पालिका प्रशासनाकडून प्रक्रिया हाती : दात्यांकडून मदत नाकारली

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील शवागारात ठेवण्यात आलेल्या बेवारस मृतदेहांवर निधीअभावी अंत्यसंस्कार न केल्याने मडगाव पालिका प्रशासनावर टीका होत होती. समाजातील काही जणांनीही मदतीचा हात पुढे केल्यानंतर अखेर पालिकेने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवारी दहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील दीड महिन्यापासून मडगाव पालिकेकडून बेवारस व ओळख न पटलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाकडून २०२२ पासूनच्या अंत्यसंस्कार खर्चाचा सुमारे १५.२१ लाख रुपयांचा परतावा मिळालेला नसल्यामुळे पालिकेने ही प्रक्रिया थांबवली होती.
दरम्यान, ईस्टर सणाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांकडून अंत्यसंस्कार टाळले जात असल्याने अनेक मृतदेह शवागारातच ठेवले जातात. त्यामुळे दरवर्षी काही कॅबिनेट रिक्त ठेवली जातात. यंदा बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार न झाल्यामुळे शवागारातील कॅबिनेट पूर्ण भरली होती.
या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर फातोर्डा येथील सुनील कृष्णनाथ नाईक तसेच मडगावातील सामाजिक कार्यकर्ते प्रभव नायक यांनी काही मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पालिकेकडून ही मदत नाकारण्यात आली.
यानंतर जिल्हा प्रशासनाने पालिका मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत आवश्यक सेवांसाठी अडथळा का निर्माण केला जात आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर पालिकेने तातडीने अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू केली.
आज आणखी आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून गुरुवारी आणखी आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शवागारातील ताण कमी करण्यासाठी ही प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू ठेवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.