'भोंदू' खरातचा कोठडीत मुक्काम वाढला; लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटीकडून तपास गतिमान

पूजाविधी आणि लग्नाच्या आमिषाने पीडितेवर अत्याचार; गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारे डॉक्टरही पोलिसांच्या रडारवर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
37 mins ago
'भोंदू' खरातचा कोठडीत मुक्काम वाढला; लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटीकडून तपास गतिमान

नाशिक: नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा एकामागून एक उलगडा होवू लागला आहे. सर्वप्रथम दाखल झालेल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, एका घटस्फोटित महिलेने दिलेल्या लैंगिक अत्याचाराच्या दुसऱ्या तक्रारीमुळे एसआयटीच्या पथकाने खरातला पुन्हा एकदा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतले आहे. पूजाविधी, भविष्य सांगणे आणि लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर असून, या प्रकरणात आता वैद्यकीय क्षेत्रातील धागेदोरेही तपासले जात आहेत.

पीडित महिलेची आणि अशोक खरातची ओळख २०१३ पासून होती. विवाहानंतर सुखी संसारासाठी मार्गदर्शन घेण्याच्या निमित्ताने ही महिला आपल्या पालकांसह पहिल्यांदा खरातकडे गेली होती. त्यावेळी त्याने इशान्येश्वर मंदिरात पूजा करण्यास सांगितले होते. मात्र, कालांतराने घरगुती वादामुळे महिलेचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर भविष्यातील मार्गदर्शनासाठी ती पुन्हा खरातकडे गेली असता, त्याने तिच्या असहायतेचा फायदा घेण्यास सुरुवात केली. तू मागील जन्मीची अप्सरा आहेस आणि मी अवतारी पुरुष, माझा दुसरा विवाह तुझ्याशीच होईल, असे गंडवत त्याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. या  पीडितेवर तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून संमोहन केले आणि त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अत्याचारामुळे पीडित महिला गर्भवती राहिली असता खरातने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. खरातला या गोळ्या कोणी पुरवल्या, तो कोणत्या डॉक्टरांच्या संपर्कात होता किंवा तो पीडित महिलांना ठराविक डॉक्टरांकडे पाठवत होता का, या दिशेने आता एसआयटीने तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यात खरातला मदत करणारे डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर मालक लवकरच पोलिसांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. या तपासासाठी खरातची अधिक चौकशी करणे आवश्यक असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दुसरीकडे, खरातच्या आर्थिक व्यवहारांचीही कसून चौकशी सुरू आहे. एसआयटीने काल पुण्यातील एक सीए, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफा व्यावसायिकाला खरातच्या समोर बसवून सहा तास चौकशी केली. या चौकशीतून रत्ने आणि सोन्याच्या व्यवहारात खरातने मोठी बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे. तसेच, एका बँक व्यवस्थापकाला एक कोटी रुपयांची लाच देऊन कर्ज मिळवल्याचा संशयही पोलिसांना आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींचा फायदा घेत त्याने लाखोंचा नफा कमावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या इतरही भोंदू बाबांच्या मुसक्या आवळण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज झाले आहेत.

हेही वाचा