१० जणांची प्रकृती चिंताजनक; चालकाची मस्ती बेतली प्रवाशांच्या जीवावर

नागोठणे : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) पुन्हा एकदा भीषण अपघात (Accident) घडला असून, नागोठणे जवळील सुकळी खिंडीत शुक्रवारी पहाटे खाजगी लक्झरी बस (Luxury Bus) उलटल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ३८ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सुमारे १० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाली होती
मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेली ही बस सुकळी खिंडीतून जात असताना तीव्र वळणावर भर बसगाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने; परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
चालकाच्या बेदरकारपणामुळे अपघात
दरम्यान, या अपघातासाठी तांत्रिक बिघाड नव्हे तर चालकाने बेदरकार व निष्काळजीपणे बस चालवल्याने अपघात घडल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केला आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, प्रवास सुरू झाल्यापासूनच चालक अतिवेगाने आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवत होता. अनेकांनी वारंवार सूचना करूनही चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले.
प्रवाशांची ऑललाईन पोर्टलवर तक्रार
धक्कादायक बाब म्हणजे, काही प्रवाशांनी प्रवासादरम्यानच रेडबस ( RedBus) या ऑनलाईन पोर्टलवर चालक बेदरकारपणे बस चालवत असल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र, त्याची दखल घेण्यापूर्वीच अपघात घडला.
९ ते १० प्रवासी कळंबोली इस्पीतळात दाखल
अपघातानंतर नागोठणे पोलीस आणि स्थानिक बचाव पथकाने जखमींना बसमधून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले. गंभीर जखमी असलेल्या ९ ते १० प्रवाशांना पुढील उपचारासाठी कळंबोली येथील एमजीएम इस्पीतळ ( MGM Hospital) येथे हलवण्यात आले आहे.
या अपघातात मृत झालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, घटनेचा पुढील तपास नागोठणे पोलीस करीत आहेत. तसेच बसची तांत्रिक तपासणीही करण्यात येणार आहे.
सदोष्य मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी
दरम्यान, सुकळी खिंड परिसर हा अपघातप्रवण म्हणून ओळखला जातो. त्यातच खाजगी बस चालकांकडून होणाऱ्या वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.