चेक बाऊन्स प्रकरणी फोंडाचे 'आप' उमेदवार गीतेश नाईक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

८ मे रोजी पुढील सुनावणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
38 mins ago
चेक बाऊन्स प्रकरणी फोंडाचे 'आप' उमेदवार गीतेश नाईक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

पणजी: फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेले 'आम आदमी पक्षा'चे उमेदवार गीतेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुमारे ५ लाख रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात गैरहजर राहिल्याबद्दल मर्सिस येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून नाईक हे जाणीवपूर्वक न्यायालयाची पायरी चढणे टाळत असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा कठोर निर्णय घेतला आहे.

हे संपूर्ण प्रकरण २०२१ मधील एका व्यवहाराशी संबंधित आहे. तक्रारदार श्यामसुंदर मिरजकर यांनी गीतेश नाईक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मिरजकर यांच्या दाव्यानुसार, एका कायदेशीर प्रक्रियेदरम्यान नाईक यांनी त्यांना ५ लाख रुपयांचा धनादेश दिला होता, जो बँकेत वटला नाही. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर नाईक यांनी नियमित हजेरी लावली नाही. ३० मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान नाईक किंवा त्यांचे वकील न्यायालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या वकिलांनी मांडलेला हजेरीतून सवलत मिळवण्याचा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला. "हे प्रकरण तीन वर्षे जुने असून आरोपी ८ एप्रिल २०२४ पासून न्यायालयात उपस्थित राहिलेला नाही. गैरहजेरीचे कोणतेही ठोस कारण न दिल्याने सवलतीचा अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

तक्रारदार मिरजकर यांनी न्यायालयाला माहिती दिली की, यापूर्वी १८ मार्च २०२४ रोजी देखील नाईक यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. मात्र, भविष्यात सर्व तारखांना उपस्थित राहण्याच्या अटीवर ते रद्द करण्यात आले होते. या अटीचा भंग करत नाईक जुलै ते डिसेंबर २०२४ दरम्यान अनेकदा गैरहजर राहिले. इतकेच नव्हे तर, अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस संरक्षण देऊनही नाईक अटकेला हुलकावणी देत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे न्यायालयाने आता ८ मे २०२६ रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

दुसरीकडे, गीतेश नाईक यांची उमेदवारी राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. काँग्रेसचे हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी नाईक यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. नाईक यांनी गुन्हेगारी प्रकरणाची माहिती लपवल्याचा आरोप फरेरा यांनी केला आहे.दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाईक यांची उमेदवारी वैध ठरवली असली, तरी अजामीनपात्र वॉरंटमुळे त्यांच्या निवडणूक प्रचारावर मोठे सावट निर्माण झाले आहे.

हेही वाचा