नाशिकात आणखी एका प्रकरणात १२१ महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ

ऑफिस बॉयकडून मालकाला ब्लॅकमेल केल्यानंतर प्रकरण उघडकीस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
नाशिकात आणखी एका प्रकरणात १२१ महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ

नाशिक : नाशिक (Nashik)  येथील सातपूर परिसरात एका खंडणी प्रकरणाने अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे.  विश्वासू ठरलेल्या ऑफिस बॉयने (Office Boy)  हार्ड डिस्कची (Hard disk) चोरी करून आपल्या मालकाला ब्लॅकमेल करून १२ लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर पोलीस तपासात तब्बल १२१ महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ  आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आणखी एक खरात प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

हार्ड डिस्कमधील आक्षेपार्ह व्हिडिओ

सातपूर येथील ६३ वर्षीय व्यावसायिकाने खंडणीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी (Police) तपास सुरू केला. संबंधित व्यावसायिकाकडे गेल्या १६ वर्षांपासून काम करणाऱ्या ऑफिस बॉयने आपल्या साथीदारांच्या मदतीने कार्यालयातील हार्ड डिस्क चोरी केली होती. या हार्ड डिस्कमधील आक्षेपार्ह व्हिडिओंच्या आधारे त्याने मालकाकडे खंडणीची मागणी केली.

संशयितांना घेतले ताब्यात 

पोलिसांनी सापळा रचत संशयिताला दहावा मैल परिसरात पैसे घेण्यासाठी बोलावले आणि तेथेच त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पेनड्राइव्ह आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत आणखी तीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई आणि श्रीपत शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   मुख्य संशयित रवींद्र एरंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात धक्कादायक उघड

जप्त केलेल्या हार्ड डिस्कची तपासणी करताना २००३ ते २०२४ या कालावधीत चित्रित करण्यात आलेले १२१ महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले. हे व्हिडिओ मोबाईल आणि हँडीकॅमद्वारे शूट करण्यात आले असावेत. 

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित रवींद्र एरंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सातपूर परिसरात ब्युटीपार्लर चालवत होता. तसेच, अंगणवाडी सेविका आणि ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलांना काम मिळवून देण्याच्या नावाखाली तो संपर्कात येत होता; अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

व्हिडिओ हॅण्डिकॅम आणि मोबाईलद्वारे चित्रीत : उपआयुक्त काळे 

पोलीस उपआयुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडिओंमधील (Video) महिलांचे शारीरिक शोषण झाले का किंवा त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले का, याचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे व्हिडिओ हॅण्डिकॅम आणि मोबाईलद्वारे (Mobile) चित्रीत करण्यात आले असावेत.

विशेष पथक स्थापन करणार 

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, तपासासाठी लवकरच विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. तसेच, व्हिडिओंमधील महिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

शोषण झाल्यास महिलांनी पुढे यावे : पोलीस

दरम्यान, पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे की, या प्रकरणात कोणत्याही महिलेचे शोषण झाले असल्यास त्यांनी भीती न बाळगता पुढे येऊन सातपूर पोलिसांशी संपर्क साधावा.

नाशिकमध्ये खळबळ 

अशोक खरात प्रकरणानंतर पुन्हा एकदा समोर आलेल्या या प्रकारामुळे सातपूरसह संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, या तपासातून आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा