६ निष्पाप बालकांसह ३ वडीलधाऱ्यांचा करुण मृत्यू; प्रशासकीय हलगर्जीपणामुळे अख्खं घर उध्वस्त

दिंडोरी (नाशिक):नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण दुर्घटना दिंडोरी तालुक्यातील इंदोरे परिसरात घडली आहे. एका खाजगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. चालकाचा ताबा सुटल्याने त्यांची कार रस्त्यालगतच्या उघड्या विहिरीत कोसळली आणि त्यातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर प्रशासनाने विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून मृतांच्या वारसांना शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सुनील दरगुडे आणि त्यांचे कुटुंबीय एका कार्यक्रमावरून घराकडे परतत होते. सिमेंट काँक्रीटचा रस्ता जिथे संपतो, तिथून अवघ्या काही फुटांवर ही पाण्याने तुडुंब भरलेली विहीर होती. रात्रीचा अंधार आणि विहिरीला सुरक्षा भिंत नसल्यामुळे चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि कार थेट विहिरीत कोसळली. कारच्या काचा बंद असल्याने आतील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला गाडीचे दिवे विहिरीत दिसत होते आणि आतील लोक काचा फोडण्यासाठी धडपडत होते, मात्र अवघ्या पाच मिनिटांत संपूर्ण गाडी पाण्याखाली गेली आणि सर्व आक्रोश शांत झाला.

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने दोन क्रेनच्या साहाय्याने सुमारे सव्वा दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर कार बाहेर काढली, मात्र तोपर्यंत आतील नऊही जणांचा श्वास थांबला होता. मृतांमध्ये सुनील दत्तात्रय दरगुडे, त्यांची पत्नी रेश्मा, नातेवाईक आशा दरगुडे आणि सहा बालकांचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे दरगुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासकीय हलगर्जीपणावर ताशेरे ओढले. रस्त्यालगतची ही धोकादायक विहीर तत्काळ बुजवण्याचे आदेश त्यांनी दिले असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दिंडोरी पोलिसांनी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यांचे बांधकाम करताना अशा धोकादायक विहिरींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नऊ जीवांचा बळी गेल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
