नासाने जारी केली पृथ्वीची अप्रतिम छायाचित्रे

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
04th April, 12:09 pm
नासाने जारी केली पृथ्वीची अप्रतिम छायाचित्रे

वॉशिंग्टन/फ्लोरिडा : नासाने (NASA) आर्टेमिस २ (Artemis II) मोहिमेदरम्यान अंतराळातून घेतलेली पृथ्वीची मनमोहक छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. गुड मॉर्निंग, वर्ल्ड! (“Good morning, world!”) असा संदेश देत संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.

१ एप्रिल रोजी फ्लोरिडातून उड्डाण केलेल्या या मोहिमेत चार अंतराळवीर सहभागी असून, ते ओरीवन स्पेसक्राफ्ट (Orion spacecraft)  कॅप्सूलमधून चंद्रा भोवती प्रदक्षिणा घालून पुन्हा पृथ्वीवर परतणार आहेत. या छायाचित्रांमध्ये पृथ्वी निळ्या, तपकिरी छटांमध्ये झळकत आहे. ढगांचे थर, नद्या, किनारे आणि हिरव्या रंगाची ऑरोरा देखील स्पष्टपणे दिसत आहे.


छायाचित्रांची खासियत काय?

ही छायाचित्रे मोहिमेचे कमांडर रिड व्हायझमॅन यांनी २ एप्रिल रोजी ‘ट्रान्सलूनर इंजेक्शन’ या महत्त्वाच्या टप्प्यानंतर ओरीवन  कॅप्सूलमधून टिपली. त्यांनी या अनुभवाची तुलना पृथ्वीवरून चंद्राचा फोटो काढण्याशी केली आहे.

मिशन स्पेशलिस्ट क्रिस्तीना कोच यांनी सांगितले की, अंतराळातून पृथ्वीवरील किनारे, वादळी ढग, नद्या आणि दक्षिण ध्रुवही स्पष्ट दिसत होता.


कोणत्या उपकरणांचा वापर?

अंतराळवीर  गोप्रो (GoPro)  कॅमेरे, व्यावसायिक निकोन ( Nikon) कॅमेरे आणि आयफोनचा ( iPhone)  वापर करून हे फोटो टिपत आहेत. हे फोटो केवळ सुंदरच नाहीत, तर वैज्ञानिकांना वातावरणातील बदल आणि पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास करण्यास मदत करणार आहेत.

 रात्रीच्या पृथ्वीचेही दर्शन

काही छायाचित्रांमध्ये अंधारात उजळलेली शहरांची लाईट्स दिसत आहेत, तर काहींमध्ये दिवस-रात्र यांच्यातील सीमारेषा (टर्मिनेटर) स्पष्ट दिसते. काही मिनिटांच्या अंतराने घेतलेल्या दोन छायाचित्रांमध्ये प्रकाशाच्या फरकामुळे पृथ्वीचे वेगळे रूपही पाहायला मिळते.

 मोहिमेची सध्याची स्थिती

नासाच्या माहितीनुसार, उड्डाणानंतर काही दिवसांतच अंतराळवीर पृथ्वीपासून सुमारे ९०,००० मैल अंतरावर पोहोचले असून; ते चंद्राच्या दिशेने प्रवास करत आहेत. १९७२ नंतरची ही पहिली मानवयुक्त चंद्र मोहिम ठरणार आहे.

काही अडचणींचाही सामना

मोहिम सुरळीत सुरू असली तरी, सुरूवातीला कॅप्सूलच्या टॉयलेट सिस्टममध्ये किरकोळ बिघाड आणि ईमेल सुविधेत समस्या निर्माण झाली होती. मात्र, नंतर त्या दूर करण्यात आल्या.

 पुढील टप्पे

ही मोहीम आर्टेमिस कार्यक्रमाचा ( Artemis program) भाग असून; भविष्यात चंद्रावर दीर्घकालीन मानवी उपस्थिती निर्माण करण्याचा आणि पुढील अंतराळ संशोधनाचा मार्ग मोकळा करण्याचा उद्देश आहे. नासाने या छायाचित्रांबद्दल म्हटले आहे, “आपण पृथ्वीला एकसंध रूपात पाहतो... ते म्हणजे आपण सगळे एकत्र आहोत.”


हेही वाचा