कुवेतमधील जलप्रकल्पावर हल्ला, आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण

इराण-अमेरिका-इस्रायल संघर्ष तीव्र

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
44 mins ago
कुवेतमधील जलप्रकल्पावर हल्ला, आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण

तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल (Iran-USA-Israel)  संघर्षाने आता अधिकच उग्र रूप धारण केले असून कुवेत, यूएईसह आखाती देशांवर हल्ल्यांची मालिका सुरू आहे. कुवेतमधील पाणी शुद्धीकरण (डिसॅलिनेशन) प्रकल्प आणि तेल शुद्धीकरण केंद्रावर इराणकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

या हल्ल्यांमुळे अत्यावश्यक पाणी व वीज पुरवठा प्रणालीवर परिणाम झाला असला, तरी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.

अमेरिकेची आक्रमक भूमिका

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणविरोधात आक्रमक भूमिका घेत, “इराणची उरलेली पायाभूत सुविधा नष्ट करण्याची कारवाई अजून पूर्णपणे सुरूही झालेली नाही,” असा इशारा दिला आहे.

अमेरिकेची ठिकाणे लक्ष्य करणार : इराण 

इराणकडूनही प्रत्युत्तराची भाषा तीव्र करण्यात आली असून, अमेरिकेने आणि इस्रायलने हल्ले वाढवले तर मध्यपूर्वेतील अमेरिकेची सर्व ठिकाणे लक्ष्य करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी यूएईतील गॅस प्रकल्पावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला, तर इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे अनेक घरे आणि वाहने नुकसानग्रस्त झाली आहेत.

ब्रिटन पाठवणार कुवेतला ‘रॅपिड सेंट्री’

या पार्श्वभूमीवर ब्रिटनने कुवेतच्या सुरक्षेसाठी ‘रॅपिड सेंट्री’ हवाई संरक्षण प्रणाली पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पंतप्रधान कीर स्टारमर (Keir Starmer) यांनी दिली.

मानवी हानी वाढली

संघर्षामुळे मानवी हानीही मोठ्या प्रमाणात झाली असून; फेब्रुवारीपासून इराणमध्ये २००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आणि हजारो जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, इराणचे माजी परराष्ट्र मंत्री जावाद झरीफ यांनी युद्ध थांबवून चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अमेरिकन सैन्यातही मोठी उलथापालथ झाली असून आर्मीचे प्रमुख अधिकारी रॅंडी जॉर्ज ( Randy George)  यांनी पद सोडल्याचे वृत्त आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीवर संकट 

एकूणच, आखाती प्रदेशातील तणाव शिगेला पोहोचला आहे.  तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या ‘होर्मुझ सामुद्रधुनी’वरही संकटाचे ढग दाटले आहेत. या संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि ऊर्जा सुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा