'माझा आवाज दाबला जातोय, पण मी..' राघव चढ्ढा यांचे पक्षनेतृत्वावर गंभीर आरोप

आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; कालच त्यांना पक्षाने राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवले होते.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
47 mins ago
'माझा आवाज दाबला जातोय, पण मी..' राघव चढ्ढा यांचे पक्षनेतृत्वावर गंभीर आरोप

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांची पक्षाच्या राज्यसभा उपनेतेपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर, पक्षांतर्गत  राजकारणात मोठा भूकंप आला आहे. या धक्कादायक निर्णयानंतर चढ्ढा यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली, एका व्हिडिओ संदेशाद्वारे थेट पक्षनेतृत्वावर निशाणा साधला आहे. "माझा आवाज दाबला जात आहे, पण मी अजून हरलेलो नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली. यामुळे 'आप'मधील अंतर्गत संघर्ष आता केवळ चर्चा न राहता अधिकृतपणे जगासमोर आला आहे.



शुक्रवारी सकाळी समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये राघव चढ्ढा कमालीचे आक्रमक आणि भावूक दिसले. त्यांनी थेट सवाल उपस्थित केला की, संसदेत जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का? ते म्हणाले, "मी कदाचित संसदेत असे विषय मांडतो जे सहसा टाळले जातात. पण जनतेचा आवाज उठवणे जर चूक असेल, तर ती चूक मी वारंवार करेन. मला पदावरून हटवून गप्प करण्याचा प्रयत्न झाला असला, तरी हा लढा संपलेला नाही. मी 'आम आदमी'साठी माझा आवाज उठवतच राहीन. चढ्ढा यांच्या या विधानामुळे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


AAP moves to replace Raghav Chadha as Rajya Sabha deputy leader


या वादाची ठिणगी गुरुवारी पडली. आम आदमी पार्टीने राज्यसभा सचिवालयाला अधिकृत पत्र लिहून चढ्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्याची विनंती केली. या तांत्रिक बदलामुळे आता चढ्ढा यांना संसदेत पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी मिळणारा वेळ स्वतःहून निश्चित करता येणार नाही. त्यांच्या जागी पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चढ्ढा यांच्या निकटवर्तीयांनी असा दावा केला आहे की, संसदेतील त्यांचे वाढते प्रस्थ आणि वाढता प्रभाव दाबण्यासाठीच जाणीवपूर्वक हे पाऊल उचलण्यात आले आहे. पक्षाने त्यांना केवळ पदावरून हटवले नाही, तर त्यांचे संसदीय अधिकारही मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आहे.


Raghav Chadha: From Kejriwal's blue-eyed boy to sidelined aide


राघव चढ्ढा हे पक्षाच्या स्थापनेपासून अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकींमधील त्यांची अनुपस्थिती आणि पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेवर त्यांनी बाळगलेले मौन यामुळे तणाव वाढत होता. आता त्यांनी उघडपणे बंडाचे निशाण फडकवल्याने 'आप'मध्ये दोन गट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पक्षाच्या अधिकृत गटाकडून या आरोपांवर कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र चढ्ढा यांनी घेतलेली ही भूमिका आगामी काळात पक्षात मोठे संघटनात्मक फेरबदल आणि राजकीय पडसाद उमटवणारी ठरू शकते.

हेही वाचा