सोलापुरातील हृदयद्रावक घटनेने खळबळ

सोलापूर : दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्यातील तिर्थ गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घरगुती वादातून खचलेल्या पित्याने आपल्या तीन चिमुकल्या मुलींना विष पाजून स्वतःही आत्महत्या (Suicide) केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पित्याने प्राण गमावले तर तिन्ही मुली चिंताजनक स्थितीत इस्पीतळात (Hospital) उपचार घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमा अण्णा वाघमारे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नी मध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होते. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. भीमा वाघमारे आणि त्यांच्या नातेवाईकांनी पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीने सासरी येण्यास नकार दिला.
पत्नीच्या वियोगाने मानसिकदृष्ट्या खचलेल्या भीमा वाघमारे यांनी प्रगती (वय ८), प्रतिक (वय ६) आणि प्रतीक्षा (वय ४) या आपल्या तीन मुलींना वळसंग परिसरातील शेतात नेले. तेथून त्यांनी पत्नीला फोन करून “मी आता निघालो, तू मुलांना घेऊन जा” असे सांगितले. त्यानंतर त्यांनी तिन्ही मुलींना विष पाजले आणि स्वतःही विष प्राशन केले. या घटनेत भीमा वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, ही घटना लक्षात येताच शेजारी शिवराज कुंभारी यांनी तत्काळ धाव घेत तिन्ही मुलींना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.