोर येथे हॉटेल मॅनेजरवर तेथील कर्मचाऱ्याने चाकूहल्ला केला. सायंकाळी संशयित पोलिसांना शरण आला.

जमीन व्यवहारात वाराणसीच्या व्यावसायिकाची १६ कोटींची फसवणूक

पेन्ह-द-फ्रान्स येथील एका जमिनीच्या व्यवहारात वाराणसी येथील बांधकाम व्यावसायिक अनुराग कुशवाहा आणि त्यांच्या भागीदारांची १६.६२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भेलुपूर पोलिसांनी गोव्यातून दोघा संशयितांना अटक केली आहे.

मंगळवार 


विवाहाचे आश्वासन देऊन लैंंगिक अत्याचार प्रकरणी सोहमवर गुन्हा

कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केला, तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला, असे आरोप करून १९ वर्षीय युवतीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.


पर्ये येथे कारची झाडाला धडक, चौघे जखमी

गोवा-बेळगाव मार्गावरील पर्ये येथे चारचाकी वाहनाने (के.ए. २५ एम.ई. ०७९४) झाडाला धडक दिल्याने चारजण जखमी झाले.कर्नाटक नोंदणीकृत कार साखळी येथून केरी मार्गे बेळगावकडे जात होती. पर्ये परिसरात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला गाडीची जोरदार धडक बसली. अपघातात वाहनातील चारही जण जखमी झाले.

होंडा-सत्तरी येथील जुगारअड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना अटक

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने होंडा-सत्तरी येथील अंदर बाहर पत्त्याच्या जुगारावर छापा मारून ९ जणांना अटक केली. याठिकाणाहून ५२ हजार ३०० रुपये रोख रकमेसह इतर जुगार साहित्य जप्त केले. अटक केलेल्या संशयितांची प्रत्येकी पाच हजार रुपये हमीवर सुटका करण्यात आली.

बुधवार


बर्च प्रकरणी लुथरा बंधूंना जामीन मंजूर

हडफडे येथील बर्च क्लब अग्नितांडव प्रकरणी संशयित आरोपी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांची म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सशर्त जामिनावर सुटका केली. क्लबचे सरव्यवस्थापक विवेक चंद्रभान सिंग यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; सोहमला सहा दिवसांची पोलीस कोठडी

कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याला १४ वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल बुधवारी केपे प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.

शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदल्याच्या आमिषाने ज्येष्ठाला ३.१४ कोटींचा गंडा

शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवून मुरगाव तालुक्यातील एक ज्येष्ठ नागरिकाला ३.१४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

खडकी येथे घराला भीषण आग

सत्तरी तालुक्यातील खोतोडा ग्रामपंचायत क्षेत्रातील खडकी येथे श्रीराम मंदिराजवळ अनिल नाईक यांच्या घराला अचानक भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून संबंधित कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

गुरुवार


आकय-म्हापसा येथील मंदिर वादातून दोन गटांत हाणामारी

आकय-म्हापसा येथील श्री सिमेश्वर ब्राह्मण राष्ट्रोळी देवस्थानात दोन गटांत झालेल्या हाणामारीत सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची दखल घेत बार्देशच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे.

उत्तर गोवा प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी न्या. विजया आंब्रे

उत्तर गोवा प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी न्या. विजया आंब्रे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यासह आणखी पाच जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाचे महानिबंधक स्वप्निल खाती यांनी जारी केली आहे.

गांजे-उसगाव येथे टेम्पोला धडकून स्कुटरचालक जखमी

गांजे-उसगाव येथील धोकादायक वळणावर गुरुवारी दुपारी टेम्पो व स्कुटर यांच्यात अपघात घडला. यात स्कुटर चालक सयद अब्दुल कादर (६४, वाळपई) गंभीर जखमी झाला असून अधिक उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले.

शुक्रवार

म्हापसा बाजारपेठेत चोरांनी एका रात्रीत फोडली ६ दुकाने

म्हापसा येथील बाजारपेठेत चोरांनी धुमाकूळ घालत रात्री सहा दुकाने फोडली. नितीन आरोलकर यांच्या दुकानातील १ लाख रुपये रोकड, तर इतर दुकानांतील मौल्यवान वस्तू चोरांनी लंपास केल्या आहेत. मार्केटमधील दुकानांत झालेल्या चोरीचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.

मिराबाग सावर्डेतील बंधारा प्रकल्प सरकारकडून रद्द

मिराबाग सावर्डे येथील प्रस्तावित बंधारा प्रकल्प अधिकृतपणे रद्द झाल्याने ४९ दिवस चाललेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. लोकांना विश्वासात न घेता आणलेला हा बंधारा प्रकल्प रद्द करा, अशी स्थानिक लोकांची मागणी होती.

बागा येथील शॅकमधील हल्लाप्रकरणी चार जणांची निर्दोष मुक्तता

बागा-कळंगुट येथील ‘पाम शुगर’ बीच शॅकवर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपी मिनेश उर्फ मुन्ना कळंगुटकर, विकास गोवेकर, गौतम उर्फ राघलो सीमेपुरुषकर आणि विवेकानंद उर्फ बॉबी कळंगुटकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

शनिवार

हणजूण येथे पार्टीनंतर युवकाचा मृत्यू

हणजूण येथे एका पार्टीदरम्यान २१ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत युवक हा इंदोर, मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

हरमल येथे सहा रेस्टॉरंट्स आगीत भस्मसात

खालचावाडा, हरमल येथे ऐन पर्यटन हंगामात समुद्र किनाऱ्याजवळील खासगी जमिनीतील सहा रेस्टॉरंट्स आगीत भस्मसात झाली. आगीत व्यावसायिकांना जबर फटका बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

लग्नाचे आश्वासन देऊन मुलीचे लैंगिक शोषण

लग्नाचे आश्वासन दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना मायना-कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित यशवंत यल्लप्पा हरिजन (वय २६, रा. रुमडामळ हाऊसिंग बोर्ड, मूळ बेळगाव-कर्नाटक) याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.

लक्षवेधी

शिवोली येथे शनिवारी रात्री ३३ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला असून, ही आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दाबोळी येथील प्रभू व्हायोलेटा निवासी संकुलात दूषित पाणी पुरवठा प्रकरणाची राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. याबाबत येथील रहिवाशांनी आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाने तक्रार दाखल करून घेत या प्रकरणी पेयजल खात्याचे मुख्य अभियंता , जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता आणि प्रभू रिअलटर्स यांना नोटीस बजावली आहे.

बोडगिणी, म्हापसा येथे कान कापलेल्या स्थितीत आढळलेल्या अज्ञात इसमाच्या मृतदेहप्रकरणी म्हापसा पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. शवचिकित्सा अहवालाच्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अन्वये पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

हणजूण कोमुनिदाद जमीन हडप प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केलेल्या संशयित शिवशंकर मयेकर याचा जामीन अर्ज मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयाने फेटाळून लावला. याबाबतचा आदेश न्या. ईर्शाद आगा यांनी जारी केला. 

हेही वाचा