
नाशिक (Nashik) : भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांनी आधीच चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) आणखी एक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. एका कांदा व्यापाऱ्याची जमिनीमध्ये (Land) गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध १२ वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातने संबंधित व्यापाऱ्याला प्लॉट (Plot) विक्री व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर ६० लाख रुपये किमतीची जागा वृद्धाश्रमाच्या नावावर केवळ २२ लाख २५ हजार रुपयांत खरेदी करण्याची बतावणी केली. याशिवाय, “चांगल्या ठिकाणी दुसरी जागा मिळवून देतो” असे आश्वासन देत त्याने व्यापाऱ्याकडून तब्बल ८५ लाख रुपये उकळले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही जागा न देता फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे,
तर ‘‘देवाचा कोप होईल’’ : खरात
यापुढे धक्कादायक बाब म्हणजे, व्यापाऱ्याने पैसे किंवा जागेबाबत तगादा लावताच खरातने त्याला “देवाचा कोप होईल” अशी भीती दाखवत धमकावले. या मानसिक छळामुळे व्यापारी प्रचंड त्रस्त झाला. याप्रकरणी सध्या तपास यंत्रणेने गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास करीत आहे.