भारताची चिंता वाढली

वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेत मोठा इशारा दिला आहे. इराणमधील सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त केल्याचा दावा करत त्यांनी “आता करार करा, अन्यथा उशीर होईल,” असा थेट इशारा इराणला दिला आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत पूल कोसळल्याचे दाखवले आणि “यापुढे आणखी मोठी कारवाई होणार आहे,” असे सूचित केले. यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी तीव्र झाला आहे. याआधीही त्यांनी इराणला “अश्मयुगात पाठवू” अशी धमकी दिली होती.
पेंटॅगॉनमध्ये मोठा बदल
दरम्यान, अमेरिकन लष्करात मोठा बदल घडवून आणत संरक्षणमंत्री पेटे हेगसेठ (Pete Hegseth) यांनी यूएस आर्मीचे प्रमुख रेंडी जॉर्ज (Randy George) यांना पदावरून हटवले आहे. पेंटॅगॉनमधील हा ताज्या फेरबदलांपैकी एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्ष अधिक तीव्र
इराण आणि त्याचे सहयोगी देश यांच्याकडून इस्त्रायल (Israel) व अमेरिकेवर सतत हल्ले सुरू आहेत. इराणने तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यामुळे काही जण जखमी झाले. जेरुसलेममध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले.
लेबनॉनमध्ये हेजबुल्लाह (Hezbollah) विरुद्ध इस्रायलच्या कारवाईत गेल्या २४ तासांत २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
स्टील प्रकल्पांवर हल्ले; इराणचा पलटवार
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमधील दोन मोठे स्टील प्रकल्प बंद पडले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने यूएई, बहरीन आणि इस्रायलमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. इराणी लष्कराच्या इस्लामीक रेवोल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (Islamic Revolutionary Guard Corps) या कारवाईची जबाबदारी घेतली.
तेल दर वाढले, पण थोडीशी घसरण
युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. अमेरिकन क्रूडचा दर प्रति बॅरल १०८ डॉलरपर्यंत पोहोचला. मात्र, नंतर थोडीशी घसरण झाली असली तरी बाजारात अनिश्चितता कायम आहे.
भारताची चिंता वाढली
या संघर्षाचा भारतावरही (India) परिणाम होत असून परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री (Vikram Misri) यांनी ‘होर्मुझ सामुद्रधुनी’तील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ऊर्जा पुरवठा आणि जहाज वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थिती अजूनही तणावपूर्ण
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला हा संघर्ष शमण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे संपूर्ण पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून; जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.