म्हणाले- 'जीत आरोलकर मगोच्याच तिकिटावर लढणार'; माविन यांनी एका कार्यक्रमात आरोलकरांना भाजपमधून लढण्याची दिली होती ऑफर.

पणजी: गोव्यातील सत्ताधारी भाजप-मगो युतीमध्ये सध्या शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री माविन गुदिन्हो यांनी मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर यांना भाजपमध्ये येण्याचे केलेले आवाहन मगो पक्षाला चांगलेच झोंबले आहे. मगो पक्षाचे केंद्रीय समिती अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मंत्री गुदिन्हो यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, माविन यांनी मगो पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांना विनाकारण 'डिस्टर्ब' केले आहे, असा आरोप केला आहे.
ढवळीकर यांनी माविन यांच्या राजकीय इतिहासावर बोट ठेवत त्यांना जोरदार टोला लगावला. माविन गुदिन्हो हे पाच पक्ष फिरून आलेले नेते आहेत. त्यांनी दुसऱ्यांना पक्षनिष्ठेचे धडे देण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. माविन यांनी फोंडा येथील एका कार्यक्रमात जित आरोलकर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असे विधान केले होते. या विधानामुळे मगोच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ढवळीकर यांनी स्पष्ट केले की, खुद्द जित आरोलकर यांनी त्यांना आपण मगो पक्षाच्याच तिकिटावर ठाम असल्याचे सांगितले आहे.
दीपक ढवळीकर पुढे म्हणाले की, जेव्हा भाजप आणि मगोची अधिकृत युती आहे, तेव्हा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी अशा बेताल वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. निवडणुकीचे वारे वाहत असताना युतीमधील घटक पक्षाच्या आमदाराला आपल्या पक्षात ओढण्याचे विधान करणे हे युती धर्माच्या विरोधात असल्याचे त्यांनी नमूद केले. जीत आरोलकर यांच्याशी आमचे संबंध उत्तम आहेत आणि ते पक्षाचा आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान राखतात. जर माविन यांना इतकाच रस असेल तर त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या कामावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.